Numerology Gudi Padwa 2023: तुमचा मूलांक कोणता? ‘या’ ७ मूलांकाना लाभच लाभ, पैसा-प्रतिष्ठेत वृद्धी; गुढी पाडवा यश देईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 08:02 AM2023-03-20T08:02:06+5:302023-03-20T08:02:06+5:30

Numerology Gudi Padwa 2023: गुढी पाडव्याचा काळ काही मूलांकांच्या व्यक्तींना यश, प्रगतीकारक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. तुमच्यावर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून काढल्या जाणाऱ्या मूलांकाच्या माध्यमातून भविष्यकथन केले जाते. एखाद्या व्यक्तीबाबत त्या व्यक्तीच्या मूलांकावरून अंदाज बांधता येऊ शकतात. नवग्रहांना जसे राशींचे स्वामित्व देण्यात आले आहे, तसेच नवग्रहांना मूलांकांचेही स्वामित्व प्रदान करण्यात आले आहे. गुढी पाडव्यापासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात होत आहे.

मराठी नववर्षाला सुरुवात होत आहे. १९४५ शालिवाहन शक सुरू होत असून, यंदाचे शोभन नामक संवत्सर सुरु होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, यात सर्व ग्रहांचे राजे, मंत्री, सेनापती यांची स्थिती बदलत आहे. यासोबतच ५ ग्रहांचा शुभ संयोग तयार होत आहे. नवीन वर्षाची सुरुवात होताना मीन राशीत गुरु, सूर्य आणि बुध ग्रह विराजमान असतील. मेष राशीत शुक्र आणि राहु विराजमान असतील. मिथुन राशीत मंगळ, तूळ राशीत केतु आणि मकर राशीत शनी विराजमान असेल. गुढी पाडव्याला चंद्र मीन राशीत असेल.

एकूणच ग्रहस्थितीचा अंकशास्त्रातील मूलांकांवरही परिणाम पाहायला मिळू शकेल. तुमचा मूलांक कोणता, गुढी पाडव्याचा काळ तुमच्यासाठी कसा असेल, कोणत्या मूलांकांच्या व्यक्तींना चैत्री नवरात्र उत्तम ठरू शकेल, काही मूलांकांना आगामी काळात आर्थिक लाभ, कौटुंबिक जीवनात आनंद मिळू शकतो, असे म्हटले जात जाणून घेऊया...

ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. या मूलांकाच्या व्यक्तींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. उत्साह वाढू शकेल. लव्ह लाइफ छान असेल, कुठेतरी फिरण्याचा प्लॅन बनू शकतो. नोकरदारांना कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर उपयुक्तता सिद्ध करण्यात यशस्वी होऊ शकतील. मात्र, वाहन चालवताना अतिशय काळजी घ्यावी लागेल.

ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. या मूलांकाच्या व्यक्तींना आगामी काळ मनःशांती देणारा ठरू शकेल. सर्व कामे शांततेने आणि स्थिर मनाने यशस्वीपणे पार पडू शकतील. वैवाहिक जीवनात सहकार्याची वृत्ती आनंद देईल. वकिली आणि सरकारशी संबंधित काम फायदेशीर सिद्ध होऊ शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. या मूलांकाच्या व्यक्तींना हा काळ अनुकूल ठरू शकेल. एकामागून एक कामे पार पडतील. मित्रांसोबत बाहेर जाण्याचा प्लॅन बनवता येऊ शकेल. पत्रकारितेशी संबंधित लोकांना काही मोठी संधी मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्यावी.

ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. या मूलांकाच्या व्यक्तींना हा काळ चांगला ठरू शकेल. सहकार्याची वृत्तीने कामात निपुणता येऊ शकेल. कार्यपद्धतीने लोक प्रभावित होतील. कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. ट्रेडिंग आणि डिजिटल मार्केटिंगच्या कामात अपेक्षित यश मिळू शकेल. वैवाहिक जीवन संतुलित आणि सामंजस्यपूर्ण असू शकेल. मानसिक शांतता लाभू शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. या मूलांकाच्या व्यक्तींनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कुटुंबाचा पाठिंबा कामात यश देऊ शकेल. मित्रांच्या मदतीने समस्यांवर मात करू शकाल. पैसा आणि मालमत्तेशी संबंधित जुने प्रकरण निकाली निघू शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. या मूलांकाच्या व्यक्तींना हा काळ अतिशय चांगल्या वातावरणात जाऊ शकेल. मुलांच्या बाजूने काही विशेष यश किंवा लाभ मिळू शकतो. केमिकल आणि कॉस्मेटिक कामाशी संबंधित लोकांना लाभाची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी. बदलत्या हवामानाचा त्रास होऊ शकतो.

ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. या मूलांकाच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी व्यक्तिमत्वाचा प्रभाव दिसून येईल. वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित होऊ शकतील. मित्रांच्या मदतीने आर्थिक प्रश्न सुटू शकतील. लव्ह लाईफ छान असू शकेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. या मूलांकाच्या व्यक्तींना हा काळ आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकेल. आर्थिक आघाडीमुळे मन विचलित होईल. मात्र, कालांतराने ही समस्याही सुटू शकेल. कला आणि लेखन क्षेत्राशी संबंधित व्यक्तींचे कौतुक होऊ शकेल. वैवाहिक जीवनात विश्वास आणि समर्पणाचे प्रमाण दोन्ही बाजूंनी वाढेल. घरातील वातावरणही प्रसन्न राहील.

ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. या मूलांकाच्या व्यक्तींना हा काळ गती देणारा ठरू शकेल. नवीन व्यक्तीची ओळख फायदेशीर ठरू शकेल. वाढत्या कर्जामुळे मन विचलित होऊ शकते. समाधानाचे विचार मनात येत राहतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.