गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 18:11 IST2025-07-12T18:00:52+5:302025-07-12T18:11:34+5:30

आगामी काळात ८ ग्रहांचे अद्भूत योग जुळून येत असून, कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आगामी काळातील गोचर अनेकार्थाने महत्त्वाची मानली जात आहे. १६ जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या संक्रमणाचा काळ संक्रांत म्हणून ओळखला जातो. त्यामुळे नवग्रहांचा राजा मानल्या गेलेल्या सूर्याने कर्क राशीत प्रवेश केला की, पुढील महिनाभराचा काळ कर्क संक्रांत असेल. कर्क राशीत बुध विराजमान आहे.

कर्क राशीतील सूर्य आणि बुधाच्या युतीने बुधादित्य राजयोग जुळून येत आहे. तसेच चंद्र मकर, कुंभ, मीन राशीतून भ्रमण करेल. यामुळे चंद्राचा कुंभ राशीतील राहुशी ग्रहण योग जुळून येईल. तसेच मीन राशीतील शनिशी युती योग जुळून येईल. यामुळे चंद्र आणि मंगळ, केतु यांचा षडाष्टक योग जुळून येईल.

तसेच गुरु आणि चंद्राचा वसुमान योग जुळून येत आहे. आगामी काळातील या ग्रहांच्या गोचराचा अनेक राशींना लाभ प्राप्त होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...

मेष: नशिबाची साथ लाभू शकेल. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास वाढू शकेल. वरिष्ठ आणि सहकारी कामाची प्रशंसा करू शकतील. प्रतिमा उंचावू शकेल. व्यावसायिकांसाठी फायदेशीर काळ राहू शकेल. महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. सामाजिक आणि धार्मिक कार्यात उत्साहाने सहभागी व्हाल. सार्वजनिक ठिकाणी प्रतिभा दाखविण्याची संधी मिळू शकेल. आदर मिळू शकेल. एक नवीन जबाबदारी किंवा पद मिळू शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ शुभ ठरू शकेल.

वृषभ: आगामी काळ शुभ ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी नशिबाची साथ मिळेल. प्रलंबित काम लवकर पूर्ण होऊ शकेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मान-सन्मान, आदर वाढू शकेल. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात चांगले पर्याय मिळू शकतात. सुख, सोयी आणि सुविधा वाढू शकतील. वडील किंवा वरिष्ठ लोकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरदारांसाठी उत्तम काळ राहू शकेल. पदोन्नती किंवा पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. जोडीदाराशी संबंध अनुकूल राहतील.

कर्क: करिअर, व्यवसायात नवीन उंची गाठू शकाल. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. नवीन सौदे मिळू शकतात. सरकार किंवा प्रशासनाशी संबंधित एखाद्या प्रभावशाली व्यक्तीकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. जुने अडकलेले काम गती घेऊ शकेल. नोकरी करणाऱ्यांसाठी प्रगतीच्या संधी प्राप्त होऊ शकतील. कामाचे कौतुक होऊ शकेल. पदोन्नतीची शक्यता असेल. मुलांच्या संबंधित काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

सिंह: सुख, सौभाग्य, प्रगती प्राप्त होऊ शकेल. पदोन्नती आणि बदली होऊ शकते. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठ अधिकारी कामावर खूश असतील. कार्यक्षेत्रातील प्रगतीमुळे आत्मविश्वास वाढेल, कुटुंबात आदर वाढेल. परदेशात जाण्याची योजना आखणाऱ्या लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर करिअर किंवा व्यवसाय वाढवण्याची संधी मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होऊ शकेल.

धनु: करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रात नवीन संधी मिळू शकतील, नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर काळ अनुकूल ठरू शकेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा पूर्ण पाठिंबा मिळू शकेल. कामाचे कौतुक होऊ शकेल. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आघाडीवर थोडे सावधगिरी बाळगावी लागेल. एखाद्या छोट्या गोष्टीवरून भावंडांशी वाद होऊ शकतो. घरातील वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. कालांतराने आयुष्यात सकारात्मक बदल होतील. नात्यांमध्ये विश्वास आणि प्रेम वाढू शकेल.

कुंभ: शुभता, सौभाग्य लाभू शकेल. यश आणि नफा मिळविण्याच्या संधी मिळू शकतात. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट होऊ शकते. जी भविष्यात फायदेशीर ठरू शकेल. करिअर आणि व्यवसायाच्या दिशेने केलेले प्रयत्न यश मिळवून देऊ शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ सहकार्य करू शकतील. कामाची प्रशंसा होऊ शकेल. नोकरी करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी आणि घरात आदर वाढू शकेल. एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते.

मीन: भाग्याची साथ लाभू शकेल. परदेशाशी संबंधित कामात फायदा होण्याची शक्यता आहे. अभ्यासासाठी किंवा व्यवसायासाठी परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर आशेचा किरण दिसू शकतो. कोणतेही व्यवहार अडकले असतील तर अडथळा दूर होऊ शकतो. आयात-निर्यात, रुग्णालय, मेडिकल स्टोअर, लॅब इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा कालावधी सकारात्मक ठरू शकेल. धार्मिक कार्यात रस असेल. सामाजिक वर्तुळ वाढेल. मित्रांच्या मदतीने नवीन कमाईच्या संधी मिळू शकतात. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा येऊ शकेल.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.