चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 15:09 IST2025-05-07T14:52:26+5:302025-05-07T15:09:33+5:30
मोहिनी एकादशीला जुळून आलेले योग कोणत्या राशींना सकारात्मक, अनुकूल, लाभदायक ठरू शकतात? जाणून घ्या...

मे महिना सुरू झाला आहे. वैशाख महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला मोहिनी एकादशीचे व्रत केले जाते. मराठी वर्षातील प्रत्येक महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या एकादशीला विशेष व्रतपूजन केले जाते. ०८ मे २०२५ रोजी असलेल्या वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीला अनेक योग जुळून आले आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध मेष राशीत विराजमान झाला आहे. रवी मेष राशीत, गुरू व हर्षल वृषभ राशीत, मंगळ कर्क राशीत, केतु कन्या राशीत, तर प्लूटो मकर राशीत आहे. शुक्र, शनि, राहु, नेपच्यून मीन राशीत आहेत. बुध आणि सूर्य यांच्या युतीने बुधादित्य राजयोग जुळून आला आहे. तसेच चंद्र आणि केतु युतीने ग्रहण योग जुळून आलेला आहे.
मोहिनी एकादशीला असलेली ग्रहस्थिती आणि जुळून आलेले योग कोणत्या राशींना सकारात्मक, अनुकूल, लाभदायक ठरू शकतात, हे जाणून घेऊया...
मेष: घरात उत्सवी वातावरण राहील. नवीन ओळखीचे फायदे होतील. उत्साहाने कामे कराल. नवीन नोकरीसाठी अर्ज केलेला असेल, तर त्यात सफलता मिळेल. असलेल्या नोकरीत पगारवाढ व बढती अशी फळे मिळतील. परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. जवळचा प्रवास होईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. तुमचे व्यक्तिमत्त्व उठून दिसेल. गुरुवार, शुक्रवार षष्ठस्थानातील चंद्र-केतु युतीमुळे आरोग्याची काळजी घ्यावी.
वृषभ: हा कालावधी अनुकूल राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला व्यवसायात तेजीचा अनुभव येईल. सतत व्यस्त राहाल. नवीन प्रयोग करून पाहिले जातील. ते यशस्वी ठरतील. जवळच्या प्रवासाचे योग येतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल. जुनी येणी वसूल होतील. कलागुणांचे कौतुक केले जाईल. चांगले अनुभव येतील. मौजमजा करण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल.
मिथुन: एखादी सुवार्ता कळेल. त्यामुळे मन आनंदून जाईल. अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल. त्यामुळे अडलेली कामे गती घेतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. भेटवस्तू प्राप्त होतील. वडिलोपार्जित संपत्ती मिळेल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. जवळच्या सहलीला जाऊन याल. गुरुवार, शुक्रवार नोकरीत कामाचा ताण वाढेल. नवीन जबाबदारीत गुंतलेले असाल. घरात व बाहेर थोडे सबुरीने वागण्याची गरज आहे.
कर्क: मनात नावीन्यपूर्ण कल्पना विकसित होतील. अडचणी दूर झाल्यामुळे हलके हलके वाटेल. आवडत्या छंदासाठी वेळ मिळेल. विवाहेच्छूसाठी अनुकूल काळ आहे. चांगली स्थळे चालून येतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. गुरुवार, शुक्रवार मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. शनिवारी नोकरीत मोठी संधी मिळेल.
सिंह: कितीही झटलात तरी कामे अपूर्णच राहतील. थोडा संयम बाळगा. शांत चित्ताने होईल तेवढी कामे करा. हळूहळू परिस्थिती आटोक्यात येईल. मनात आनंदी विचार राहतील. आवडत्या व्यक्तींच्या सहवासात याल. आर्थिक आवक चांगली राहील. समाजात मान वाढेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याशी चांगले संबंध राहतील. आहाराचे पथ्य पाळा. सकस व हलका आहार घ्यावा.
कन्या: घवघवीत यश मिळेल. धनलक्ष्मी प्रसन्न राहील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. व्यवसायात मोठा फायदा होईल. हाती आलेला पैसा खर्च करण्याकडे कल राहील. प्रेमात गैरसमज होऊ शकतात. कुणी मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करील. त्यादृष्टीने सावध राहा. पटकन कुणावर विश्वास ठेवू नका.
तूळ: ग्रहमानाची चांगली साथ मिळेल. मोठे प्रकल्प हाती घेऊन ते तडीस न्याल. कलागुणांचे कौतुक होईल. नोकरीत नव्या संधीची चाहूल लागेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. चंद्र भ्रमणामुळे शुभ फळे मिळू शकतील. या काळात धनलाभ होईल. महत्त्वाच्या कामात लोकांची चांगली साथ राहील. गुरुवार, शुक्रवार थोडे सबुरीने वागण्याची गरज आहे. कायद्याची बंधने पाळा. प्रवासात सतर्क राहा.
वृश्चिक: अनुकूल फळे मिळतील. पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. मौजमजा करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च कराल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. समाजात मान वाढेल. नोकरीत अनुकूल बदल होऊ शकतात. आर्थिक आवक चांगली राहील. देवाणघेवाण करताना खबरदारी घ्यावी. शनिवारी व्यय स्थानातील चंद्रामुळे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला घ्यावा.
धनु: थोडी दगदग होईल. वाहन जपून चालवा. अचानक धनलाभ होऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. चांगले अनुभव येतील. जनसंपर्क चांगला राहील. सामाजिक मान-सन्मान मिळेल. नोकरीत नवीन प्रकल्पात व्यस्त राहाल. घरातील वडीलधाऱ्या मंडळींची काळजी घ्यावी. शनिवारी एखादी चांगली बातमी कळेल. किरकोळ स्वरूपाच्या अडचणी दूर होतील.
मकर: आनंददायक अनुभव येतील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. व्यवसायात अनुकूल स्थिती राहील. जीवनसाथीशी सूर जुळतील. विवाहेच्छूसाठी अनुकूल काळ राहील. संयमाने वागण्याची गरज आहे. वाहन जपून चालवा. घाईघाईत कामे उरकण्याचा प्रयत्न करू नका. गुरुवारपासून परिस्थिती हळूहळू आटोक्यात येईल. नोकरीत अपेक्षित बदल होऊ शकतात. काहींना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. सावधपणे पावले टाकण्याची गरज आहे. अति आत्मविश्वास बाळगू नका. आरोग्याची काळजी घ्यावी. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. कायद्याची बंधने पाळा. कालांतराने अनेक अडचणी दूर होतील. आर्थिक बाजू बळकट राहील. दूरच्या प्रवासाचा बेत ठरेल. समाजात मान वाढेल.
मीन: विद्यार्थ्यांना अनुकूल काळ आहे. वेळ वाया न घालवता अभ्यासाचे नियोजन नीट करून ठेवा. काहींना प्रवास घडून येईल. काहींना पुरस्कार जाहीर होईल. आरोग्याची काळजी घ्यावी. योजना गुप्त ठेवा. गुरुवार, शुक्रवार व्यवसायात चांगले अनुभव येतील. कुणी मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करील. थोडे सावध राहा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.