Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक स्वभावाने तीळगुळाहून गोड, पण चिडले की समोरच्यावर संक्रांत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 11:37 IST2026-01-14T11:35:06+5:302026-01-14T11:37:46+5:30
Numerology: ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्मतारखेवर (मूलांकावर) अवलंबून असतो. काही तारखांना जन्मलेले लोक दिसायला किंवा वागायला अत्यंत प्रेमळ आणि मऊ असतात, पण त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला की ते रौद्र रूप धारण करू शकतात. मकर संक्रांतीच्या(Makar Sankranti 2026) निमित्ताने, अशाच काही 'तीळगुळ' स्वभावाच्या आणि तितक्याच कडक शिस्तीच्या जन्मतारखांविषयीचा हा रंजक लेख.

मकर संक्रांतीला आपण म्हणतो, "तिळगुळ घ्या, गोड बोला!" पण काही लोक जन्मतःच असे असतात की ज्यांच्याशी बोलताना तुम्हाला नेहमीच गोडवा जाणवेल. मात्र, या गोडव्याच्या मागे एक तीव्र स्वाभिमान आणि रागही दडलेला असतो. अंकशास्त्रानुसार (Numerology) कोणत्या लोकांमध्ये हे वैशिष्ट्य प्रकर्षाने जाणवते ते पाहू.

१. मूलांक १: ( जन्मतारीख १, १०, १९, २८)
या तारखांना जन्मलेले लोक सूर्याच्या प्रभावाखाली असतात. हे लोक स्वभावाने खूप उदार, मदतीला धावून जाणारे आणि बोलण्यात गोड असतात. जोपर्यंत तुम्ही त्यांचा आदर राखता, तोपर्यंत ते तुमच्यासाठी तिळगुळासारखे मऊ राहतील. पण जर त्यांच्या आत्मसन्मानाला कोणी धक्का लावला, तर मात्र हे लोक समोरच्यावर 'संक्रांत' आणल्याशिवाय राहत नाहीत. त्यांचा राग सूर्यासारखा प्रखर असतो.

२. मूलांक २: (जन्मतारीख २, ११, २०, २९)
या लोकांचा स्वामी 'चंद्र' असतो. हे लोक अत्यंत संवेदनशील, हळवे आणि प्रेमळ असतात. त्यांच्या स्वभावात एक प्रकारची शीतलता आणि गोडवा असतो. मात्र, त्यांचा एक स्वभावगुण म्हणजे ते लवकर दुखावले जातात. जर कोणी यांच्या विश्वासाला तडा दिला, तर हे शांत राहून असा काही वार करतात की समोरच्याला सावरणं कठीण होतं. यांचा राग शांत असतो पण तो खूप खोलवर परिणाम करतो.

३. मूलांक ९: (जन्मतारीख ९, १८ ,२७)
या लोकांचा स्वामी 'मंगळ' आहे. हे लोक मनाने खूप स्वच्छ आणि आपल्या माणसांसाठी काहीही करायला तयार असतात. बाहेरून कठोर वाटले तरी आतून हे लोक खूप हळवे आणि गोड असतात. पण ९ तारखेच्या लोकांचा राग म्हणजे जणू ज्वालामुखी! अन्यायाविरुद्ध हे लोक चवताळून उठतात. एकदा का यांचा पारा चढला की, समोरची व्यक्ती कितीही मोठी असली तरी हे त्याला सोडत नाहीत.

या लोकांशी वागताना: यांचा गोडवा टिकवून ठेवायचा असेल तर यांच्याशी नेहमी प्रामाणिक राहा. अन्यथा गोड बोलणारे, शांत राहणारे कधी तुमच्या मुळावर घाव घालतील सांगता येत नाही. या तारखेच्या लोकांनी संक्रांतीच्या काळात तिळाचे दान करावे, ज्यामुळे मनाला शांती मिळते आणि रागावर नियंत्रण राहते.

















