सूर्य सिंह संक्रांती: ५ राशींना मालामाल होण्याची संधी, शुभ-लाभ; बुधादित्य राजयोगाचे वरदान!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 10:46 AM2023-08-10T10:46:04+5:302023-08-10T10:54:11+5:30

अधिक मासाची सांगता झाल्यानंतर सिंह संक्रांती सुरू होत आहे. कोणत्या राशींवर सूर्यकृपा राहील? जाणून घ्या...

ऑगस्ट महिन्यात अधिक महिन्याची सांगता झाल्यानंतर १७ ऑगस्ट रोजी नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य कर्क राशीतून स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करत आहे. सुमारे महिनाभर सूर्य सिंह राशीत विराजमान असेल.

सूर्याच्या या राशीसंक्रमणाला संक्रांती असे म्हटले जाते. सिंह संक्राती लागल्यानंतर निज श्रावण मास सुरू होईल. निज श्रावण महिन्यात नियमित केली जाणारी व्रत-वैकल्ये, सण-उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. सिंह राशीत बुध विराजमान असून, सूर्य आणि बुधाचा बुधादित्य राजयोग जुळून येत आहे.

बुद्धादित्य योगात बुद्धिमत्तेचा विस्तार होतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होऊ शकतात. सूर्याच्या शुभ प्रभावामुळे लोकप्रियता, प्रसिद्धी यांमध्ये भर पडू शकते. मेहनतीचे योग्य परिणाम प्राप्त होऊ शकतील असे सांगितले जात आहे. कोणत्या ५ भाग्यवान राशी आहेत? जाणून घ्या...

मेष राशीच्या व्यक्तींना शुभ परिणाम मिळतील. विद्यार्थी आणि नोकरदारांसाठी शुभ काळ राहील. एकाग्रता आणि बुद्धिमत्ता वाढेल. सर्व योजना यशस्वी होतील. पालकांशी संबंध पूर्वीपेक्षा चांगले राहतील. नोकरीत बढती मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवू शकाल. आर्थिक बाबतीत अनुकूल परिणाम मिळतील. पैसे वाचवू शकाल.

मिथुन राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबातील सदस्यासोबत काही मोठे काम करू शकाल. संवाद कौशल्य सुधारेल. ऑफिसमधील लोकांशी संबंध सुधारतील. बॉस कामाचे कौतुक करतील. सन्मान मिळेल. कामासाठी लांबच्या प्रवासाला जावे लागेल. वडिलांसोबत तुमचे नाते अधिक दृढ होतील. धार्मिक कार्यात आवड वाढेल.

तूळ राशीच्या व्यक्तींना सूर्याची सिंह संक्राती शुभ परिणामकारक ठरू शकेल. नशिबाच्या साथीने रखडलेल्या कामांना गती मिळेल. कामाच्या व्यवहाराशी संबंधित सर्व वाद मिटू शकतात. नवीन प्रकल्पावर काम करत असाल तर फायदा होईल. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत कुटुंब आणि आजूबाजूच्या लोकांकडून फायदा होईल. चांगला निर्णय घेऊ शकाल.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याची सिंह संक्रांती खूप शुभ मानली जाते आहे. कार्यक्षेत्रात अनेक उत्तम संधी मिळतील. पैशाच्या बाबतीत फायदा होईल. सुख-समृद्धी वाढेल. सरकारी क्षेत्रात काम करतात किंवा राजकारणाशी संबंधित आहेत त्यांना शुभ संकेत मिळत आहेत. उच्च अधिकार्‍यांकडून लाभ मिळेल. योजना यशस्वी होतील. इतरांच्या बोलण्यात न येण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काळजी घ्या. कुटुंबात काही कारणाने अस्वस्थता निर्माण होऊ शकते. विचार न करता कोणावरही विश्वास ठेवू नका.

धनु राशीच्या व्यक्तींना सिंह संक्रांती करिअर आणि वैयक्तिक बाबतीत शुभ मानली जात आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जे सल्लागार किंवा शिक्षक म्हणून काम करतात, त्यांच्यासाठी हे संक्रमण शुभ मानले जाते. आत्मविश्वास वाढेल. करिअरबाबत जे काही नियोजन करत आहात, त्यात नशीब साथ देईल. भावंडांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. प्रत्येक बाबतीत कुटुंबातील सदस्यांची मदत मिळेल. व्यवसायात कोणतीही जोखीम घेतल्यास शुभ परिणाम मिळू शकतील.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.