२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 20:09 IST2025-11-26T19:56:55+5:302025-11-26T20:09:06+5:30
Shani Dev Sade Sati 2026 Impact: २०२६ मध्ये साडेसाती आणि ढिय्या प्रभाव असणाऱ्या राशींना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, असे म्हटले जात आहे. तुमची साडेसाती सुरू आहे का? जाणून घ्या...

Shani Sade Sati 2026 Impact: नवग्रहांमध्ये शनि हा न्यायाधीश ग्रह मानला जातो. आताच्या घडीला शनि हा गुरूचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत विराजमान आहे. जून २०२७ पर्यंत शनि मीन राशीतच विराजमान असणार आहे. सुमारे १४१ दिवस वक्री असलेला शनि २८ नोव्हेंबर २०२५ रोजी मीन राशीत मार्गी होत आहे. असे असले तरी ज्या राशींची साडेसाती आणि ढिय्या प्रभाव सुरू आहे, त्या व्यक्तींवर २०२६ मध्ये शनिचा प्रतिकूल प्रभाव वाढू शकतो, असे म्हटले जात आहे.

आताच्या घडीला कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. मीन राशीचा साडेसातीचा मधला दुसरा टप्पा सुरू आहे. तर मेष राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. तसेच सिंह आणि धनु या राशींवर शनिचा ढिय्या प्रभाव सुरू आहे. या राशींना २०२६ हे वर्ष काहीसे संघर्षमय ठरू शकते, असे सांगितले जाते.

शनि या राशींना कठोर परीक्षेत टाकणार आहेच. करिअर आणि कुटुंबात मोठा ताण निर्माण होऊ शकतो. शनिमुळे काही गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. २०२६ मध्ये शनि कोणत्या राशींसाठी प्रतिकूल काळाचा कारक ठरू शकेल, ५ राशींवर कसा प्रभाव असेल, ते जाणून घेऊया...

मेष: मेष राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. नोव्हेंबर महिन्यात मीन राशीत शनि मार्गी झाल्यानंतर या राशीच्या लोकांसाठी संमिश्र काळ ठरू शकेल. अनेक गुंतागुंतींना तोंड द्यावे लागेल. नवीन समस्या उद्भवू शकतात. जवळच्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात विरोधाचा सामना करावा लागू शकतो. कारकिर्दीबाबत, काही उलथापालथ सहन करावी लागू शकते. शिवाय, शनिचा लोह पाया असेल, ज्यामुळे शारीरिक अस्वस्थता वाढू शकेल. तसेच खर्चात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे.

सिंह: सिंह राशीवर शनि ढिय्या प्रभाव असणार आहे. मीन राशीत मार्गी होणारा शनि समस्याकारक ठरण्याची चिन्हे असल्याचे म्हटले जात आहे. शनिचा लोह पाया असेल, त्यामुळे खर्चात झपाट्याने वाढ होईल. आर्थिकदृष्ट्या उत्पन्नाचे स्रोत मर्यादित होऊ शकतील. या काळात मन काहीसे गोंधळलेले राहू शकते. कौटुंबिक जीवनात कलह आणि संघर्ष वाढू शकेल. मानसिक ताण आणि चिंता जाणवू शकते. आरोग्याबद्दल काळजी वाढू शकते.

धनु: धनु राशीवर शनि ढिय्या प्रभाव असणार आहे. शनि मार्गी झाल्यानंतर २०२६ मध्ये संमिश्र काळ ठरू शकेल. मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कौटुंबिक जीवनात संघर्ष आणि त्रास वाढू शकतात. खर्च वाढू शकतात. शनिचा लोह पाया अनामिक चिंता वाढवू शकतो. अनावश्यक चिडचिड, रागाचे प्रमाण वाढू शकेल. शारीरिक अस्वस्थता जाणवू शकते. नातेवाईकांकडून मनस्ताप होऊ शकतो.

कुंभ: कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. तसेच राहु ग्रह याच राशीत विराजमान आहे. शनि मीन राशीत मार्गी झाल्यानंतर २०२६ चा काळ काहीसा समस्याकारक ठरू शकेल. शनिचा चांदी पाया असेल, त्यामुळे संघर्ष करावा लागू शकतो. कुटुंबात आणि व्यावसायिक जीवनातही मोठ्या प्रमाणात अशांतता येऊ शकते. परंतु, कुंभ रास ही शनिचीच रास असल्यामुळे काही अनुकूलता जाणवू शकेल. अडथळे, समस्या दूर होण्यास मदत होईल.

मीन: मीन राशीचा साडेसातीचा मधला टप्पा, दुसरा टप्पा सुरू आहे. शनि याच राशीत विराजमान आहे. नोव्हेंबर महिन्यात शनि मीन राशीत मार्गी झाल्यावर २०२६ चा काळ संमिश्र ठरू शकतो. शनिचा सुवर्ण पाया असेल, त्यामुळे खर्चात वाढ होऊ शकेल. घरगुती आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक परिस्थितीबद्दल बराच ताण जाणवू शकतो. परंतु, गुरुची शुभ दृष्टी लाभल्याने शुभ प्रभाव वाढू शकतो. नफ्याच्या चांगल्या संधी मिळू शकतात.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

















