Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 11:30 IST2025-08-04T11:27:59+5:302025-08-04T11:30:41+5:30

Shravan Somvar 2025 Rudraksha Rules in Marathi: सध्या श्रावणमास(Shravan 2025) सुरु आहे आणि २२ ऑगस्टपर्यंत असणार आहे. या काळात काही जण उपासना म्हणून रुक्ष माळ धारण करतात, तर काही जण ती माळ घेऊन नामजप करतात. मात्र या माळेची काय ताकद आहे आणि ती वापरण्यासंदर्भात कोणी व कोणते नियम पाळले पाहिजेत ते जाणून घेऊ.

रुद्र म्हणजे शंकर आणि अक्ष म्हणजे शंकराच्या डोळ्यातील अश्रू, अशी रुद्राक्षाची व्युत्पत्ती आहे. पूर्वी साधू, ऋषी-मुनी, गोसावी, पंडित यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ दिसत असे. तुळशी माळेप्रमाणेच रुद्राक्ष माळ पवित्र आहे. ती धारण करण्याचे नियम जाणून घ्या.

सद्यस्थितीत फॅशनच्या नावावर कोणीही रुद्राक्षाची माळ वापरतो, अगदी मुलीसुद्धा. परंतु, रुद्राक्षाची माळ हा काही दागिन्यांचा प्रकार नाही. ते धारण करण्यामागे शास्त्र आहे. रुद्राक्षाची माळ वापरणारी व्यक्ती अध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती असावी लागते. त्या व्यक्तीचे तेज त्याच्या मुखावर झळकते. अन्यथा कोणी येरागबाळा मनुष्य कफनी धारण करून, दाढी वाढवून हातात, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालतो आणि स्वत:ला स्वयंघोषित बाबा, साधू, महाराज म्हणवून घेतो, त्याला लोक ढोंगी म्हणून उपहास करतात. म्हणून, रुद्राक्षच्या माळेचे पावित्र्य जपले गेले पाहिजे.

रुद्राक्ष माळ कोणी घालावी आणि कोणी घालू नये, याबद्दल ज्योतिषशास्त्राचे नियम आहेत. त्या नियमांचे पालन न करता रुद्राक्षाची माळ घातली तर त्या व्यक्तीला विपरित परिणाम सहन करावे लागतात. म्हणून रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी त्याचे काय आहेत ते नियम, जाणून घेऊया.

रुद्राक्ष ही भारतात नेपाळ इंडोनेशिया आणि हिमालयाच्या परिसरातील अन्य प्रदेशात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याच्या फळांपासून जपमाळ बनवितात. रुद्राक्षाचे एकमुखी, द्विमुखी, पंचमुखी, षण्मुखी, अष्टमुखी, चतुर्दशमुखी इत्यादी प्रकार आहेत. ज्याप्रमाणे वनस्पतींपासून बनवलेली जडीबुटी प्रत्येकाला लागू पडतेच असे नाही, त्याप्रमाणे रुद्राक्ष नामक वनस्पती हर तऱ्हेच्या व्यक्तीला फलदायक ठरेलच असे नाही. म्हणून ज्योतिषशास्त्राचे नियम वाचून संबंधित व्यक्तींनीच रुद्राध धारण केला पाहिजे.

गळ्यात आणि हातात जो दागिना, हार घालतात, तो विचारपूर्वक घातला पाहिजे. कारण, आपल्या पूर्वजांनी दागिन्यांची रचना केवळ अलंकार म्हणून केलेली नाही, तर दागिन्यांचा आपल्या शरीरावर होणारा प्रभाव लक्षात घेऊन शास्त्रशुद्धपणे त्यांची आखणी केली आहे. गळ्यात आणि हातात घातल्या जाणाऱ्या दागिन्यांचा प्रभाव थेट मेंदूवर पडतो. तसेच, रक्तदाबावरही परिणाम होतो. म्हणून ज्यांना रुद्राक्ष वापरण्याची अनुमती नाही किंवा गरज नाही, अशा लोकांनी केवळ अलंकार म्हणून गळ्यात किंवा हातात रुद्राक्षाची माळ, ब्रेसलेट धारण केले असता, रक्तदाब कमी होतो. अस्वस्थता वाढत जाते, परंतु रुद्राक्ष त्याला कारणीभूत असेल, हे वापरणाऱ्या व्यक्तीला लक्षातही येत नाही. म्हणून ज्योतिषांचा सल्ला घेतल्याशिवाय रुद्राक्ष वापरू नये.

मनगट आणि हाताची बोटे यांचा संपर्क थेट हृदयाशी आहे. म्हणून साखरपुड्यात अनामिकेत अंगठी घालून दोन हृदयांची परस्परांशी गाठ पडावी, असा संकेत आहे. तसेच बहिण आपल्या भावाला राखी मनगटावर बांधते. ऋणानुबंधांचे धागे घट्ट जोडले जावेत आणि परस्परांबद्दल प्रेम कायमस्वरूपी राहावे, यासाठी हा प्रेमाचा धागा मनगटाशी जोेडला आहे. लग्नात वधू वर कांकण बांधतात, तेही मनगटावर. याचाच अर्थ जाणीवपूर्वक, काळजीपूर्वक या प्रथांची निर्मिती केली गेली आहे. त्यामागील शास्त्र समजून न घेता, केवळ गंमत म्हणून आपण प्रयोग केले, तर विपरित प्रकार घडू शकतात.

रुद्राक्षाचे पावित्र्य जपणे गरजेचे आहे. मांसाहार व मद्यपान करणाऱ्यांनी रुद्राक्षाला हात न लावणे इष्ट. रुद्राक्ष सर्वकल्याणकारी, मांगल्य देणारा आणि आयुष्यवर्धक आहे. म्हणून ते धारण करताना विंâवा देवघरात ठेवताना आपल्याकडून पावित्र्य जपले जाणार आहे का, याचा सर्वतोपरी विचार करावा. संसारसुखाची अपेक्षा करणाऱ्यांनी रुद्राक्ष धारण करू नये. कारण, ते विरक्तीचे प्रतीक आहे. ज्यांना आध्यात्मिक मार्गात उन्नती करायची आहे, त्यांनी ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार रुद्राक्ष धारण करावा. संसारी व्यक्तीने रुद्राची जपमाळ ओढली तर चालते, परंतु गळ्यात घालू नये.