१३ महिन्यांचे मराठी नववर्ष २०२६: ९ राशींना छान सुरुवात, लक्ष्मी वरदान; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:01 IST2026-03-18T15:43:44+5:302026-03-18T16:01:24+5:30

Gudi Padwa 2026 Astrology: मराठी नववर्ष सुरू होताना कालसर्प, पंचक आहे. तुमची रास कोणती? मराठी नववर्षाची सुरुवात तुमच्यासाठी कशी असेल? जाणून घ्या...

Gudi Padwa 2026 Astrology: गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी गुढी पाडवा आहे. ज्योतिषशास्त्राप्रमाणे या दिवशी अनेक शुभ योग तसेच काही प्रतिकूल योग जुळून येत आहेत. आताच्या घडीला कालसर्प योग सुरू आहे. तसेच पंचकही लागलेले आहे. यंदा श्रीशालिवाहन शके १९४८ प्रारंभ होत आहे. यंदा पराभव नावाचे संवत्सर सुरू होणार आहे.

तर, मालव्य राजयोग, शुक्रादित्य राजयोग असे काही शुभ योग जुळून येत आहेत. कुंभ राशीत त्रिग्रही तर मीन राशीत चतुर्ग्रही योग जुळून आलेला आहे. याशिवाय नवमपंचम योगही आहे. तसेच यंदाच्या वर्षी ज्येष्ठ अधिक मास आहे. त्यामुळे अनेकार्थाने मराठी नववर्ष विशेष ठरणारे आहे.

चैत्र पाडवा या दिवशी शुक्ल योग, ब्रह्म योग आणि सर्वार्थ सिद्धी योग असे योगही जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती? मराठी नववर्षाची सुरुवात तुमच्यासाठी कशी असेल? कोणत्या राशीवर कसा प्रभाव राहू शकेल? जाणून घेऊया...

मेष: कार्यक्षेत्रात अनपेक्षित बदल होऊ शकतील. कामाचा ताण राहील. लोकांच्या भरवशावर विसंबून राहू नका. घरगुती जबाबदाऱ्यांचा मेळ बसवण्यासाठी वेळ द्यावा लागेल. व्यवहारात स्पष्टपणा पाळणे आवश्यक आहे. लोक गोड बोलले तरी त्यांचे अंतस्थ हेतू काय आहेत, हे ओळखायला हवे. उत्तरार्धात प्रवासात सतर्क राहा. ऐनवेळी नियोजित कार्यक्रमात बदल होऊ शकतात.

वृषभ: उत्साहात सुरुवात होईल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. प्रवास करावा लागेल. समाजात मान वाढेल. कार्यक्षेत्रात कामाचा ताण वाढेल, सहकारी वर्गाशी गोडीत बोलून कामे करून घेतली पाहिजेत. काहींना अनपेक्षित बदलीला सामोरे जावे लागेल. चांगले अनुभव येतील. महत्त्वाची कामे हातावेगळी कराल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. प्रवासात सतर्क राहा. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका.

मिथुन: सामान्य ग्रहमान राहील. अनुकूलता राहील. दगदग न करता थोडा आराम करा. एखाद्या सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. काही लोक विरोधात कारवाया करतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. मोहापासून स्वतःला दूर ठेवण्याची गरज आहे. अडचणी दूर होतील. अडलेले एखादे महत्त्वाचे काम मार्गी लागेल. आर्थिक आवक चांगली राहील. भेटवस्तू मिळतील. भेटीगाठी फलद्रूप होतील.

कर्क: यश मिळेल. साधक बाधक अनुभव येतील. भागीदारी व्यवसायात जपून राहा. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. तब्येतीची काळजी घ्या. फार दगदग होईल, अशी कामे करू नका. लोकांना न विचारता सल्ला देऊ नका. परिस्थिती आटोक्यात येईल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. प्रवास घडतील. सामाजिक मान-सन्मान मिळेल. नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल.

