साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना चांगला काळ, बुधादित्य राजयोगाचा अपार लाभ; महादेव शुभच करतील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 12:55 IST2025-02-09T12:36:47+5:302025-02-09T12:55:04+5:30
Weekly Horoscope: ०९ फेब्रुवारी २०२५ ते १५ फेब्रुवारी २०२५ चा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

Weekly Horoscope: या सप्ताहात ११ फेब्रुवारी रोजी बुध कुंभ राशीत, तर १२ फेब्रुवारी रोजी रवी कुंभ राशीत प्रवेश करीत आहे. ग्रहस्थिती अशी- हर्षल मेष राशीत, गुरू वृषभ राशीत, मंगळ मिथुन राशीत, केतु कन्या राशीत आहे. बुध, रवी आणि प्लूटो मकर राशीत असून, मंगळवारी बुध कुंभ राशीत जाईल. बुधवारी रवी कुंभ राशीत जाईल. तेथे त्यांची युती शनिशी होईल. शुक्र, राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.
चंद्राचे भ्रमण मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीतून होईल. या सप्ताहात रविवारी भीष्म द्वादशी, सोमवारी प्रदोष, बुधवारी माघ स्नान समाप्ती होईल. तसेच या आठवड्यात विश्वकर्मा जयंती, गुरुप्रतिपदा, माघ पौर्णिमा असे अनेक व्रते, सण साजरे केले जात आहेत.
बुधाच्या कुंभ राशीतील प्रवेशानंतर बुध आणि शनि यांचा युती योग जुळून येईल. तसेच सूर्याच्या कुंभ राशीतील प्रवेशानंतर बुध आणि सूर्याचा बुधादित्य राजयोग आणि बुध, सूर्य, शनि यांचा त्रिग्रही योग जुळून येईल. एकूणच ग्रहमानाचा विचार करता आगामी आठवडा कोणत्या राशींसाठी कसा असेल? सर्व मेष ते मीन राशींवर कसा प्रभाव राहू शकेल? जाणून घेऊया...
मेष: हा आठवडा चांगला आहे. असे असले तरी आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यास त्रास होऊ शकतो. नुकसान होण्याची संभावना असल्याने व्यापाऱ्यांनी कोणतीही नवीन आर्थिक गुंतवणूक करू नये. ज्यांना नोकरी बदलावयाची आहे, त्यांनी ती बदलू नये. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावेल. अहंकारामुळे प्रेमिकेशी वाद संभवतो. विवाहितांचाही जोडीदाराशी वाद संभवतो. ज्यांना घर किंवा जमीन घेण्याची इच्छा आहे, त्यांनी निर्णय लांबणीवर टाकावा.
वृषभ: हा आठवडा सामान्य आहे. ह्या आठवड्यात खाण्या - पिण्यातील निष्काळजीपणामुळे पोटाशी संबंधित त्रास होण्याची संभावना असल्याने विशेष काळजी घ्यावी लागेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. त्यांना ओळख निर्माण करण्याची संधी मिळेल. तसेच केलेल्या परिश्रमाचे फायदे मिळतील. व्यापार व कारकिर्दीत यशस्वी होण्यासाठी परिश्रम वाढवावे लागतील. कोणताही मोठा व महत्त्वाचा निर्णय घेणे टाळावे. पैसा प्राप्त करण्यासाठी नवीन मार्ग मिळाल्याने खूश व्हाल. ज्या विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन अध्ययन करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घेऊ शकाल. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर जोडीदाराशी चर्चा करू शकाल. असे केल्याने गैरसमज दूर होऊन नाते अधिक दृढ होऊ शकेल.
मिथुन: हा आठवडा चांगला आहे. एखादे नवीन वाहन खरेदी करू शकता. व्यापार व कारकिर्दीसाठी हा आठवडा अनुकूल आहे. नोकरी करणाऱ्यांना नव्याने प्रगतीची संधी मिळू शकते. असे असले तरी वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, तेव्हा सावध राहावे. अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी जास्त परिश्रम करावे लागतील. वैवाहिक जीवनातील जुनी कटुता संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे संबंधात हळूहळू माधुर्य वाढू लागेल. ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे, त्यांनी काम करताना अधून-मधून थोडी विश्रांती घ्यावी.
