Astro Tips: माघी गणेश चतुर्थीला बाप्पाला वाहिलेल्या दुर्वांचा करा पुनर्वापर; धन धान्याने भरलेले राहील घर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 05:22 PM2024-02-07T17:22:47+5:302024-02-07T17:28:41+5:30

Maghi Ganeshotsav 2024: येत्या १३ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जन्म आहे. ही तिथी मंगळवारी आल्याने अंगारक योगदेखील जुळून आला आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. त्यानिमित्ताने आपण गणेश उपासना करणार आहोतच, त्यात जास्वंदाची फुले आणि दुर्वा यांचा विशेष समावेश असेलच. मात्र दुसऱ्या दिवशी त्या दुर्वा निर्माल्य म्हणून टाकून न देता त्याचा योग्य वापर केल्य्यास जीवनात सुख-समृद्धी येते, असे ज्योतिष शास्त्र सांगते.

असे मानले जाते की दुर्वा वाहिल्याशिवाय गणपतीची पूजा अपूर्ण राहते आणि गणेश पूजनाशिवाय शुभ कार्य अपूर्ण राहते. म्हणून पूजेत दुर्वा अर्पण करणे अनिवार्य ठरते. गणपतीला दुर्वा अर्पण करणे विशेष शुभ असते असे शास्त्रात सांगितले आहे. एवढेच नाही तर असे मानले जाते की गणपतीला अर्पण केलेली दुर्वा विशेष फायदेशीर असते आणि त्यापासून केलेले काही उपाय तुमच्या जीवनात समृद्धी आणू शकतात. ते उपाय कोणते ते जाणून घेऊ.

दुर्वा वाहताना त्या नेहमी अथर्वशीर्ष किंवा गणेश मंत्राने मंत्रित करा. तसे करून वाहिलेल्या दुर्वांना देवाचा स्पर्श आणि सान्निध्य लाभून त्यातही प्रसदत्त्व उतरेल आणि दुर्वांचा पुनर्वापर करताना पुढे दिलेले उपाय कामी येतील.

गणपतीला अर्पण केलेली दुर्वा अधिक पवित्र मानली जाते आणि ती निर्माल्य म्हणून समुद्रात किंवा वाहत्या पाण्यात टाकण्याऐवजी कुंडीत खत म्हणून वापरता येते. उलट तसे करणेच योग्य ठरते. एखाद्या अपवित्र ठिकाणी दुर्वा टाकणे चुकीचे ठरते. दुर्वांना पाय लागणार नाही अशा बेताने त्याचे विघटन केले पाहिजे. तसे केल्याने गणरायचा आशीर्वाद दुर्वांच्या रूपाने आपल्या घरावर कायम राहतो.

जेव्हा तुम्ही गणपतीला दुर्वा अर्पण करता तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही त्यातील दुर्वांचे त्रिदलच बाप्पाला अर्पण करायचे आहे. अन्यथा ते गवत वाहिल्यासारखे होईल. म्हणून दुर्वा निवडून मग वाहिली जाते. दुर्वांचा वापर झाल्यावर त्याचा काही भाग घराच्या तिजोरीत किंवा कपाटात पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा. त्यामुळे घरात आर्थिक अडचणी येत नाहीत.

जर तुमच्यावर वारंवार कर्ज होत असेल आणि त्यातून सुटका होणे कठीण होत असेल, तर गणेशाला अर्पण केलेली दुर्वा घरच्या गणपतीच्या चरणी लावून श्रद्धेने मस्तकी लावावी, बाप्पाला आपली अडचण सांगावी, प्रार्थना करावी आणि श्रद्धेने आपल्या पर्समध्ये ठेवावी. त्यामुळे आर्थिक अडचणीतून मार्ग मिळतो, हा भक्तांचा अनुभव आहे.

अनावश्यक ठिकाणी पैसे खर्च होत असतील तर वाहून झालेल्या दुर्वा दुसऱ्या दिवशी लाल कागदात गुंडाळून पर्समध्ये ठेवा. या उपायाने तुम्हाला आर्थिक फायदा होईल आणि तुमचा पैसा अनावश्यक गोष्टींमध्ये वाया जाणार नाही. असे मानले जाते की दुर्वा संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करते. पर्स नेहमी खिशात असतेच, त्यामुळे तुमच्या मार्गावर येणाऱ्या आर्थिक संधींचा फायदा घेऊ शकता.

रोजच्या पूजेच्या वेळी तुपाचा दिवा लावा आणि त्यात गणपतीला अर्पण केलेली दुर्वा दुसऱ्या दिवशी निरंजनात ठेवा. दुर्वा आणि तूप यांचे मिश्रण सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी शुभ मानले जाते, विशेषत: संपत्ती आणि समृद्धीच्या दृष्टीने हा उपाय करावा.

जर तुम्हाला दीर्घकाळापासून कामात यश मिळत नसेल तर तुम्ही भगवान गणेशाच्या कपाळावर कुंकवाचा दुर्वा बुडवून त्याचे गंध बाप्पाला लावावे. तसेच आपल्याही कपाळावर लावावे. या उपायाने तुमचे बिघडलेले कामही पूर्ण होऊ लागते आणि आनंद टिकून राहतो.

असे मानले जाते की यज्ञ याग केल्यामुळे घरात सकारात्मकता राहते. तुमच्या घरी देखील अग्निहोत्र केले जात असेल तर त्यात बाप्पाच्या प्रासादिक दुर्वा टाकाव्यात. तसे केल्याने घरच्या सर्वांचे आरोग्य चांगले राहते.

बाप्पाला दुर्वा वाहताना त्या निवडून वाहा आणि त्याची रचना मूर्तीच्या सभोवताली गोलाकार रचनेत करा. बाप्पाची प्रार्थना करून संपत्ती, आर्थिक स्थैर्य आणि एकूणच समृद्धीची इच्छा व्यक्त करा. तुमच्या आर्थिक अडथळ्यांवर मात करण्यासाठी भगवान गणेशाचे आशीर्वाद मागा. तसे केल्याने घराची आर्थिक स्थिती चांगली राहील.