२०२५ची षट्तिला एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी-नारायणाची कृपा, इच्छापूर्तीचा लाभ; यशाचा वरदान काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 14:37 IST2025-01-23T14:21:36+5:302025-01-23T14:37:26+5:30

पौष महिन्यातील षट्तिला एकादशी अनेकार्थाने महत्त्वाची मानली जात आहे. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या...

२०२५ मध्ये पौष महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानंतर आता पौष महिन्याच्या वद्य पक्षातील षट्तिला एकादशी साजरी करण्यात येत आहे. शनिवार, २५ जानेवारी २०२५ रोजी षट्तिला एकादशी असू, या दिवशी व्रताचरण केले जाणार आहे. पद्म पुराणात षटतिला एकादशीची व्रत कथा आढळते.

पौष मासात थंडीचे विशेष प्राबल्य असते. त्या थंडीपासून आपले आरोग्य नीट राखले जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी या महिन्यात तिळाचा विशेष उपयोग विविध व्रतांमध्ये कसा केला जाईल, हे बघितले आहे. त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे ही षट्तिला एकादशी. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशी तिथी आणि व्रताचरणांचे महात्म्य वेगवेगळे पण तितकेच महत्त्वाचे असे आहे. इतर एकादशीप्रमाणे या व्रताचा विधी आहे.

या व्रताला तिलधीव्रत असेही म्हटले जाते. तिळमिश्रित पाण्याने स्नान करावे, तिळांचे हवन करावे, तीळ घातलेले पाणी प्यावे. तीळ घातलेल्या पाण्याचे दान करावे. तीळ असलेल्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. असा सहा तऱ्हेने तिळाचा वापर या षटतिला एकादशीच्या व्रतानिमित्ताने आवर्जून केला जातो. षट्तिला एकादशीला असलेली एकूणच ग्रहस्थिती पाहता, कोणत्या राशींना षट्तिला एकादशी सुख-सौभाग्यदायी ठरू शकेल, ते जाणून घेऊया...

मेष: थोडी दगदग होईल. आरोग्याच्या किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी असतील. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. भावंडांशी वाद होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. कामाचा ताण कमी होईल. प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागण्याची गरज आहे. संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.

वृषभ: एखादी चांगली बातमी कळेल. त्यामुळे उत्साह वाढेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. सामाजिक मान-सन्मान मिळेल. महत्त्वाच्या कामात थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. तिखट व मसालेदार पदार्थ खाणे टाळा. वडिलधाऱ्या मंडळींचा मान राखा. आर्थिक उलाढाली करताना थोडे सतर्क राहण्याची गरज आहे. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील.

मिथुन: सतत कशात ना कशात व्यस्त राहाल. कार्यक्षेत्रात काही अडचणी असतील. कामातील अनपेक्षित बदलांबाबत सकारात्मक पद्धतीने विचार करा. हळूहळू अडचणी दूर होतील. एखाद्या उपक्रमात फायदा होईल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. योजना गुप्त ठेवा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

कर्क: कार्यक्षेत्रात जबाबदारी वाढेल. कामे आटोक्यात आणण्यासाठी सतत प्रयत्न करत राहाल. ओळखीच्या लोकांच्या सहकार्यामुळे अडचणी दूर होतील. बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च कमी करण्याकडे लक्ष द्यावे. मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. भावंडांच्या भेटीगाठी होतील. गैरसमज होऊ शकतात. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील.

सिंह: कार्यक्षेत्रात कामगिरीचा ठसा उमटेल. अतिशय उत्साहाने कामे कराल. धनलक्ष्मीची कृपा राहील. अडलेली कामे मार्गी लागतील. व्यवसायात भरभराट होईल. मालाची विक्री चांगली होईल. मोठी गुंतवणूक करताना जाणकार मंडळींचा सल्ला घ्यावा. भावंडांचे चांगले सहकार्य मिळेल. नोकरीत अचानक मोठी संधी मिळेल. घरात कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा.

कन्या: वैचारिक संभ्रम राहू शकतो. जीवनसाथीशी गैरसमज होऊ शकतात. थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. कालांतराने परिस्थिती तुमच्या आटोक्यात येईल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. आवडत्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेता येईल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी वेळ द्याल.

तूळ: यशच यश मिळेल. सावधपणे वागण्याची गरज आहे. कायद्याची बंधने पाळा. इतरांच्या भानगडीत पडू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. मनात आनंदी विचार राहतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. आवडते भोजन मिळेल. महत्त्वाची कामे होतील. सामाजिक कार्यात तुमच्यावर मोठी जबाबदारी राहील. मात्र, लोक चुकांकडे बोट दाखवतील.

वृश्चिक: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. पैसा मिळेल आणि खर्चही होईल. धनप्राप्तीसाठी बरेच परिश्रम करावे लागतील. आर्थिक देवाणघेवाण करताना खबरदारी घ्यावी. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ काढा.

धनु: व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. नोकरीत कामाचा ताण राहील. एखाद्या नवीन जबाबदारीत गुंतलेले राहाल. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतील. त्यांची चांगली साथ राहील. अनावश्यक खर्चाला कात्री लावा. जीवनसाथीशी सबुरीने वागा.

मकर: उत्साहात राहील. लोकांच्या भेटीगाठी होतील. काहींना अचानक प्रवास करावा लागेल. नोकरीत अनुकूल बदल होऊ शकतात. पगारवाढ व इतर अनेक लाभ होतील. घरातील सदस्यांशी काही कारणाने वाद होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. त्याबाबत बेपर्वाई नको. काही लोक विरोधात कारवाया करतील.

कुंभ: थोडी दगदग होईल. वाहने जपून चालवा. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. इतरांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. लवकरच परिस्थिती आटोक्यात येईल. अडचणी दूर होतील. नशिबाचा कौल बाजूने राहील. पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नका. त्यांच्याशी संवाद ठेवा. त्यांची काळजी घ्यावी. नोकरीत नवीन संधी मिळेल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.

मीन: साधकबाधक अनुभव येतील. मनात काही शंका असतील. खूप विचार करत बसू नका. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. आव्हानात्मक परिस्थिती उभी करेल. घरात वाद होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.