कर्क: हा आठवडा चांगला आहे. निरोगी आयुष्य जगण्यासाठी दिनचर्येत योगासन व सकाळी चालावयास जाण्यास प्राधान्य द्यावे. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. त्यांच्या नवीन ओळखी होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना जर नोकरी बदलावयाची असेल तर त्यासाठी आठवडा अनुकूल आहे. ह्या आठवड्यात घराचे नूतनीकरण करण्यासाठी व बाहेर फिरावयास जाण्यासाठी भरपूर पैसे खर्च करू शकता. विद्यार्थ्यांसाठी आठवडा यशदायी आहे. त्यांना अपेक्षित परिणाम मिळू शकतील. रागावर नियंत्रण ठेवावे. अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो. वैवाहिक जीवनात एखादी जुनी गोष्ट समस्या निर्माण करू शकते. परंतु सामंजस्याने ही समस्या दूर करण्यास सक्षम आहात ही एक जमेची बाजू आहे.
सिंह: ह्या आठवड्यात थोडे सावध राहावे लागेल. एखादा जुनाट विकार पुन्हा उफाळून येण्याची संभावना आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे दुखणे वाढू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना संवाद साधताना जागरूक राहावे लागेल, अन्यथा त्यांचा वरिष्ठांशी वाद होऊ शकतो. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. एखादी नवीन व मोठी ऑर्डर त्यांना मिळण्याची संभावना आहे. प्रेमीजनांना अत्यंत सावध राहावे लागेल. एखाद्या लहानशा चुकीमुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी मेहनत करावी लागेल. कुटुंबातील कनिष्ठांशी नीट वागावे लागेल. त्यांच्याशी संबंध मधुर होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
कन्या: हा आठवडा सामान्य आहे. ह्या आठवड्यात जुनाट विकार पुन्हा उफाळून येण्याची संभावना आहे. अशा वेळी सकाळचे फिरणे व योगासन करण्यावर अधिक भर द्यावा. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा काहीसा त्रासदायी आहे. व्यापाऱ्यांना प्राप्तीत वाढ करण्यासाठी नवीन मार्ग मिळू शकेल. हा आठवडा विद्यार्थ्यांना तितकासा अनुकूल नाही. असे असले तरी ते एखाद्या संशीधनात सहभागी होऊ शकतील. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या सामान्य असल्याने पैशांची देवाण-घेवाण करणे टाळावे. प्रेमीजनांना सावध राहावे लागेल. वैवाहिक जीवनात एखाद्या जुन्या गोष्टीमुळे कटुता वाढण्याची संभावना आहे. अशा वेळी बुद्धिचातुर्याने कटुता दूर करण्याचा प्रयत्न केल्यास नात्यात गोडवा निर्माण होऊ शकतो.
तूळ: हा आठवडा सामान्य आहे. आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहावे लागेल. खोकला, सर्दी, पोटदुखी इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यापाऱ्यांना त्यांच्या जुन्या व्यापारात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते. विद्यार्थ्यांसाठी आठवडा काहीसा त्रासदायी आहे. ह्या आठवड्यात काही मित्रांपासून त्यांना दूर राहावे लागेल. ज्यांना घर, जमीन इत्यादींची खरेदी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी आठवडा प्रतिकूल आहे. ह्या आठवड्यात कर्ज मिळविण्यात त्रास होऊ शकतो. वैवाहिक जीवनात अहंकार व शंकेमुळे संबंधात कटुता येऊ शकते. थोडक्यात आपसातील तणाव नात्यातील गोडवा कमी करण्याची शक्यता आहे.
