श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 12:48 IST2025-08-18T12:45:51+5:302025-08-18T12:48:37+5:30

Last week of Shravan 2025: आज श्रावण मासातला शेवटचा आठवडा सुरु झाला. येत्या शनिवारी अर्थात २३ ऑगस्ट रोजी श्रावण अमावस्येला(Shravan Amavasya 2025) हा महिना संपून भाद्रपद हा मराठी महिना सुरु होईल. तत्पूर्वी वास्तू शास्त्रात दिलेला बेलाच्या झाडाचा उपाय करा आणि लाभ मिळवा.

वास्तुमध्ये किंवा सभोवतालच्या परिसरात बेलाचे झाड लावणे हे सकारात्मकता आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. महादेवाला बेलपत्र प्रिय आहेच, ते झाड आपल्या वास्तूच्या आवारात असले तर महादेवाच्या कृपेने घरात धन, समृद्धी येईल आणि वास्तूचे रक्षणही होईल. जाणून घेऊया अधिक लाभ.

वास्तूनुसार आपल्या घरात, दारात, अंगणात किंवा सभोवतालच्या परिसरात बेलाचे झाड योग्य दिशेने लावले तर तुमच्या वास्तूला संरक्षण कवच मिळते आणि घरातील कलह दूर होऊन धन, संपत्ती वाढते, तसेच घरातील दुःख, दैन्य दूर होते. मात्र त्याचे नियम पाळणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊ.

दिशा : वास्तुशास्त्रानुसार, बेलपत्र नेहमी ईशान्य दिशेला लावावे. याशिवाय, तुम्ही हे झाड उत्तर किंवा पूर्व दिशेला देखील लावू शकता. असे केल्याने घराचे वातावरण सकारात्मक होते आणि कुटुंबातील सदस्यांना जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. घराची ही दिशा सर्वात शुभ मानली जाते. अशा परिस्थितीत बेलपत्राचे रोप योग्य दिशेलाच लावा.

वार : श्रावणात कोणत्याही दिवशी बेलपत्राचे रोप लावता येते. इतर वेळी सोमवारी हे रोप लावावे आणि त्याची योग्य रित्या मशागत करून दर सोमवारी याच बेलपत्राचा महादेवाला अभिषेक करावा, पूजा करावी. त्यामुळे शिवकृपा तुमच्यावर आणि तुमच्या वास्तूवर सदैव राहू शकेल.

नियम : वास्तुनुसार, बेलपत्राचे रोप कधीही घराच्या नैऋत्य दिशेला म्हणजेच नैऋत्य कोपऱ्यात लावू नये. स्वयंपाकघर, शौचालय, बाथरूम आणि घराच्या मध्यभागी बेलपत्र लावणे देखील निषिद्ध मानले जाते. बेलपत्राचे झाड स्वच्छ ठिकाणी ठेवावे आणि तो परिसर नियमितपणे स्वच्छ करावा. वाळलेले झाड ठेवू नये. बेलपत्राच्या झाडाची नियमित पूजा करणे खूप फलदायी ठरते. यामुळे जीवनात प्रगती होते.

लाभ : वास्तुनुसार, जर तुम्ही बेलपत्राचे झाड योग्य दिशेने लावले तर ते खूप शुभ फळ देते. या रोपाच्या लागवडीसाठी श्रावण मास योग्य ठरतो. श्रावण संपल्यावरही दर सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने पापांपासून मुक्तता मिळते आणि जीवनात आनंद निर्माण होतो. या रोपामुळे वास्तू दोषाचे निवारण होते आणि घरात सकारात्मकता येऊ लागते. तसेच कधीही पैशाची कमतरता भासत नाही. यामुळे तिजोरी नेहमीच धनाने भरलेली राहते.