Pitru Paksha 2021: पितृपक्षातील श्राद्ध विधी करण्याचा अधिकार मुलींना आहे का? पाहा, शास्त्र काय सांगते...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 11:41 AM2021-09-23T11:41:17+5:302021-09-23T11:46:06+5:30

Pitru Paksha 2021: आपल्याकडे श्राद्ध विधी करण्याचा अधिकार कन्या किंवा मुलींना आहे का, याबाबतही काही समजुती आहेत.

चातुर्मासातील सण-उत्सव, व्रत-वैकल्यांएवढेच महत्त्व असलेला पंधरवडा म्हणजे पितृपक्ष. भाद्रपद महिन्यातील वद्य पक्ष हा पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी विशेष करून राखून ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. श्रद्धापूर्वक केले जाणारे पूर्वजांचे स्मरण म्हणजेच श्राद्ध याच कालावधीत केले जाते.

रामायण आणि महाभारतातही पितृपक्षात श्राद्ध विधी केल्याचे उल्लेख प्राचीन ग्रथांमध्ये आढळून येतात. पितृपक्ष आणि करण्यात येणाऱ्या श्राद्ध तर्पण विधींबाबत आपल्याकडे अनेक समजुती, मान्यता, धारणा आहेत. अनेक ठिकाणी पितृपक्ष अशुभ मानला जातो. (Pitru Paksha 2021)

या काळात नवीन वस्त्रे, नवीन दागिने, नवीन वाहने, नवीन वस्तू खरेदी करू नयेत, असे सांगितले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, या गोष्टींचा काहीही आधार नाही. पितृपक्ष हा अशुभ मानण्याचे काहीच कारण नाही. त्यामुळे पितृपक्ष अशुभ मानू नये, असे सांगितले जाते. मात्र, या कालावधीत काही कार्ये केली जात नाहीत, असे शास्त्र सांगते. (garuda purana)

आपल्याकडे श्राद्ध विधी करण्याचा अधिकार कन्या किंवा मुलींना आहे का, याबाबतही काही समजुती आहेत. आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रभाव अधिक असल्यामुळे कोणतेही कार्य हे शक्यतो मुलगा, नवरा, भाऊ आदींकडून केले जाते. (pitru pandharwada 2021)

अन्य सर्व क्षेत्रात महिला वर्ग पुरुषांच्या खांद्याला लावून काम करताना दिसत असताना मात्र काही धार्मिक कार्ये केवळ घरातील पुरुष करताना दिसतात. सध्या सुरू असलेल्या पितृपक्षाबाबत बोलायचे झाले, तर श्राद्ध तर्पण विधी करण्याचे अधिकार घरातील मुलींना आहेत की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते.

पुराणातील दाखल्यांचा विचार केल्यास घरातील मुलांप्रमाणे मुलीही श्राद्ध विधी करू शकतात. मुलींनी श्राद्ध विधी करू नयेत, असा उल्लेख कुठेही आढळून येत नाही, असे सांगितले जाते. वाल्मिकी रामायणात महिला श्राद्ध करू शकतात, असा उल्लेख आलेला आढळतो. याचे प्रमाण म्हणून सीता देवीने राजा दशरथाच्या नावाने श्राद्ध विधी केल्याचा एक प्रसंग दिसून येतो.

श्रीराम, लक्ष्मण आणि सीता वनवासात भोगत असताना पितृपक्षाच्या कालावधीत राजा दशरथाच्या नावाने श्राद्ध विधी करण्यासाठी गया धाम येथे गेले होते. गया येथे श्रीरामांनी लक्ष्मण आणि सीता देवी यांच्या उपस्थितीत दशरथ राजाच्या नावाने पिंडदान केले होते, त्यामुळे त्यांना मुक्ती मिळाली असे सांगितले जाते. श्रीराम आणि लक्ष्मण श्राद्धाचे साहित्य आणण्यासाठी नगरात गेले.

मात्र, काही कारणास्तव त्यांना परतण्यास विलंब होत होता. श्राद्ध करण्याच्या ठिकाणी देवी सीता एकटीच होती. वेळ निघून जात असल्यामुळे राजा दशरथांनी सीता देवीला दर्शन देत श्राद्ध विधी करण्याची विनंती केली. सीता देवीने रेतीचे पिंड तयार केले. फल्गु नदी, अक्षय वड, एक ब्राह्मण, तुळस आणि गोमातेला साक्षी मानून सीता देवीने पिंडदान केले.

श्रीराम आणि लक्ष्मण पोहोचल्यावर सीतेने हकीकत सांगितली. यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण यांनी दशरथ राजाच्या नावाने पिंडदान केले, अशी कथा आढळते. गरुड पुराणात पितृपक्ष पंधरवड्यातील श्राद्ध विधी कोण करू शकते, याबाबत सविस्तर विवेचन केल्याचे आढळते. गरुड पुराणातील ११, १२, १३ आणि १४ व्या श्लोकात याबाबत उल्लेख करण्यात आला आहे.

'पुत्राभावे वधु कूर्यात, भार्याभावे च सोदन:। शिष्‍यों वा ब्राह्मण: सपिण्‍डो वा समाचरेत।। ज्‍येष्‍ठस्‍य वा कनिष्‍ठस्‍य भ्रातृ: पुत्रश्‍च: पौत्रके। श्राध्‍यामात्रदिकम कार्य पुत्रहीनेत खग:।।' या श्लोकाचा अर्थ असा की, ज्येष्ठ किंवा कनिष्ठ, पुत्राच्या अनुपस्थितीत सून, पत्नी श्राद्ध विधी करू शकतात.

यामध्ये ज्येष्ठ कन्या किंवा एकुलती एक कन्या यांचाही समावेश करण्यात आला आहे. पत्नीचे निधन झाले असल्यास किंवा तिच्या अनुपस्थितीत सख्खा भाऊ, भाचा, नातू, नात श्राद्ध विधी करू शकतात. यापैकी कुणीही उपस्थित किंवा उपलब्ध नसल्यास शिष्य, मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट श्राद्धविधी करू शकतात.

यापैकीही कोणी उपस्थित किंवा उपलब्ध नसल्यास कुळाच्या पुरोहितांना त्या कुटुंबातील पूर्वजांच्या नावाने श्राद्ध विधी करण्याचा अधिकार प्राप्त होतो, असे गरुड पुराण सांगते. याचाच दुसरा अर्थ असा की, घरातील पुरुष उपस्थित नसेल, तर महिलांना श्राद्ध विधी करण्याचा अधिकार आहे, असे सांगितले जाते.