शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी पाच नैसर्गिक उपाय सांगताहेत सद्गुरु!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 2:38 PM

1 / 5
संगीत आणि क्रिडा हे दोन्ही मनुष्याच्या आयुष्याचे अविभाज्य घटक असले पाहिजेत. चांगले संगीत आपले भावविश्व समृद्ध करते, तर वेगवेगळे खेळ आपल्यातील खिलाडू वृत्ती वाढवते. मोबाईलमध्ये संगीत आणि खेळ दोन्ही उपलब्ध आहे, परंतु शेवटी त्यात यांत्रिकपणा आहे. संगीत सभांना जाणे, संगीताचे कार्यक्रम ऐकणे, मैफलींमध्ये प्रत्यक्ष जाऊन आनंद घेणे, मोबाईल संगीतात साधत नाही. तसेच मैदानी खेळ, चारचौघांशी भांडणं, मस्करी, थट्टा, तडजोड, घामाच्या धारा यांची सर मोबाईल खेळातून येणार नाही. म्हणून तुम्ही स्वत: हा बदल करा आणि कुटुंबियांकडून करवून घ्या.
2 / 5
सुटी लागली, की चालले आऊटींगला. फिरायला जाणे, हॉटेलमध्ये राहणे, सोशल मीडियावर फोटो टाकणे म्हणजे पर्यटन नाही. तो दिखावा आहे. हा मुखवटा घरी ठेवून निसर्गाच्या सान्निध्यात जा. आकाश, समुद्र, वारा, पाला, पाचोळा, माती यांचा स्पर्शातून अनुभव घ्या. निसर्ग तुम्हाला अनुभवाने समृद्ध करेल. ही सवय मुलांनासुद्धा लावली, तर तीदेखील मोबाईलचे वेड कमी करून निसर्गात रमणे पसंत करतील.
3 / 5
प्राणी पक्षी यांचे नीट अवलोकन केले आहे का? ते आळसावले, तरी फार काळ एका जागी सुस्त पडून राहत नाही. कारण, आपल्या जेवणाची सोय करायला दुसरे कोणी येणार नाही, याची त्यांना खात्री असते. ते जेवण मिळवण्यासाठी कष्ट करतात आणि जेवढे पचेल तेवढेच जेवतात. बाकीचे अन्न तसेच ठेवून निघून जातात. आपणही पचेल, रुचेल तेवढेच खाल्ले पाहिजे. त्यातही नैसर्गिक फळे, भाज्या कच्च्या खाल्या पाहिजेत. त्यामुळे निरुत्साही वाटत नाही. उत्साह दिवसभर टिकून राहूतो.
4 / 5
आपल्या पचनशक्तीनुसार मध मानवत असेल, तर दैनंदिन जीवनात एक चमचा मध अवश्य वापरा. मधाची चव, त्याचे पौष्टिक घटक तुमच्या शरीरासाठी पोषक ठरतील. मधामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. आहारात त्याचा आवर्जून वापर केला पाहिजे.
5 / 5
मनातील घुसमट तुम्हाला आयुष्याचा आनंद घेऊ देणार नाही. तुमच्या विश्वासू व्यक्तीशी बोला, मित्र मैत्रीणींना सांगा, पण मनातली खदखद व्यक्त करा. कोणावरही विश्वास नसेल, तर अगदी मोकळ्या आकाशाला किंवा विस्तीर्ण समुद्राला, उंच डोंगरांना, खोल दरीला, पाना फुलांना वेलींना तुमचे दु:खं सांगा. ते ऐकतील आणि तुम्हाला सावरतील. तुमचे मन मोकळे होईल. मन शांत झाले, की मनाचे आरोग्य सुधारेल. परिणामी शारीरिक आरोग्यही उत्तम राहील.
टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य