२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 19:08 IST2025-07-02T18:55:22+5:302025-07-02T19:08:13+5:30

पुढील २ वर्षे ३ राशींना साडेसाती कायम असणार आहे. या कालावधीत काही उपाय करणे अतिशय उपयुक्त ठरू शकते, असे सांगितले जात आहे. तुमच्या राशीला आहे का साडेसाती?

Shani Sade Sati 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व नवग्रह नियमित, नियोजित पद्धतीने अखंडपणे गोचर करत असतात. ग्रहांच्या नक्षत्र परिवर्तन, राशी परिवर्तन यांचा प्रभाव केवळ राशींवर नाही, तर देश दुनियेवर पाहायला मिळतो, असे म्हटले जाते. नवग्रहांमध्ये सर्वांत धीम्या पद्धतीने गोचर करणारा, परंतु, तेवढाच प्रभावी आणि नवग्रहांचा न्यायाधीश ग्रह म्हणजे शनि ग्रह.

शनि एका राशीत शनि तब्बल २.५ वर्षे असतो. २९ मार्च २०२५ रोजी शनि मीन राशीत विराजमान झाला आहे. आता पुढील अडीच वर्ष शनि मीन राशीतच विराजमान असणार आहे. आगामी काळात शनिचे विविध ग्रहांशी शुभाशुभ योग जुळून येणार आहेत. याचा प्रभाव सर्वच राशींवर होईल, असे सांगितले जात आहे.

०२ जून २०२७ रोजी शनि मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. २९ मार्च २०२५ ते ०२ जून २०२७ हा संपूर्ण कालावधी शनि मीन राशीत विराजमान असणार आहे. शनि मीन राशीत विराजमान होताच साडेसाती चक्र बदलले आहे. हे साडेसाती चक्र आता जून २०२७ पर्यंत कायम राहणार आहे.

शनि साडेसाती आणि ढिय्या प्रभाव अतिशय महत्त्वाचा मानला जातो. साडेसाती म्हणजे अशुभ, प्रतिकूल, वाईट हीच संकल्पना रुजलेली दिसते. साडेसाती शनी ग्रहामुळे येत असल्याने शनी ग्रहाकडेही काहीशा 'वक्र'दृष्टीनेच पाहिले जाते. मात्र, तसे अजिबात नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, साडेसाती हा अनन्यसाधारण महत्त्व असणारा योग आहे.

आताच्या घडीला कुंभ, मीन आणि मेष या ३ राशींची साडेसाती सुरू आहे. जून २०२७ पर्यंत या ३ राशींची साडेसाती कायम असणार आहे. जून २०२७ मध्ये शनिने ग्रह मेष राशीत प्रवेश केला की, कुंभ राशीची साडेसाती संपेल आणि वृषभ राशीची साडेसाती सुरू होईल. तसेच सिंह आणि धनू या राशींवर शनिचा ढिय्या प्रभाव/अडीचकी सुरू आहे. जून २०२७ पर्यंत या दोन राशींवरील हा ढिय्या प्रभाव कायम राहणार आहे.

शनि हा वय, दुःख, रोग, वेदना, विज्ञान, तंत्रज्ञान, लोह, खनिज तेल, नोकर, कर्मचारी, तुरुंग अशा काही गोष्टींचा कारक मानला जातो. शनि मकर आणि कुंभ या दोन राशींचा स्वामी आहे. तूळ ही शनिची उच्च रास आहे, तर मेष ही त्याची नीच रास मानली जाते.

मेष राशीच्या लोकांना साडेसातीचा हा काळ कष्टकारक ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. मेष राशीचा साडेसातीचा पहिलाच टप्पा सुरू आहे. तर, मीन राशीचा साडेसतीचा दुसरा टप्पा सुरू आहे. कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. अशा परिस्थितीत या राशींच्या समस्या वाढू शकतात. या राशींच्या लोकांना काहीशा मानसिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यावसायिकांचे उत्पन्न मंदावू शकते, असे म्हटले जात आहे. नोकरी करणाऱ्या लोकांनी यावेळी नोकरी बदलू नये, असा सल्ला दिला जातो.

ज्यांची साडेसाती सुरू आहे, ज्यांच्यावर शनिचा ढिय्या प्रभाव आहे, त्यांनी आवर्जून न चुकता शनि उपासना, शनि संबंधातील उपाय, शनिचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी काही गोष्टींचे नक्कीच पालन करावे, असे सांगितले जाते. किमान पुढील २ वर्ष संकल्प करून ते पाळण्याचा प्रयत्न करावा, असे केल्यास शनि कृपा सदैव राहू शकेल, असे सांगितले जात आहे.

साडेसाती सुरू असताना आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते. स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे. शनिवारी काहीतरी दान करावे. शनि हा महादेवांना आपले गुरु मानतो, अशी मान्यता आहे. तसेच महादेवांनीच शनिला नवग्रहांचे न्यायाधीश पद दिले आहे, असेही म्हटले जाते. त्यामुळे शनि साडेसाती, ढिय्या प्रभाव, महादशा काळात शक्य तेवढी महादेवांची उपासना, नामस्मरण, मंत्रांचे जप करणे अतिशय शुभ मानले जाते.

शनीची साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्याची मारुती, विष्णू या देवांची उपासना, नामस्मरण उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते. कुंडलीत शनीची स्थिती कमकुवत असेल आणि प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल, तर शनिवारी विशेष व्रत करावे. शनीशी संबंधित वस्तूंचे यथाशक्ती दान करावे.

शनिवारी शनीदेवाच्या मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करावे. तेलाचा दिवा लावावा. शनीची उपासना, शनी स्तोत्राचे २१ वेळा पठण, शनी चालीसा पठण, शनीदर्शन असे उपाय सांगितले जातात. ज्या लोकांना शनी महादशामुळे त्रास होत असेल त्यांनी या शनि धाम यात्रा करणे लाभदायक मानले गेले आहे.

हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत. पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे. पिंपळ पूजन, तेथे नियमितपणे दिवा लावणे, शनीच्या आवडत्या वस्तूंचे अर्पण, दान असेही काही उपाय सांगितले जातात.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.