Join us  

सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...

सूर्यकुमार यादवने IPL 2024 मध्ये नऊ सामने खेळून १७६.७१ च्या स्ट्राइक रेटने ३३४ धावा केल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 4:35 PM

Open in App

मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) याने त्याच्या फेमस सुपला शॉटच्या मागची स्टोरी सांगितली. Mr 360 म्हणून ओळख असलेल्या सूर्यकुमारने मागील सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी टाकलेले चेंडू मैदानाच्या सर्व कोपऱ्यांवर सहजतेने पोहोचवून शतक झळकावले. याही सामन्यात त्याने पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर सुपला शॉट मारला आणि चाहते यादवच्या 'सुपला' शॉटशी परिचित आहेत. त्याने मुंबईत टेनिस बॉल क्रिकेट खेळताना हा शॉट शोधल्याचे सांगितले.  

“मला वाटते की या शॉटचे नाव मुंबईत खेळल्या जाणाऱ्या स्थानिक टेनिस बॉल क्रिकेटवरून आले आहे. मी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा शॉट खेळायला सुरुवात केली, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा शॉट खूप खेळला जातो. त्यांनी या शॉटशी माझं नाव जोडणे सुरू केले आणि त्याला एक नाव दिले. जेव्हा शॉट खेळला जातो आणि त्याला 'सुपला' शॉट म्हणून संबोधले जाते तेव्हा ते ऐकायला चांगले वाटते,''असे सूर्या JioCinema च्या ‘इन द नेट’ कार्यक्रमात म्हणाला. तो म्हणाला, “शॉटमागची स्टोरी मजेशीर आहे. मी माझ्या शाळेतील मित्रांसोबत सिमेंटच्या ट्रॅकवर क्रिकेट खेळायचो आणि ऑफसाइडला २० मीटरची बाऊंड्री होती, तर उजवीकडे ९०-१०० मीटरची होती. आम्ही पावसाळ्यात रबरी बॉलने खेळायचो आणि बॉल टाकण्यापूर्वी तो ओला करायचो. ते माझ्या गुडघ्यापासून डोक्यापर्यंत चेंडूचा मारा करत असत, त्यामुळे जर तुम्हाला चेंडूचा मार सहन न करता धावा हव्या असतील तर हा शॉट मारता आलाच पाहिजे. जेव्हा जेव्हा लोक मला विचारतात की मी याचा सराव केला आहे की नाही, मी हा शॉट रबर बॉल क्रिकेटमध्ये इतक्या वेळा खेळलो आहे की तो आता माझ्याकडून आपसूकच मारला जातो.'' 

 'सुपला' शॉट मारणे अवघड आहे, पण परिस्थितीने तो शॉट केव्हा आणि कसा वापरायचा हे सूर्याने शोधून काढले आहे. त्याने सांगितले,  “मी जेव्हा ‘सुपला’ शॉट खेळतो तेव्हा खरंतर मी चेंडू अंगावर घेण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा मी उभा राहून फटके मारतो तेव्हा मी चेंडूच्या रेषेत येण्याचा प्रयत्न करतो. जर बॉलची लाईन चुकली तर तो शॉट खेळणे खूप अवघड आहे. मी बॉडी आणि वेळेनुसार बॉल खेळण्याचा प्रयत्न करतो.”

सूर्यकुमार यादवने IPL 2024 मध्ये नऊ सामने खेळून १७६.७१ च्या स्ट्राइक रेटने ३३४ धावा केल्या आहेत. त्याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात नाबाद १०२ धावा केल्या होत्या.  

टॅग्स :आयपीएल २०२४सूर्यकुमार अशोक यादवमुंबई इंडियन्सऑफ द फिल्ड