Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांचे पाच पांडव: कुणी होता लष्करी अधिकारी, तर कुणी सोडली लाखोंची नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 15:46 IST2025-10-16T14:58:53+5:302025-10-16T15:46:24+5:30
वृंदावनचे प्रेमानंद महाराज त्यांच्या प्रवचनाने, निखळ हास्याने, सकारात्मक विचारांनी नेटकऱ्यांची मने जिंकतात, तर कधी त्यांच्या आजारामुळेही चर्चेत असतात. त्यांच्या व्हिडीओमधले काही चेहरे तर आता तुमच्याही परिचयाचे झाले असतील. जे प्रेमानंद महाराजांचे पाच पट्ट शिष्य आहेत, ज्यांना पाच पांडव म्हणूनही ओळखले जाते. हे पाच शिष्य साधे सुधे नसून ऐहिक सुखाचा त्याग करून वृंदावनवासी झाले आहेत.

प्रेमानंद महाराजांच्या प्रवचनाची मोहिनी लोकांवर आहेच, कारण लोकांच्या मनातले प्रश्न आणि त्यावर समाधानकारक उत्तरं त्यांच्याकडून मिळतात. प्रेमानंद महाराजांच्या अशाच प्रवचनाचा सकारात्मक परिणाम होऊन त्यांच्या या पाच शिष्यांनी मोह मायेचे जग, मोठा हुद्दा, लाखोंची नोकरी सोडून महाराजांचे शिष्यत्त्व पत्करले आहे. त्या पाच शिष्यांबद्दल सविस्तर जाणून घेउ.
प्रेमानंद महाराजांच्या सत्संगात दररोज हजारो भाविकांची गर्दी होते. अनेकदा विराट कोहली, अनुष्का शर्मा यांच्यासारखे सेलिब्रेटी भक्तदेखील येतात. परंतु, महाराजांच्या सोबत नेहमी त्यांची सावली बनून असणारे त्यांचे पाच खास शिष्य नेहमीच चर्चेचा विषय असतात.
१. नवलनागरी बाबा (माजी लष्करी अधिकारी) : पंजाबमधील पठाणकोटचे रहिवासी असलेले नवलनागरी बाबा यांनी २००८ ते २०१७ पर्यंत भारतीय सेनेत सेवा केली. त्यांनी कारगिल सारख्या संवेदनशील भागांमध्येही देशसेवा केली आहे. मात्र २०१६ मध्ये वृंदावनमध्ये येऊन त्यांनी प्रेमानंद महाराजांचे सत्संग ऐकले आणि महाराजांच्या प्रवचनातून इतके प्रभावित झाले की, २०१७ मध्ये त्यांनी देशसेवेला पूर्णविराम देऊन साधू जीवन स्वीकारले. आज ते महाराजांच्या अत्यंत जवळच्या शिष्यांपैकी एक आहेत आणि अनेकदा भक्तांचे प्रश्न महाराजांना वाचून दाखवतात.
२. अलबेली शरण बाबा (माजी चार्टर्ड अकाउंटंट – CA) : कॉर्पोरेट क्षेत्रात उच्च पद आणि उच्च शिक्षण घेतलेले अलबेली बाबा हे मूळचे दिल्लीचे रहिवासी आहेत. ते त्यांच्या क्षेत्रात अत्यंत यशस्वी होते. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यही याच व्यवसायात होते. मात्र व्यावसायिक यश मिळूनही त्यांना जीवनात मन:शांती मिळत नव्हती. प्रेमानंद महाराजांच्या सत्संगातून त्यांना जीवनाचा खरा उद्देश भक्ती असल्याचे जाणवले. त्यांनी आपले यशस्वी कॉर्पोरेट जीवन सोडून भक्तीचा मार्ग निवडला आणि महाराजांच्या सेवेत स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले.
३. महामाधुरी बाबा (माजी असिस्टंट प्रोफेसर) : उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथून आलेले महामाधुरी बाबा हे एक शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते आणि त्यांचे आयुष्य सामान्यपणे सुरू होते. प्रेमानंद महाराजांच्या संपर्कात आल्यावर त्यांना अध्यात्म आणि भगवंताची भक्ती हाच जीवनाचा खरा मार्ग असल्याचे जाणवले. त्यांनी आपली प्राध्यापकाची नोकरी सोडली आणि वृंदावनमध्ये राहून महाराजांचे शिष्य बनून त्यांची सेवा करण्याचा निर्णय घेतला.
४. श्याम सुखदानी बाबा (माजी इंजिनिअर) : ते नात्यामध्ये महाराजांचे पुतणे लागतात आणि त्यांचा जन्म महाराजांच्याच गावात झाला होता. त्यांना लहानपणापासूनच महाराजांच्या कथा ऐकून प्रेरणा मिळाली होती. त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून नोकरी केली. मात्र त्यांचे मन अध्यात्माकडे धाव घेत असल्याने त्यांनी महाराजांची दीक्षा घेतली आणि आता ते सतत महाराजांच्या सोबतच राहतात. ते महाराजांच्या प्रत्येक खाजगी सेवांमध्ये उपस्थित असतात.
५. आनंद प्रसाद बाबा (माजी व्यावसायिक) : आनंद प्रसाद बाबा हे दिल्लीतील एक यशस्वी व्यापारी होते आणि त्यांचा व्यवसाय खूप चांगला चालत होता. महाराजांचे प्रवचन ऐकल्यावर त्यांची सांसारिक आसक्ती कमी झाली आणि त्यांनी आपला मोठा व्यापार सोडून प्रेमानंद महाराजांचा आश्रय घेतला. त्यांचे मत आहे की, खरी शांती आणि सुख हे भौतिक सुखांमध्ये नसून, ईश्वर भक्ती आणि गुरुसेवेत आहे.
या पाच 'पांडवांनी' आपल्या सुख-आरामदायी जीवनाचा त्याग करून एक साधे आणि निस्वार्थ जीवन स्वीकारले आहे. त्यांचे एकमेव लक्ष्य गुरुंची सेवा करणे आणि राधा राणीची भक्ती करणे हे आहे. ते महाराजांच्या आश्रमातील सर्व कामांची आणि त्यांच्या देखभालीची जबाबदारी सांभाळतात, ज्यामुळे महाराज पूर्णपणे भक्तांच्या कल्याणावर आणि सत्संगावर लक्ष केंद्रित करू शकतात. या भक्तांची कहाणी लाखो लोकांसाठी एक मोठी आध्यात्मिक प्रेरणा आहे. महाराजांच्या चमूत आणखी अशा अनेक भक्तांची भर पडली आहे आणि त्यांचा सत्संग परिवार वाढत चालला आहे.