बुधाचा मीन प्रवेश: ‘या’ ६ राशींना कमाईची बंपर संधी; बुधादित्य त्रिग्रही योगाचा लाभच लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 05:05 AM2023-03-17T05:05:05+5:302023-03-17T05:05:05+5:30

बुधाचा गुरुच्या राशीतील प्रवेश आणि बुधादित्य त्रिग्रही योग तुमच्या राशीसाठी कसा ठरू शकेल? जाणून घ्या...

नवग्रहांचा राजा सूर्याने मीन राशीत प्रवेश केल्यानंतर लगेचच आता नवग्रहांचा राजकुमार बुध मीन राशीत प्रवेश करत आहे. सूर्य आणि बुधाचा युती योग जुळून येत असून, बुधादित्य नावाचा राजयोगही जुळून येत आहे. बुध आणि सूर्यासह मीन राशीचा स्वामी गुरुही याच राशीत विराजमान आहे.

काही दिवसांपूर्वी बुध अस्तंगत झाला होता. यानंतर आता ३१ मार्च रोजी बुध मीन राशीतून मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत प्रवेश करणार आहे. या कालावधीत गुरु, सूर्य आणि बुधाचा त्रिग्रही योग जुळून येत आहे. बुधाचा मीन राशीतील प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

बुधादित्य योग, त्रिग्रही योग आणि बुधाचा मीन प्रवेश तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशींना याचे शुभ फल प्राप्त होऊ शकेल? कोणत्या राशींना आगामी सुमारे १५ दिवसांचा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल? जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना बुधाचा मीन प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. काहीही बोलण्यापूर्वी विचार करावा. काही कारणाने समस्यांचा सामना करावा लागू शकेल. स्वभावातील आक्रमकता वाढू शकते. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील. मामाकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल. शक्य असेल तर दर बुधवारी गणेशाला दुर्वा अर्पण कराव्या.

वृषभ राशीच्या व्यक्तींना बुधाचा मीन प्रवेश शुभ ठरू शकेल. बुधादित्य योगाने लाभ आणि प्रगती प्राप्त करू शकाल. हा काळ यशाचा काळ ठरू शकतो. करिअरच्या बाबतीत उत्तम संधी मिळू शकेल. दुसरीकडे खर्च वाढू शकतील. गुंतवणूक करण्याचा विचार पुढे ढकलावा.

मिथुन राशीच्या व्यक्तींना बुधाचा मीन प्रवेश शुभ परिणाम देणारा ठरू शकेल. व्यवसायाच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील अशी अपेक्षा आहे. व्यवसाय वाढण्यास मदत होईल. नोकरीत नवीन आयाम स्थापित होऊ शकतील. नवीन बिझनेस डील करण्याबद्दल विचार करू शकता. नवीन करार केला जाऊ शकतो. याने भविष्यात शुभ परिणाम प्राप्त होतील.

कर्क राशीच्या व्यक्तींना बुधाचा मीन प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. आत्मविश्वासात कमतरता येऊ शकते. इच्छा नसताना काही प्रवास करावा लागू शकेल. समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. भावंडांसोबतच्या नातेसंबंधावरही परिणाम होऊ शकतो. करिअरमध्येही संघर्षाचा काळ ठरू शकतो. कामात गंभीर राहा.

सिंह राशीच्या व्यक्तींना बुधाचा मीन प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीत तुमचे नुकसान होऊ शकते. आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते. शेअर बाजाराशी संबंधित लोकांना कोणतेही जोखमीचे काम न करण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा.

कन्या राशीच्या व्यक्तींना बुधाचा मीन प्रवेश शुभ परिणामकारक ठरू शकेल. बुधादित्य योग भागीदारी, मैत्री आणि कौटुंबिक जीवनात शुभ परिणाम देईल. कुठेतरी अडकलेले पैसे मिळतील अशी अपेक्षा आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यवसायातही नफा मिळेल. भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर पुढे जाऊ शकाल. जोडीदाराशी नाते अधिक दृढ होऊ शकेल. वैवाहिक जीवनात आनंद मिळू शकेल.

तूळ राशीच्या व्यक्तींना बुधाचा मीन प्रवेश काहीसा समस्याकारक ठरू शकेल. आर्थिक बाबतीतही हा काळ चांगला नाही. खर्चात अचानक वाढ होऊ शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि हुशारीने पैसे खर्च करा. नातेवाईकांशी संबंध बिघडू शकतात. पैशाच्या बाबतीत कोणताही धोका पत्करू नका.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना बुधाचा मीन प्रवेश प्रगतीकारक ठरू शकेल. करिअर आणि शिक्षणाच्या बाबतीत विशेष यश मिळण्याची अपेक्षा आहे. बुधादित्य योग प्रेम जीवनासाठी चांगला मानला जातो. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. इच्छित संस्थेत प्रवेश घेऊ शकता. स्पर्धेत यश मिळेल. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असलेल्यांना सकारात्मकता मिळू शकेल.

धनु राशीच्या व्यक्तींना बुधाचा मीन प्रवेश सुखकारक ठरू शकेल. सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकेल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. बुधादित्य योगामुळे सुखाची साधने वाढतील. आईकडून सहकार्य आणि लाभ मिळेल. वाहन सुख मिळू शकते. नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. जे नोकरीत आहेत, त्यांच्यावर कामाचा ताण कमी राहील.

मकर राशीच्या व्यक्तींना बुधाचा मीन प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू शकतात. शिक्षण किंवा माध्यम क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांच्या समस्या वाढू शकतात. कामात अडथळे येऊ शकतात. भावंडांशी संबंधात तणाव वाढू शकतो. गैरसमज होऊ शकतात. करिअरमध्ये कठीण प्रसंगांनाही सामोरे जावे लागू शकते.

कुंभ राशीच्या व्यक्तींना बुधाचा मीन प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. तुमचे शब्द घरातील आणि बाहेरच्या लोकांना टोचू शकतात. खर्च वाढू शकतील. व्यवसाय आणि करिअरमध्येही नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही कमी होऊ शकतो. शक्य असेल तर तुळशीला दररोज पाणी घालावे.

मीन राशीत बुधाचा प्रवेश होत आहे. या राशीच्या व्यक्तींना हा काळ यशकारक ठरू शकेल. व्यवसायिकांना हा काळ यशस्वी ठरू शकतो. पैसे गुंतवण्यापूर्वी प्रत्येक पैलूंचा विचार करा. वाहन चालवताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे. विवाहेच्छुकांसाठी चांगली स्थळे येऊ शकतात. प्रत्येक निर्णय खूप विचार करूनच घ्या. दररोज बुधाच्या बीज मंत्राचा जप करावा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.