नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 13:34 IST2025-09-23T13:07:36+5:302025-09-23T13:34:00+5:30

Shardiya Navratri 2025: नवरात्रीत शेकडो घरांमध्ये अखंड दिवा लावला जातो. पण अनावधानाने अचानक हा दिवा विझला तर? नेमके काय करावे? जाणून घ्या...

Shardiya Navratri 2025: चातुर्मासातील एक चैतन्यमयी आणि शुभ पुण्यदायी उत्सव म्हणजे नवरात्र. गणपती उत्सव साजरा झाल्यावर काहीच दिवसांनी येत असलेल्या नवरात्रोत्सवामुळे उत्साह, चैतन्य, सकारात्मकता कायम राहते, असे म्हटले जाते. नऊ दिवस देवीचा जागर केला जातो. आपापल्या परिने यथाशक्ती देवीची सेवा केली जाते.

घटस्थापना होऊन नवरात्राची सुरुवात झाली आहे. यंदा २२ सप्टेंबर २०२५ ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नवरात्रोत्सव असणार आहे. नवरात्रीनिमित्त घरोघरी देवीची उपासना केली जाते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे नऊ दिवस देवीपुढे लावला जाणारा अखंड दिवा. हा दिवा नऊ दिवस घरात तेवत राहिला पाहिजे.

नवरात्रीच्या नऊ दिवसांत अखंड दिवा लावण्याची प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून सुरु आहे. अखंड ज्योती म्हणजे असा प्रकाश जो विझत नाही. अखंड ज्योती अखंड तेवत ठेवावी. नवरात्रीत अखंड ज्योतीला खूप महत्त्व आहे. ज्योतीमध्ये दिव्याचा खालचा भाग डावीकडून उजवीकडे लावावा. या प्रकारचा दिवा आर्थिक समृद्धीचा कारक आहे. असे मानले जाते की या प्रकारच्या दिव्यामुळे भाग्य मिळते.

शास्त्रानुसार पूजेच्या वेळी साधारणतः दोन प्रकारचे दिवे लावले जातात. एक कर्मदीप, जो केवळ पूजेच्या वेळी लावला जातो आणि दुसरा अखंड दिवा, जो कोणत्याही सणाच्या किंवा शुभ कार्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रज्वलित केला जातो. ज्या घरांमध्ये नवरात्रीच्या कलशाची स्थापना झाली आहे, तेथे हा दिवा लावला जातो. अखंड दिवा सदैव तेवत राहिल्याने सुख, शांती, समृद्धी येते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, असे मानले जाते.

देवी भागवत पुराणानुसार अखंड ज्योत दिवा पश्चिम दिशेला ठेवल्यास सुख, समृद्धी आणि संपन्नता येऊ शकते. शास्त्रामध्ये पूर्व दिशा पूजनासाठी सर्वोत्तम दिशा मानण्यात आली आहे. या दिशेला अखंड ज्योत दिवा प्रज्वलित केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि वैभव प्राप्त होऊ शकते. उत्तर दिशेला अखंड दिवा ज्योत ठेवल्यास, घरात राहणाऱ्या सदस्यांना दीर्घायुष्य लाभते आणि अकाली मृत्यूची भीती दूर होते. परंतु, दक्षिण दिशेला अखंड दिवा ज्योत असू नये. ते शुभ मानले जात नाही.

अखंड ज्योत लावण्यापूर्वी दुर्गामाता, गणपती, भगवान शीव यांचे ध्यान करावे नंतर 'ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु‍ते' मंत्राचा जप करावा त्यानंतर अखंड ज्योत लावावी. नऊ दिवस झाल्यावर हा अखंड दिवा आपणाहून शांत होऊ द्यावा.

