Guru Purnima 2025: आजच्या काळात 'या' गुरूंनाही आहे मोठा मान; तुम्ही कोणाला फॉलो करता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 12:40 IST2025-07-10T12:34:10+5:302025-07-10T12:40:05+5:30
Guru Purnima 2025: इंटरनेटमुळे लोक हल्ली मोबाईवर सत्संग ऐकू लागले आहेत. ऐका, पहा आणि फॉरवर्ड करा हाच ट्रेंड सुरु आहे. अनेक स्पिरिच्युअल गुरु इथे प्रबोधन करतात आणि लोक त्यांना ऐकतात, फॉलोही करतात. गुरुपौर्णिमेनिमीत्त(Guru Purnima 2025) अशाच व्हायरल गुरुंचा आढावा घेऊया.

सत्संग अर्थात चांगल्या विचारांचा संग, आध्यात्मिक मार्गावर नेणारा संग, मग तो कुठेही घडू शकतो, अगदी सोशल मीडियावरही! सध्या प्रचलित असलेले व्हायरल गुरूदेखील आपल्या माध्यामातून जनजागृती करत आहेत. त्यांनी लोकांची नस बरोबर ओळखली आहे त्यामुळे त्यांना लाखो लोक फॉलो करत आहेत.
रामदेव बाबा :
'योगा से होगा' असे म्हणत रामदेव बाबांनी भारतीयांना आपल्या प्राचीन योग विद्येशी आणि आयुर्वेदाशी यशस्वीरीत्या जोडले. रामदेव बाबांच्या कृपेने व्हिडीओ पाहून योगाभ्यास करू लागले आणि ते कमी म्हणून की काय गल्ली बोळात 'योगा क्लासेस' चे पेव फुटू लागले. येनकेनप्रकारेण लोक आरोग्याप्रती सजग होऊ लागले.
सद्गुरू :
श्रीमंत वर्गात अतिशय लोकप्रिय असलेले सद्गुरू अर्थात जगदीश वासुदेव. प्रापंचिक माणसांना बोध होईल अशा सोप्या भाषेत ते अध्यात्म समजावून सांगतात. योग्य-अयोग्य गोष्टींबद्दल खुलेपणाने बोलतात. त्यांची शिवभक्ती आणि अध्यात्माला दिलेले मॉडर्न वळण पाहता तरुणांमध्ये त्यांची मोठी क्रेझ आहे.
अनिरुद्धाचार्य महाराज :
हसरा चेहरा, काळेभोर केस रंगीत कपडे आणि प्रापंचिक उदाहरणातून सोपं करून सांगितलेलं अध्यात्म यामुळे अनिरुद्धाचार्य महाराज नेटकऱ्यांना प्रिय आहेत. त्यांची मिश्किल शैली अनेकांना भावते तर अनेकांसाठी ती टीकेचा विषय बनते.
बागेश्वर धाम :
बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री सोशल मीडियावर रातोरात स्टार झाले. त्यांचे चमत्कार, हिंदुत्त्वाचे मुद्दे, पाश्चात्य संस्कृतीला प्रखर विरोध यामुळे ते तरुणांच्या गळ्यातले ताईत झाले.
गौर गोपाल दास :
सोप्या, साध्या इंग्रजी, हिंदीत गौर गोपाल दास छान छान बोधप्रद कथा सांगतात. मनुष्य हा गोष्टीवेल्हाळ असल्यामुळे साहजिकच त्यात रमतो आणि त्यांना फॉलो करतो. त्यांची सांगण्याची शैली श्रोत्यांना खिळवून ठेवते आणि कथेचे सार विचारांना दिशा देते.
जया किशोरी :
कमी वयात अध्यात्म सांगत लोकप्रिय झालेला चेहरा म्हणजे जया किशोरी. सुरुवातीला भागवत कथा करत त्या मोटिव्हेशनल स्पीकर झाल्या आणि आता दैनंदिन आयुष्याशी संबंधित चांगल्या-वाईट गोष्टी त्या सांगतात आणि लोक त्यांना फॉलो करतात.
श्री श्री रवी शंकर :
आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्वेसर्वा श्री श्री रवी शंकर यांची शांत, सुमधुर वाणी आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याचे विचार यामुळे आर्ट ऑफ लिव्हिंग फॉलो करणारे लाखो अनुयायी जगभरात आहेत.
प्रेमानंद महाराज :
आजारावर मात करत 'राधे राधे' म्हणणारे प्रेमानंद महाराजांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. विराट अनुष्का सारखे सेलिब्रेटीदेखील त्यांना फॉलो करतात.