सिंह: नोकरीत अनपेक्षित बदल होऊ शकतात. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. योजना लोकांना सांगत बसू नका. जीवनसाथीशी गैरसमज होऊ शकतात. प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागण्याची गरज आहे. व्यवसायात दगदग होईल. झेपतील तेवढीच आश्वासने लोकांना द्या. कामाचे नियोजन नीट करा नाहीतर तर लोकांचे गैरसमज होतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. परिस्थिती तुमच्या आटोक्यात येईल.

कन्या: प्रेमात सावध राहा. नोकरीत वर्चस्व राहील. मात्र, अंतर्गत गटबाजीपासून स्वतःला दूर ठेवण्याची गरज आहे. सुरुवातीला जवळच्या प्रवासाचे योग येतील. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची मदत मिळाल्याने परिस्थिती थोडी सुसह्य होईल. तरुण वर्गाला प्रेमात सावधपणे वागण्याची गरज आहे. कुणी मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल.

तूळ: आक्रमकता टाळण्याची गरज आहे. आजूबाजूच्या लोकांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. मुलांशी संवाद ठेवा. त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे वाढवू नका, त्यांच्या अडचणी समजून घ्या. विद्यार्थ्यांनी चांगल्या तूळ मित्रांच्या सहवासात राहावे. तब्येतीची काळजी घ्या. योजना गुप्त ठेवा. अनुकूल वातावरण राहील. अनेक अडचणी दूर होतील. जीवनसाथीचा चांगला सहयोग राहील.

वृश्चिक: नवीन जबाबदारी मिळेल. ग्रहमानाची साथ राहील. मात्र, फार मोठी जोखीम पत्करून चालणार नाही. सुरुवातीला जवळच्या प्रवासाच्या योग येईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. मात्र, मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. सामाजिक मान-सन्मान मिळेल. मात्र, बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

धनु: नवी संधी मिळेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. वडीलधाऱ्या मंडळींकडून मार्गदर्शन मिळेल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. मोठ्या उलाढाली करण्याकडे कल राहील. मात्र, फार मोठे धाडस करणे अडचणीत आणू शकते. तावून सुलाखून निर्णय घ्या. व्यवसायात पैसा अडकून पडणार नाही याची काळजी घ्या. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. जमिनीच्या व्यवहारात कागदपत्रे नीट वाचून घ्या. हुरळून जाऊन झटपट करार करू नका. नोकरीत नवीन संधी मिळेल.

मकर: मनात आत्मविश्वास राहील, स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल, नवीन ओळखी होतील. त्यातून फायदा होईल. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील, उत्तरार्धात व्यवसायात तेजी राहील. जवळच्या लोकांशी काही कारणाने गैरसमज होऊ शकतात. प्रवासात सतर्क राहा, अनोळखी व्यक्तींना गोपनीय माहिती देऊ नका. परिचित व्यक्तीशी खातरजमा करूनच ऑनलाइन व्यवहार करा.

कुंभ: व्यवहार जपून करा. मनात आध्यात्मिक विचार राहतील. काहींना तीर्थयात्रा घडतील, खर्चाचे प्रमाण वाढते राहील. कायद्याची बंधने पाळा, फार दगदग करू नका, आरोग्याची काळजी घ्या. जीवनसाथीचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. शेवटच्या टप्प्यात आर्थिक उलाढाली करताना खबरदारी घ्या. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या. फोनवरून कुणाला 'ओटीपी', 'पिन' अशी माहिती देऊ नका, नाहीतर, अडचणीत येऊ शकाल.

मीन: प्रेमात सावध राहा. ऊन-सावलीचा खेळ अनुभवायला मिळेल. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. जनसंपर्क चांगला राहील. हाती पैसा येईल. काही अडचणी येतील. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. जीवनसाथीचे हट्ट पुरवावे लागतील, प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागावे. अडचणीतून मार्ग निघेल. वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद मिळेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.