अखंड दिवा लावल्यानंतर तो ज्या ठिकाणी कमी वारा असेल अशा ठिकाणी ठेवावा, जेणेकरुन त्याची ज्योत विझण्याची भीती राहत नाही. परंतु, संकल्प करून नवरात्रात लावलेला अखंड दिवा अचानक विझला, तर काय, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. यामुळे काही अशुभ होते का, देवीचा कोप होतो का, अवकृपा होते का, पापकृत्य समजले जाते का, असे अनेक विचार मनात येतात.

हिंदू संस्कृती आणि परंपरेत दीप प्रज्वलन हा खूप मोठा आणि महत्त्वाचा संस्कार आहे. नवरात्रात किंवा विशेष अनुष्ठानावेळी चोवीस तास दिवा तेवत ठेवण्याचा संकल्प केला जातो. दिवा हे तेजाचे प्रतिक मानले जाते. दिवा लावल्याने पावित्र्य, चैतन्य आणि सकारात्मकता घरात येते. अंधार कितीही गडद असला, तरी एक पणती अंधाराशी दोन हात करण्याची शक्ती देते. त्यामुळे दिवा लावणे हे आशेचे लक्षण मानले जाते.

दिवा हा ज्ञानाचे आणि प्रकाशाचेही प्रतिक मानले जाते. दररोजच्या देवपूजनात दिव्याला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणे दिव्याला सकारात्मकतेचे प्रतिक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानण्यात आले आहे. घरात दीप प्रज्वलन करणे शुभ मानले जाते. घरातील दिवे सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात.

कोणत्याही पूजेची सुरुवात करण्यापूर्वीच सुरुवातीला एका बाजूला दिवा लावला जातो. पूजा करण्याचा घेतलेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तेवत राहण्याचे, स्थिर राहण्याचे आवाहन अग्नी देवतेला केले जाते. यानंतर पूजा झाल्यानंतरही देवासमोर दिवा लावला जातो. आपल्याकडे तेलाचा आणि तुपाचा दिवा देवासमोर लावला जातो. कोणताही दिवा लावला तरी चालतो.

तुपाच्या दिव्याने अधिक सकारात्मकता येते असे सांगितले जाते. देवासमोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिथे स्थिर होते, अशी मान्यता आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावणे अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे. शुद्ध तुपात वातावरणातील जंतू दूर करण्याची क्षमता असते. अशा तुपाचा जेव्हा अग्नीशी संबंध येतो; त्यावेळी वातावरण एकदम पवित्र होते. दिवा लावल्याने संपूर्ण घराला त्याचा फायदा होतो.

दिवा लावताना दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी, याचेही काही नियम सांगण्यात आले आहेत. आपण जर तेलाचा दिवा लावत असाल तर, तो आपण आपल्या डाव्या हाताला ठेवावा आणि जर तुपाचा दिवा लावणार असाल, तर आपल्या उजव्या हाताला असायला हवा, असे सांगितले जाते.

धनलाभासाठी दिव्याची वात उत्तर दिशेला ठेवावी. आपल्या घरामध्ये वारंवार कोणी आजारी पडत असल्यास दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवावी. या दोन्ही दिशा अत्यंत शुभ मानण्यात आल्या आहेत. पश्चिम दिशेला दिव्याची वात असल्यास आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दक्षिण यमाची दिशा असल्याने दक्षिण दिशेला कधीही दिव्याची वात नसावी, असे सांगितले जाते.

देवासमोर लावलेला दिवा विझला किंवा दिवा लावताना विझला, तर तो अशुभ संकेत मानला जातो. मात्र, धर्मशास्त्रात याला कोणताही आधार नाही. त्यामुळे दिवा विझल्यास घाबरून जाता कामा नये. देवाची आणि दिव्याची क्षमायाचना करून तो पुन्हा प्रज्वलित करावा. मात्र, दिवा ओवाळताना तो चुकून खाली पडला, तर त्यासाठी दीपपतन नावाची शांत करावी लागते. ज्या ठिकाणी दिवा पडला, त्याच ठिकाणी ती शांत करावी, असे सांगितले जाते.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.