Vastu Tips: घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर का लावतात पंचमुखी हनुमानाचे चित्र? जाणून घ्या लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:06 IST2025-06-26T15:03:17+5:302025-06-26T15:06:32+5:30
Panchmukhi Hanuman Vastu: संकटमोचक हनुमान अशी बिरुदावली मारुती रायाला मिळाली ती त्यांनी गाजवलेल्या शौर्यामुळे, पराक्रमामुळे आणि रामभक्तीमुळे! संत तुलसीदासही वर्णन करतात, 'संकट कटे मिटे सब पिरा, जो सुमारे हनुमत बलबिरा' अर्थात ज्यांच्या स्मरणानेही संकट पळून जातात, त्यांची प्रतिमा प्रवेश द्वारावर लावली तर काय होईल याचा अंदाज आलाच असेल...

वास्तू शास्त्राने हीच गोष्ट अधोरेखित करत घराच्या मुख्यद्वारावर पंचमुखी हनुमानाची प्रतिमा लावा असे सांगितले आहे. इथे पंचमुखी हनुमानच का? असा आपल्याला प्रश पडू शकतो? त्या शंकेचे समाधान करण्यासाठी पंचमुखी हनुमानाच्या प्रतिमेचे महत्त्व जाणून घेऊ.
पंचमुखी हनुमानाची पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत. त्यांची पूजा केल्याने जीवनात सर्व बाजूंनी येणाऱ्या संकटांपासून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे. वास्तुशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर घरात तसेच घराच्या मुख्य प्रवेश द्वारावर पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. त्यांच्या पाच मुखांचे महत्त्व जाणून घेऊ.
पूर्वमुखी : पंचमुखी हनुमान मूर्तीमध्ये पहिले मुख मर्कटाचे आहे. ज्याच्या मुखातून सूर्याचे अतुलनीय तेज बाहेर पडते. या तेजामुळे नकारात्मक शक्ती नाश पावतात आणि शत्रूंपासून आपल्या वास्तूचे आणि कुटुंबातील सदस्यांचे रक्षण होते.
पश्चिममुखी : पश्चिमेकडे तोंड असलेल्या मुखाला गरुड म्हणतात. हे रूप संकटमोचक मानले जाते. याचा अर्थ असा की जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती संकटांनी घेरलेली असते तेव्हा पश्चिमेकडे तोंड करून या रूपाचे स्मरण केले तरी त्याला संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो.
उत्तरमुखी : उत्तर दिशा ही देवतांची दिशा मानली जाते. म्हणूनच उत्तराभिमुख हनुमंताचे जीवनाच्या कल्याणासाठी विशेष महत्त्व आहे. हनुमंत उत्तरेकडे तोंड करून वराहाच्या रूपात बसलेले आहेत. त्यांची पूजा केल्याने दीर्घायुष्य आणि निरोगी शरीर मिळते.
दक्षिणमुखी : हनुमंताचे दक्षिणेकडे तोंड हे भगवान नरसिंहाचे रूप आहे. हे रूप भक्तांना भय आणि चिंतेपासून मुक्त करून संरक्षण प्रदान करते. दक्षिण दिशेला यमराजाची दिशा म्हणतात. घरावर येणारे संकट परस्पर टळो, म्हणून या रूपाने हनुमंताला प्रार्थना केली जाते.
ऊर्ध्वमुखी : हनुमंताचे वरच्या दिशेने असलेले मुख घोड्याचे आहे. या मुखाची पूजा केल्याने शत्रू आणि संकटांपासून मुक्तता मिळते. हे मुख व्यक्तीला आध्यात्मिक उन्नती आणि मोक्षाकडे मार्गदर्शन करते. या पंचमुखाची एकत्र पूजा व्हावी म्हणून घरात तसेच घराच्या प्रवेशद्वारावर ही प्रतिमा लावली जाते.
सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.