Shani Uday 2022: शनीचा मकरेत उदय: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना राजयोग; यश, प्रगती, धनलाभाचा सर्वोत्तम काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 01:17 PM2022-02-16T13:17:52+5:302022-02-16T13:26:36+5:30

Shani Uday 2022: शनी उदय कालावधी उत्तमोत्तम संधींचा असून, नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ मिळेल? जाणून घ्या...

सन २०२२ हे वर्ष शनीच्या राशीचक्रातील संचारासाठीचे महत्त्वाचे वर्ष मानले जात आहे. शनीचे चलन सर्व राशींवर प्रभाव पाडणारे ठरणारे आहे. जानेवारी महिन्यात सूर्याच्या प्रभावामुळे अस्त झालेला शनी आता फेब्रुवारी महिन्यात उदय होत आहे. (Shani Uday 2022)

फेब्रुवारी महिन्यात सूर्य कुंभ राशीत प्रवेश करत असून, यानंतर शनी आपलेच स्वामित्व असलेल्या मकर राशीत उदय होणार आहे. २२ जानेवारी २०२२ रोजी शनी मकर राशीत अस्त झाला होता. आता २४ फेब्रुवारी २०२२ रोजी शनी उदय होणार आहे. (Shani Uday 2022 in Makar)

शनी आणि सूर्य हे पिता-पुत्र मानले गेले असले, तरी ते एकमेकांचे शत्रू ग्रहही मानले गेले आहेत. शनी उदय होणे ही एक खगोलीय घटना असली, तरी त्याला ज्योतिषशास्त्रातही खूप महत्त्व असल्याचे सांगितले गेले आहे. शनीचा उदय होणे म्हणजे शनी सूर्य ग्रहाच्या अतिशय जवळून मार्गक्रमण करतो.

ज्योतिषशास्त्रानुसार, शनी हा नवग्रहातील न्यायाधीश ग्रह मानला जातो. व्यक्तीच्या कर्माप्रमाणे तो फलप्रदान करतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. शनी उदयाचा प्रभाव सर्व राशींवर होणार असला, तरी ५ राशीच्या व्यक्तींना तो अत्यंत शुभफलदायक, राजयोग ठरू शकेल, या लोकांना या काळात व्यापार आणि राजकारणात विशेष यश मिळू शकेल, असे म्हटले जात आहे.

शनीचा उदय मेष राशीच्या व्यक्तींना उत्तम संधींचा ठरू शकतो. राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना लाभदायक काळ असून, पदोन्नतीचे संकेत आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्यांना शुभवार्ता मिळेल. नवीन उत्तम संधी मिळू शकतील. काही जणांना वेतनवाढ, बढतीचे योग जुळून येऊ शकतील. तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल, ज्यामुळे तुमची प्रशंसा होईल. व्यापार, व्यवसायात फायदा मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.

शनीचा उदय वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरू शकतो. या कालावधीत नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल. हाती घेतलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतील. अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतील. करिअर आणि कार्यक्षेत्रात प्रगती साध्य करण्याच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतील. पदोन्नती, बढतीचे योग जुळून येऊ शकतील, असे सांगितले जात आहे.

शनीचा उदय कर्क राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल. कर्क राशीच्या कुंडलीतील त्रिकोणात उत्तम योग जुळून येत असून, व्यवसाय, व्यापारातील भागीदारीतून फायदा होऊ शकतो. भागीदारीचे नवीन करार होऊ शकतात. जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळू शकेल. तेल, पेट्रोलियम, खाण, लोह क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उपयुक्त काळ ठरू शकेल.

शनीचा उदय तूळ राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक ठरू शकतो. तूळ राशीचा स्वामी शुक्र असून, शनी आणि शुक्र मित्र ग्रह मानले जातात. याचा चांगले परिणाम आगामी कालावधीत पाहायला मिळू शकतील. तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल, तर तुम्ही खूप नफा कमवू शकता. कामाच्या ठिकाणी तुमचे खूप कौतुक होऊ शकते. या काळात आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. हाती घेतलेल्या कामात यश मिळू शकेल.

शनीचा उदय मकर राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकेल. व्यवसाय देणारा बुध भाग्येश स्थानात असल्यामुळे यश, प्रगती साध्य करू शकाल. व्यवसाय, उद्योगातील करार लाभदायक ठरू शकतात. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही गुंतवणूक करू शकता. लाभाची चिन्हे आहेत. यावेळी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याची अपेक्षा आहे. जे प्रशासकीय पदांवर कार्यरत आहेत, त्यांची प्रतिष्ठा वाढू शकेल.