Diwali 2021: यंदा दिवाळी कधीपासून आहे? पाहा, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन नरक चतुर्दशी तिथी, मान्यता व परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 10:18 AM2021-10-24T10:18:40+5:302021-10-24T10:23:01+5:30

Diwali 2021 Dates: साधारणपणे वसुबारसपासून ते यमद्वितीय म्हणजेच भाऊबीजपर्यंत दीपोत्सव साजरा केला जातो.

विविध रंगांचा आणि दिव्यांचा सण म्हणून दिवाळी म्हणजेच दीपावली साजरी केली जाते. दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. "दीप" म्हणजे "दिवा" आणि "आवली" म्हणजेच "ओळ". याचा संपूर्ण अर्थ पाहिला तर दिव्यांची एका ओळीत केलेली रचना. अर्थात दिवाळी. दीपावलीचे मूळचे नाव यक्षरात्री असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहे.

सन २०२१ मध्ये नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला दीपोत्सवाला प्रारंभ होईल. दिवाळीत ५ दिवस सर्वांत महत्त्वाचे असतात. वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो. त्यानंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दर्शी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज यांचे विशेष महत्त्व आहे.

दसऱ्याची सांगता झाल्यावर दिवाळीची साफसफाई, दिवाळीचा फराळ, दिवाळीची खरेदी, दिवाळीच्या योजना यांना खऱ्या अर्थाने सुरुवात होते. साधारणपणे वसुबारसपासून ते यमद्वितीय म्हणजेच भाऊबीजपर्यंत दीपोत्सव साजरा केला जातो. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज नेमके कधी आहेत? ते कोणत्या दिवशी साजरे केले जातील? जाणून घेऊया...

शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात दिवाळीचा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीय या दरम्यान दीपोत्सव साजरा केला जातो. उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे.

सहा महिन्यांची प्रदीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरु होताच त्या प्रदेशातील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटत असावे आणि त्यासाठीच ते हा आनंदोत्सव करीत असावेत, असे म्हटले जाते. चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले, तो याच दिवसात.

प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो, अशी मान्यता आहे.

दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. यंदाच्या वर्षी ०१ नोव्हेंबर २०२१ रोजी वसुबारस आहे. आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी गाईची पाडसासह पूजा करतात. घराघरांमध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.

यानंतर धनत्रयोदशीचा दिवस येतो. सन २०२१ मध्ये ०२ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी आहे. आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. जैनधर्मीय या दिवसाला 'धन्य तेरस' वा 'ध्यान तेरस' म्हणतात. या दिवशी कुबेर,विष्णू -लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखवितात.

धनत्रयोदशीनंतर नरक चतुर्दशी साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी ०४ नोव्हेंबर २०२१ रोजी नरक चतुर्दशी आहे. नरक चतुर्दशीच्या पहाटेपासून फटाके उडवायला सुरुवात होते. वर्षक्रियाकौमुदी, धर्मसिंधु इ. ग्रंथांमध्ये सांगितले आहे की आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि अमावास्येला संध्याकाळी लोकांनी आपल्या हातात मशाली घेऊन त्या आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी दाखवाव्यात आणि प्रार्थना करावी.

दिवाळीतील सर्वांत महत्त्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन. सन २०२१ मध्ये ०४ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन आहे. या दिवशी सायंकाळी लक्ष्मी देवीचे पूजन केले जाणार आहे. आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन केले जाते.या दिवशी प्रदोषकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. महाराष्ट्रात लक्ष्मी पूजनाला भेंड, बत्तासे, साळीच्या लाह्यांचा नेवैद्य दाखवण्याची पद्धत आहे.

कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात. ०५ नोव्हेंबर २०२१ रोजी बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा आहे. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि 'इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो' असे म्हणतात. मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात.

कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला "यमद्वितीया" असे नाव मिळाले असे मानले जाते. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. यंदाच्या वर्षी ०६ नोव्हेंबर २०२१ रोजी आहे. भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते.