Dussehra 2025: दसऱ्याला जे लोक करतात 'हा' उपाय, त्यांच्यावर वर्षभर राहते लक्ष्मीकृपा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 12:15 IST2025-09-30T12:09:54+5:302025-09-30T12:15:11+5:30

Dussehra 2025: दसऱ्याला(Dussehra 2025) अर्थात नवरात्रीच्या(Navratri 2025) शेवटच्या दिवशी रावण दहन, सरस्वती पूजन आणि शस्त्र तथा वाहन पूजा करण्याचा प्रघात आहेच. त्याबरोबर ज्योतिष शास्त्रात सुचवलेल्या पुढील उपायांपैकी उपाय केले असता वर्षभर लक्ष्मी कृपा राहते. येत्या २ ऑक्टोबर रोजी दसरा आहे, त्यानिमित्त पुढील उपाय जाणून घ्या.

शास्त्रांनुसार, दसरा हा अत्यंत शुभ मानला जातो, या दिवशी केलेल्या उपायांमुळे दहा दिशांनी आपल्यावर कृपावर्षाव होतो. म्हणून, या दिवशी केलेले कोणतेही नवीन काम, पूजा किंवा विधी बहुगुणी फायदे मिळवू शकतात. यासाठीच पुढील उपाय करा आणि वर्षभर लाभ मिळवा.

आर्थिक वृद्धीचे उपाय : दसऱ्याला आपण आपट्याचे पान देऊन सोने लुटणे असे म्हणतो, पण खरोखरच त्यादिवशी आपट्याच्या पानांची पूजा करून ते जास्तीत जास्त लोकांना दिले असता लाभ होतो, शिवाय त्यादिवशी लक्ष्मीरूपी केरसुणीची पूजा केल्याने वर्षभर आर्थिक वृद्धी होत राहते. उपाय सोपा वाटत असला तरी प्रभावी आहे, करून बघा.

देवदर्शनाचा लाभ : दसऱ्याच्या दिवशी देवी, श्रीराम, गणपती या देवतांचे मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. हा दिवस या देवतांच्या कर्तृत्त्वाच्या स्मृतीला उजाळा देणारा असतो, त्यामुळे त्यांच्या दर्शनाने भक्ती, शौर्य, साहस आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, जिचा लाभ वर्षभर होतो.

नामजप : दसऱ्यापासून रोज श्रीराम, देवी किंवा तुमच्या उपास्य देवतेच्या नामाचा रोज न चुकता १०८ वेळा जप करा. पुण्यसंचय होईल आणि आयुष्यातील अडचणी दूर होऊन सन्मार्गाची वाट दिसू लागेल.

दानधर्म : दसऱ्याला सोने लुटणे हा उपचार असला तरी दानधर्म केल्यामुळे पुण्य लुटता येते. ज्याचे जेवढे जास्त पुण्य तेवढी नशिबाची उत्तम साथ. दिल्याशिवाय काही मिळत नाही, फक्त आपण देत असलेले दान योग्य आणि गरजू व्यक्तीला असावे. मग ते आर्थिक, शैक्षणिक, मानसिक अशा कोणत्याही स्वरूपाचे असू दे.

हनुमान-शनी उपासना : दसऱ्याला शनी देव तसेच हनुमंताचे दर्शन घेऊन त्यांच्याशी संबंधित कोणतीही एक उपासना करावी. जसे की रोज दर्शन घेणे, नामजप करणे, स्तोत्र पठण करणे, पूजाविधी करणे यापैकी काहीही! हे कार्य दसऱ्यापासून सुरु करून वर्षभर अखंडपणे केल्यास ग्रहपीडा नष्ट होते आणि आयुष्याला गती मिळते.