२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 16:53 IST2025-09-25T16:46:20+5:302025-09-25T16:53:13+5:30

Mangal-Harshal Shadashtak Yoga 2025: मंगळ आणि हर्षल ह्या दोन ग्रहांचा षडाष्टक योग चालू झाला आहे आणि तो ऑक्टोबर मध्यांतरापर्यन्त सुरू राहील. मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह असून उतावळा, दाहक आहे. हर्शल सुद्धा त्याच प्रवृत्तीचा ग्रह असून दोघांच्यात षडाष्टक योग सुरु झाला आहे, जो एक कुयोग समजला जातो. हर्षल हा विक्षिप्त, लहरी पण तितकाच संशोधकांच्या दृष्टीने चांगला ग्रह आहे, पण मंगळापेक्षा कित्येक पटीने दाहक सुद्धा आहे.

मंगळ हर्षल कुयोग अनेक घात-अपघात घडवणारा आहे. या कुयोगाच्या काळात आग लागणे, विद्युत उपकरणे, गॅस सिलेंडर, गिझर, इस्त्री, इतर विजेची उपकरणे जपून वापरणे गरजेचे आहे. या कुयोगात अनेक वाईट घटना घडल्याचा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे.

पुढील १५-२० दिवस ह्या योगाचा परिणाम दिसून येईल, त्यामुळे सर्वांनी सावधतेने वावरावे. घरात स्वयंपाक करताना मुलांना तिथे येऊ देऊ नये. गिझर पूर्ण बंद आहे ह्याची खात्री करूनच पाण्यात हात घालावा. हर्षल हा ग्रह आकस्मित घटनांचा कारक असल्यामुळे ह्या घटना डोळ्याचे पाते लावते ना लवते इतक्या कमी वेळात घडतात, त्यामुळे आधीच सतर्क राहावे. ज्यांच्या पत्रिकेत मंगळ हर्षल हा कुयोग आहे त्यांनी तर अधिक सावध राहावे.

आपले वक्तव्य, बोलणे जेणेकरून वादविवाद, भांडणे होतील ते टाळावे. मंगळ म्हणजे 'शेजारी' तेव्हा हा नियम तिथेही लागू होईल. मंगळ हा तापट, अविचारी ग्रह आणि हर्षल स्फोटक असल्यामुळे स्फोटक विधाने केल्यास भांडणे उकरून निघतील आणि त्याचा शेवट वादात होईल.

हे दोन्ही ग्रह अपघात स्थिती दर्शवणारे असल्यामुळे वाहने जपून चालवावीत तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू सांभाळून वापराव्यात. हा योग मानसिक ताण निर्माण करणारा आहे त्यामुळे नातेसंबंधात, सार्वजनिक ठिकाणी बोलताना परिणामांचे भान ठेवावे. विवाह , प्रेम संबंध ह्यातही ह्याचा परिणाम होईल. आकस्मित विवाह ठरेल आणि मोडेल अशाही घटना घडू शकतील.

हर्षल हा ग्रह नवनवीन संशोधन दर्शवतो. तर मंगळ हा ऊर्जेचे प्रतीक आहे. ही उर्जा योग्य वापरली तर प्रगती होईल. प्रत्येक ग्रहाच्या चांगल्या वाईट बाजू आहेत. मोठे अपघात, तीव्र वेदना देणाऱ्या जखमा ह्या काळात घडणाऱ्या अपघातामुळे होऊ शकतात. त्यामुळे सावध राहा आणि या दोन्ही ग्रहांची सकारात्मक बाजू कशी वापरता येईल याचा प्रयत्न करा.

थोडक्यात संघर्ष , त्यातून निर्माण होणारा मानसिक तणाव, संतापजन्य स्थिती आणि त्यामुळे बोलण्यातून वैमन्यस्य, शत्रुत्व निर्माण होणारा हा योग आहे. ह्या सर्वाचा मानसिक ताण येऊ शकतो म्हणून ह्यावर उपाय म्हणून मारुतीची उपासना आणि हनुमान चालीसा पठण नित्य नेमाने करावे. मंगळवारी मारुतीरायाचे दर्शन घेऊन त्याच्या पायावर चिमुटभर शेंदूर अर्पण करावा.

आपल्या शिस्तबद्ध जीवनात असे कुयोग अधून मधून येणार म्हणून आपण जगणे तर सोडून देत नाही. पण शांत राहून उपासनेने आपण ह्यावर मात करू शकतो. योग साधना, प्राणायाम, नेहमीचा जप अधिक वाढवावा जेणेकरून ह्याचा त्रास कमी होईल. मंगळाची उर्जा वळवण्यासाठी नियम व्यायाम करावा. प्रत्येक गोष्टीत आपण आपले मत दिलेच पाहिजे असे नाही आणि बोलताना भांडणाचा सूर लावलाच पाहिजे असेही नाही. जीवनातील शांतता ढळू न देण्यासाठी आणि ह्या परिस्थितून पुढे जाण्यासाठी आपल्याला स्वतःलाच प्रयत्नशील राहावे लागणार आहे. ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी.

सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.