वृश्चिक: हा आठवडा चांगला आहे. व्यापाऱ्यांच्या नवीन ओळखी होतील. ह्या ओळखींमुळे व्यापारास चालना मिळून प्राप्तीत वृद्धी होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. नोकरीची एखादी चांगली संधी मिळू शकते. जर कोणाकडून कर्ज घेतले असेल तर ह्या आठवड्यात त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न करू शकता. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अध्ययनात थोडे सावध राहावे. मित्रांच्या सहवासात जास्त वेळ घालवू नये. एखाद्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे नात्यात कटुता येऊ शकते. विवाहितांनी त्यांच्या जोडीदाराचा सन्मान ठेवावा, अन्यथा एखाद्या गोष्टीमुळे वाद होऊ शकतो. ह्या आठवड्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
धनु: हा आठवडा सामान्य आहे. प्रकृती चांगली राहिली तरी डोळ्यांची जळजळ व पोटातील वात समस्या त्रस्त करू शकतात. ह्या आठवड्यात व्यापार प्रगती पथावर राहील. नोकरी करणाऱ्यांना चांगल्या संधी प्राप्त होतील. ह्या आठवड्यात आर्थिक स्थिती मजबूत राहील. प्राप्तीचे नवीन स्रोत मिळू शकतात. एखाद्या स्पर्धेची तयारी करत असाल तर घरापासून लांब राहून तयारी केल्यास चांगले परिणाम मिळतील. काही गैरसमज होऊन संबंधात दुरावा निर्माण होऊ शकतो. अशा वेळी आवश्यकता आहे ती म्हणजे आपण कोणत्याही परिस्थितीत आपल्या प्रेमिकेपासून लांब न राहता तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ह्याची. विवाहितांसाठी आठवडा उत्तम आहे. बुद्धिचातुर्याने नकारात्मक गोष्टींना सकारात्मकतेत परिवर्तित करू शकाल.
मकर: हा आठवडा सामान्य आहे. तीव्र डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. विद्यार्थ्यांना बाहेरगावी जाऊन अध्ययन करण्याची संधी मिळू शकते. व्यापाऱ्यांना ह्या आठवड्यात थोडे सावध राहावे लागेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. पदोन्नती संभवते. ज्यांना नोकरी बदलावयाची आहे त्यांच्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. प्रेमिकेसह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. वैवाहिक जीवन ठीक राहील. जोडीदारासह एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास जाल. त्यांच्या सहवासात भरपूर वेळ घालवाल. जोडीदारास मनातील सर्व गोष्टी सांगू शकता.
कुंभ: हा आठवडा सामान्य आहे. ह्या आठवड्यात प्रकृती जरी चांगली राहणार असली तरी एखादा जुनाट आजार उफाळून येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही. त्यांचे मन सतत विचलित होत राहील. नकारात्मक गोष्टींचा शिरकाव होऊ शकतो. विवाहितांना सावध राहावे लागेल. भांडण झाल्याने नात्यातील प्रेम कमी होऊन दुरावा वाढू शकतो. ह्या आठवड्यात खर्चाचे प्रमाण जास्त झाल्याने घरातील वातावरण कलुषित होऊ शकते. कारकिर्दीसाठी आठवडा अनुकूल असण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्यांना अजून चांगले परिणाम मिळतील. व्यापारासाठी कर्ज घेण्यात यशस्वी होऊ शकाल.
मीन: हा आठवडा चांगला आहे. एकदम तंदुरुस्त राहाल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. व्यापारात काही नवीन सौदे होऊ शकतात. काही जुने कंत्राट कामी येऊ शकतात. शासकीय नोकरीत असणाऱ्यांना ह्या आठवड्यात फायदा होऊ शकतो. छोटा व्यवसाय करणाऱ्यांना लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष केल्यास त्यांचे नुकसान होऊ शकते. त्यांनी अभ्यासात मन गुंतवावे. यश नक्कीच मिळेल. शेअर्स बाजारात गुतंवणूक करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. जर कर्ज घ्यावयाचे असेल तर त्यात यशस्वी होऊ शकता. वैवाहिक जीवन सुखद होईल.