गुरु शुक्र उदय: ३ राशींना यशाचा काळ, येणी वसूल होतील; गुंतवणुकीतून फायदा, नवीन डील लाभदायी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 08:28 AM2024-05-22T08:28:28+5:302024-05-22T08:37:16+5:30

अस्तंगत ग्रहांचा उदय होतो म्हणजे नेमके काय होते? कोणत्या राशींना लाभ होऊ शकेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व नवग्रह नियमित अंतराने एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करत असतात. तर काही ग्रह वक्री होतात, मार्गी होतात, अस्तंगत होतात, उदय होतात. ग्रहांच्या या स्थितीचा केवळ राशींवर नव्हे तर देश-दुनियेवर प्रभाव पडत असतो, असे सांगितले जाते. जून महिन्यात गुरु आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचा उदय होणार आहे.

एखादा ग्रह सूर्यापासून जेव्हा जवळच्या अंतरावरून मार्गक्रमण करत असतो, तेव्हा तो ग्रह सूर्यामुळे पृथ्वीवरून दिसेनासा होतो. ग्रहाच्या या स्थितीला तो ग्रह अस्तंगत झाला असे म्हटले जाते. तर कालांतराने तो ग्रह सूर्यापासून दूरच्या अंतराने मार्गक्रमण करू लागल्याने पुन्हा पृथ्वीवरून दिसू लागतो. तेव्हा त्या ग्रहाचा उदय झाला, असे म्हटले आहे.

आताच्या घडीला गुरु, शुक्र आणि सूर्य वृषभ राशीत विराजमान आहेत. मे महिन्यात हे दोन्ही ग्रह अस्तंगत होते. आता जून महिन्यात गुरु आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचा उदय होणार आहे. या दोन्ही ग्रहांचा उदय महत्त्वाचा मानला गेला आहे. कारण या काळात काही शुभ कार्ये वर्ज्य मानली गेली होती. या दोन्ही ग्रहांचा उदय झाल्याने शुभ कार्ये पुन्हा सुरु केली जाऊ शकतात, असे सांगितले जात आहे.

तसेच गुरु आणि शुक्र या दोन्ही ग्रहांच्या उदयाचा तीन राशींवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो, असे सांगितले जात आहे. जीवनाच्या विविध आघाड्यांवर यश-प्रगतीची संधी प्राप्त होऊ शकते. शुभ प्रभाव पडू शकतो, असे सांगितले जाते. जाणून घेऊया...

वृषभ: वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल.पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत आर्थिक यश मिळेल. सर्व कामाच्या योजना यशस्वी होतील. ज्या लोकांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे त्यांना चांगला नफा मिळू शकतो. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात.

कर्क: उत्पन्नात वाढ होऊ शकेल. दोन ग्रहांचा उदय होणे व्यवसायात यश मिळवून देणारे मानले जाते. अडकलेले पैसे अचानक मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायाशी संबंधित योजनांमध्ये पैसे कमविण्याची संधी मिळेल. व्यावसायिक आहेत ते व्यवसाय करार अंतिम करू शकतात, ज्यामुळे भविष्यात नफा होईल.

सिंह: काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकेल. उत्पन्नात वाढ होईल. नोकरदार लोकांची पदोन्नती रखडलेली असेल तर चांगली बातमी मिळू शकते. मित्रांसोबत संबंध मधुर होतील. बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळतील. तसेच गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.