गजकेसरी राजयोगात राहु-केतु गोचर: १.५ वर्षे एकाच राशीत, ८ राशींचा भाग्योदय; यशच यश, लाभच लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 08:39 IST2025-05-28T08:22:39+5:302025-05-28T08:39:47+5:30

राहु आणि केतु राशी परिवर्तन करणार असून, पुढील सुमारे दीड वर्ष त्याच राशीत असणार आहेत. तुमची रास कोणती? कसा असेल तुमच्यावरील प्रभाव? जाणून घ्या...

२९ मे २०२५ रोजी रात्री १०.२६ मिनिटांनी राहु आणि केतु यांचे राशी परिवर्तन होणार आहे. राहु आणि केतु कायम वक्री चलनाने गोचर करत असतात. विद्यमान घडीला राहु आणि केतु अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत आहेत. तर २९ मे रोजी राहु वक्री चलनाने कुंभ राशीत, तर केतु वक्री चलनाने सिंह राशीत प्रवेश करत आहे.

राहु आणि केतु आता पुढील १८ महिने कुंभ आणि सिंह राशीत असणार आहे. राहु आणि केतु एकमेकांपासून कायम समसप्तक स्थानी असतात. त्यामुळे राहु केतु यांचा समसप्तक योग जुळून येत असतो. राहु आणि केतु यांचे गोचर अत्यंत प्रभावी मानले जाते.

विशेष म्हणजे या दिवशी अत्यंत शुभ मानला गेलेला गजकेसरी राजयोग जुळून आलेला आहे. राहु आणि केतु यांच्या गोचराचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जून महिन्याची सुरुवात कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरू शकेल? जाणून घेऊया...

मेष: अनेक जटिल प्रश्न सुटण्यास सुरुवात होईल. प्रलंबित कामे आटोक्यात येतील. त्यामुळे तुम्हाला हलके वाटेल. फार घाईघाईत कामे उरकण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे एखादे नुकसान होऊ शकते. जमिनीच्या व्यवहारात विचारपूर्वक निर्णय घ्यावा. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जवळच्या सहलीला जाऊन याल. व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत मोठी संधी मिळेल. त्या दृष्टीने शुक्रवार, शनिवार हे दिवस महत्त्वाचे ठरतील.

वृषभ: काही अडचणी असतील. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. प्रलंबित कामे मार्गी लागतील. मित्रमंडळींशी चर्चा करा. त्यामुळे नवीन मार्ग मिळेल. प्रश्नांची उत्तरे मिळतील. गुरुवार, शुक्रवार धन स्थानातील गुरू-चंद्र युतीमुळे शुभ फळे मिळतील. धनलाभ होईल. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. शनिवारी मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. बाजारपेठेचा अभ्यास करा.

मिथुन: अति आत्मविश्वास बाळगू नका. हाती आलेला पैसा खर्च करण्याकडे कल राहील. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. गुरुवारपासून अनुकूल वातावरण राहील. अनेक अडचणी दूर होतील. मनात आनंदी विचार राहतील. प्रेमात असणाऱ्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू मिळेल. शनिवारी एखाद्या वारसा हक्काने मिळणाऱ्या उत्पन्नाचा लाभ होईल.

कर्क: ग्रहमानाची चांगली साथ राहील. नोकरीत महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. प्रगतीसाठी पूरक वातावरण राहील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. आर्थिक व्यवहार करताना खबरदारी घ्यावी. कुणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल. एखाद्या बाबतीत अपेक्षाभंग होऊ शकतो. गुरुवार, शुक्रवार मनात आध्यात्मिक विचार राहतील. देवदर्शनाच्या निमित्ताने प्रवास होईल. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. मनावरील ताण निघून जाईल.

सिंह: अपेक्षित अनुकूल फळे मिळतील. थोडी दगदग करावी लागेल. संयमाने वागण्याची गरज आहे. कार्यक्षेत्रात मोठी जबाबदारी राहील. लोक हरभऱ्याच्या झाडावर बसवून आपली कामे करून घेण्याचा प्रयत्न करतील. आश्वासने देऊ नका. झेपतील तेवढीच कामे करा. घरातील कामांसाठी वेळ द्यावा लागेल. धनलक्ष्मीची कृपा राहील. वाहन जपून चालवा.

कन्या: ग्रहमान संमिश्र राहील. फार दगदग होईल, अशी कामे अंगावर ओढवून घेऊ नका. वाहन जपून चालवा. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. मोठी जबाबदारी पार पाडताना लोकांच्या टोमण्यांकडे लक्ष देत बसू नका. जबाबदारी नेटाने पूर्ण करा. अनुकूलता अनुभवायला मिळेल. नोकरीत नवीन व मोठी संधी मिळेल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. मोठा फायदा होईल.

तूळ: थोडी खबरदारी घेतली पाहिजे. वाहन जपून चालवा. इतरांच्या भानगडीत पडू नका. कामावर लक्ष केंद्रित करा. अनुकूलता बाजूने राहील. समाजात तुमचा मान वाढेल. प्रसिद्धी, मान-सन्मान मिळेल. शैक्षणिक प्रगती पुस्तक झळकते राहील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. पर्यटनाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल.

वृश्चिक: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. योजना गुप्त ठेवा. आरोग्याची काळजी घ्यावी. व्यवसायात थोडे जपून निर्णय घ्यावे. तरुण वर्गाने संयमाने वागण्याची गरज आहे. या काळात कुणी मोहाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करेल. गुरुवार, शुक्रवार अचानक धनलाभ होऊ शकतो. वाहन जपून चालवा. शनिवारी एखादी चांगली बातमी कळेल. त्यामुळे मन आनंदून जाईल.

धनु: काही कामात अडथळे येतील, तर काही कामे सोप्या पद्धतीने होऊन जातील. कुणाच्या भरवशावर राहून मोठी जबाबदारी पत्करू नका. काही लोक अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. योजना लोकांना सांगत बसू नका. आरोग्याची काळजी घ्यावी. गुरुवार, शुक्रवार काही चांगली फळे मिळतील. व्यवसायात भरभराट होईल. मनात आनंदी विचार राहतील. वाहन हळू चालवा.

मकर: जनसंपर्क चांगला राहील. सतत लोकांच्या भेटीगाठी होतील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. नोकरीत नवीन संधीची चाहूल लागेल. एखादी चांगली बातमी कळेल. अडलेली कामे मार्गी लागतील. सार्वजनिक कार्यात सहभागी होताना मूल्यवान वस्तू, कागदपत्रे सांभाळा. आरोग्याची काळजी घ्यावी. पोट बिघडेल एवढा जेवणावर आडवा हात मारू नका. ओळखीचे फायदे होतील.

कुंभ: यशच यश मिळेल. व्यवसाय, नोकरी, मुलांचे यश इत्यादी बाबतीत अनुकूलता अनुभवायला मिळेल. नवीन नोकरीसाठी अर्ज केलेला असेल, तर मुलाखतीचे बोलावणे येईल. थोड्याच प्रयत्नांत यश मिळेल. घरातील सदस्यांशी समन्वय ठेवा. घरातील कामांसाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ द्यावा लागेल. अनपेक्षित पाहुणे मंडळी येतील. त्यामुळे महिला वर्गाची तारांबळ उडेल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. समाजात मान वाढेल.

मीन: धनलाभ, नोकरीतील प्रगती, घराशी संबंधित कामे, शिक्षण इत्यादी अनेक बाबतीत सफलता मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. व्यवसायात थोडे सावधपणे वागण्याची गरज आहे. मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. गुरुवार, शुक्रवार नोकरीत अनुकूल बदल होतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.