ज्येष्ठ निर्जला एकादशी: १ शुभ, १ अशुभ योग; ७ राशींची चंगळ, लक्ष्मी कृपेने धनलाभ, भरभराट काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 07:07 IST2025-06-05T07:07:07+5:302025-06-05T07:07:07+5:30

Jyeshtha Nirjala Ekadashi June 2025: निर्जला एकादशीच्या दिवशी दोन ग्रहांच्या गोचरामुळे जुळून येणाऱ्या योगाने कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या...

मराठी वर्षात एकूण २४ एकादशी येतात. पण असे म्हणतात, की निर्जला एकादशी केली आणि उर्वरित २३ एकादशी केल्या नाहीतर तरी त्या २३ एकादशीचे पुण्य लाभते. म्हणून या एकादशीला महत्त्व असते. निर्जला एकादशीला दोन्ही वेळी खायचे तर नाहीच, शिवाय पाणीदेखील प्यायचे नाही असा नियम आहे.

ज्येष्ठ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी निर्जला एकादशी या नावाने ओळखली जाते. ०६ जून २०२५ रोजी निर्जला स्मार्त एकादशी आहे. या दिवशी काहीही न खातापिता उपास करावा. श्रीविष्णूंची विधिवत पूजा करावी. गायन, नृत्य करून रात्री जागरण करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा श्रीविष्णूंची यथासांग पूजा करावी. गरजूंना दान दक्षिण देऊन मग उपास सोडावा, असे सांगितले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी एक शुभ आणि एक अशुभ योग जुळून येत आहे. याच दिवशी बुध आणि मंगळ राशी परिवर्तन करत आहेत. बुध स्वराशीत म्हणजेच मिथुन राशीत प्रवेश करत आहे. तर मंगळ सिंह राशीत प्रवेश करत आहे. मिथुन राशीत प्रवेश करताच बुधाची गुरुशी युती होणार आहे. तर मंगळाची केतुशी युती होणार आहे. मंगळ-केतु युती प्रतिकूल मानली जाते. या कालावधीत कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? जाणून घेऊया...

मेष: कार्यक्षेत्रात अचानक मोठी संधी मिळू शकते. सकारात्मक प्रयत्न करण्याची गरज आहे. अपेक्षांपेक्षा जास्त प्रमाणात यश मिळेल. घरात उत्सवी वातावरण राहील. घराची सजावट करण्यासाठी वेळ द्याल. मुलांची काळजी घ्यावी. त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे वाढवू नका. आरोग्याची काळजी घ्यावी. आहार आणि आराम याकडे दुर्लक्ष करू नका.

वृषभ: व्यवसायात भरभराट होईल. हाती पैसा खेळता राहील. आर्थिक उलाढाली जपून करा. काहींना अचानक प्रवास करावा लागेल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. सहकारी वर्गाशी जुळवून घेणे योग्य ठरेल. नवीन नोकरीसाठी अर्ज केलेला असेल, तर मुलाखतीचे बोलावणे येईल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. समाजात महत्त्व वाढू शकेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ. आरोग्याची काळजी घ्यावी.

मिथुन: महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. धनलाभ होईल. आर्थिक गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. थोडे सावध राहा. अनुकूलता अनुभवायला मिळेल. नोकरीत नवीन संधी मिळेल. कामाचा ताण राहील. फायदे होणार असल्याने कामाचे काही वाटणार नाही. मुले प्रगती करतील.

कर्क: अनेक कामे होतील. छोट्या-छोट्या यशाकडे सकारात्मक पद्धतीने पाहिले तर यशाचा आनंद चाखता येईल. अनेक अडचणी दूर होतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मात्र, देवाणघेवाण करताना थोडी काळजी घ्यावी. कागदपत्रे नीट वाचून मगच सही करा. व्यवसायात भरभराट होईल. सतत कामात व्यस्त राहाल. गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. घाई करू नका. एखादी इच्छा पूर्ण होईल.

सिंह: मेहनतीचे फळ मिळण्यासाठी अनुकूल वातावरण राहील. जवळच्या लोकांकडून कामाची प्रशंसा केली जाईल. लोक मदत करण्यासाठी पुढे येतील. भावनेच्या भरात अवाजवी खर्च होणार नाही, याची काळजी घ्यावी. मोठेपणा मिरवण्याच्या नादात कुणाला आश्वासने देऊन टाकू नका. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. या काळात महत्त्वाची कामे पूर्ण होतील.

कन्या: एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होईल. मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. काही अनपेक्षित अडचणी या दिवसांत येऊ शकतात. थोडा संयम बाळगण्याची गरज राहील. अनुकूलता बाजूने राहील. जीवनसाथीचा सहयोग राहील. कामे होतील.

तूळ: यश मिळेल. एखादी मोठी संधी मिळेल. घरात उत्सवी वातावरण राहील. घरी पाहुणे मंडळी येतील. पैसा मिळेल. आर्थिक देवाणघेवाण जपून करा. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्यावे. काही अडचणी येतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. शनिवारी अनेक अडचणी संपलेल्या असतील.

वृश्चिक: काही बाबतीत संघर्ष तर काही बाबतीत सहजपणे यश, अशी परिस्थिती अनुभवण्यास मिळेल. सामाजिक मान-सन्मान प्राप्त होतील. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. काहींना जवळच्या सहलीचे योग येतील. एखादी चांगली बातमी कळेल. नोकरीत एखाद्या व्यक्तीमुळे मनस्ताप होऊ शकतो. थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. अडचणी दूर होतील. वाहन जपून चालवा.

धनु: विविध आघाड्यांवर सफलता मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. एखाद्या कामात गरजेपेक्षा जास्त वेळ द्यावा लागू शकतो. अडचणी कमी होण्यास सुरुवात होईल. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. त्यामुळे वेळापत्रक व्यस्त होईल. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.

मकर: आत्मविश्वासाने वाटचाल सुरू राहील. प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. व्यवसायात नवीन प्रयोग करून पाहिले जातील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. या काळात संयम बाळगल्यास यश तुमचेच राहील. अनुकूलता अनुभवायला मिळेल. समाजात मान वाढेल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. नोकरीत योग्यतेची दखल घेतली जाईल. पगारवाढ मिळेल. सोयी-सुविधा वाढवून मिळतील.

कुंभ: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. काही कामे खूप वेळ खातील. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. आरोग्याची हेळसांड करता कामा नये. खाण्या-पिण्याच्या आणि आरोग्याच्या बाबतीत बेपर्वाई नको. योजनांच्या बाबतीत गुप्तता पाळली पाहिजे. आपले प्रश्न फक्त आपल्यालाच सोडवावे लागतात, हे लक्षात घ्यावे. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. वाहन जपून चालवा. मनावरील ताण निघून जाईल.

मीन: काही कटू, तर काही गोड अनुभव येतील. भेटीगाठी फलद्रूप होतील. मनात कल्पक विचार राहतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. जवळचे प्रवास होतील. प्रवासात सतर्क राहा. आरोग्याची काळजी घ्यावी. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. हाती पैसा येईल. घरात उत्सवी वातावरण राहील. घरातील सदस्यांची प्रगती होईल. जोडीदार मर्जीनुसार वागेल. फार दगदग करू नका. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.