२०२५ वर्षाची सांगता: ७ राशींना शुभ काळ, धनलाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, इच्छापूर्तीचे उत्तम योग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 10:02 IST2025-12-26T09:50:53+5:302025-12-26T10:02:56+5:30

२०२५ ची सांगता होत असताना काही शुभ राजयोग जुळून येत आहेत. तुमच्या राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या...

२०२५ ची सांगता होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. २०२५ ची सांगता तीन शुभ राजयोगांमध्ये होत आहे. यामुळे केवळ २०२५ हे वर्ष सकारात्मकतेने संपणार नाही, तर २०२६ या वर्षाची सुरुवातही चांगली, अनुकूल होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

आताच्या घडीला धनु राशीत मंगळ, सूर्य आणि शुक्र हे तीन ग्रह विराजमान आहे. या तीन ग्रहांच्या युतीने मंगल आदित्य, शुक्रादित्य आणि त्रिग्रही योग जुळून येत आहे. एकीकडे अशुभतेची प्रतिकूल छाया असणारे पंचक सुरू असले, तरी शुभ योगांमुळे दोषमुक्त काळ राहू शकणार आहे.

धनु राशीतील त्रिग्रही राजयोग, दोषमुक्त पंचक यामुळे काही राशींना २०२५ ची सांगता अतिशय उत्तम, लाभदायक ठरू शकेल. तसेच कुटुंब, नोकरी, करिअर, व्यापार, व्यवसाय, आर्थिक आघाडीवर शुभ अनुकूल सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...

मेष: चंद्राचे भ्रमण उन्नतीसाठी समर्थन देणारे ठरेल. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. लोकांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल. तरुण-तरुणींना विवाहाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. व्यक्तिमत्त्व उजळून निघेल. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. मात्र, लोकांच्या मनात काय आहे याचाही विचार केला पाहिजे. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. कायद्याची बंधने कटाक्षाने पाळा. वाहन जपून चालवा.

वृषभ: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. दगदग होईल. गरजेपेक्षा जास्त परिश्रम करावे लागतील. त्यामुळे थोडी चिडचिड होऊ शकते. जीवनसाथीचे हट्ट पुरवावे लागतील. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. काहींना प्रवासाचा योग येईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. लोकांना मोठ्या अपेक्षा राहतील. कार्यक्षेत्रात नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल.

मिथुन: उत्साहात वाढ होईल. मनात कल्पक विचार असतील. जीवनसाथीशी सूर जुळतील. व्यवसायात लाभदायक परिस्थिती राहील. प्रेमात असणाऱ्यांनी मात्र सावधपणे वागण्याची गरज आहे. काही अडचणी येतील. इतरांच्या भानगडीत पडू नका. अचाट साहस करणे टाळा. अडचणी दूर होतील. काहींना अचानक प्रवास करावा लागेल. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी विचार केला जाईल. योजना लोकांना आवडतील.

कर्क: गुप्तता पाळा. काही कटु, तर काही गोड अनुभव येतील. आर्थिक उलाढाली जपून करा. महत्त्वाच्या योजना लोकांना सांगत बसू नका, नाही तर लोक त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. आरोग्याची काळजी घ्यावी. तिखट व मसालेदार पदार्थ खाणे टाळा. चांगले अनुभव येतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. अडचणी दूर होतील.

सिंह: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. सतत कशात ना कशात व्यस्त असाल. अनेक उपक्रम हाती घेण्यात उत्साह राहील. ऐनवेळी नियोजित कार्यक्रमात बदल होईल. वेळापत्रक विस्कळीत होईल. सामाजिक कार्यात मोठी जबाबदारी राहील. वेळेचे नियोजन नीट करा. काही कामे आधीच करून ठेवली तर ताण जाणवणार नाही. एखादी इच्छा पूर्ण होईल. योजनांच्या बाबतीत गुप्तता बाळगा. शब्दाला मान दिला जाईल. वाहन हळू चालवा.

कन्या: नवीन संधी मिळेल. चांगला काळ जाईल. एखादी चांगली बातमी कळेल. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी विचार केला जाईल. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. पण, संयमाने वागण्याची गरज आहे. घाईघाईत कामे उरकण्याचा प्रयत्न केला तर हातून चुका होऊ शकतात. योजनांची जास्त वाच्यता करू नका. कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका.

तूळ: चंद्राचे भ्रमण शुभ फळे देणारे ठरेल. व्यवसायात भरभराट होईल. नवीन कल्पना विकसित होतील. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. त्यातून कौशल्य सर्वांच्या लक्षात येईल. काहींना सामाजिक कार्यातून मान-सन्मान मिळेल. जवळचा प्रवास होईल. संयमाने वागण्याची गरज आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. फार दगदग करू नका.

वृश्चिक: विविध आघाड्यांवर सफलता मिळेल. धनलाभ, वडिलोपार्जित संपत्ती, व्यवसाय, शिक्षण इत्यादी बाबतीत चांगले परिणाम दिसून येतील. बोलण्याचा प्रभाव पडेल. जीवनसाथीची चांगली साथ राहील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील, भावंडांच्या भेटीगाठी होतील. जवळचा प्रवास होईल. नोकरीत अचानक नवीन जबाबदारी अंगावर पडेल. आर्थिक व्यवहारात सावध राहा. त्या दृष्टीने जपून निर्णय घ्या.

धनु: अडचणी दूर होतील. हलके वाटेल. मौजमजा करायला वेळ मिळेल. मनात सकारात्मक विचार राहतील. जीवनसाथी मर्जीनुसार वागेल. भेटवस्तू देण्यास हरकत नाही. अडलेली कामे मार्गी लागतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगले दिवस आहेत. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या, जवळच्या प्रवासात सतर्क राहा. नोकरीत नवीन संधी मिळेल. कामाचा ताण वाढेल.

मकर: चैन, हौस-मौज करण्याकडे कल राहील. त्यात बराच पैसा खर्च कराल. जीवनसाथीचे हट्ट पुरवावे लागतील. काही अडचणी येतील. मात्र, लवकरच त्या दूर होतील. काहींना अचानक प्रवास करावा लागेल. परिस्थिती आटोक्यात येईल. व्यवसायात अनुकूल स्थिती राहील. मालमत्तेचे व्यवहार करताना खबरदारी घ्यावी. वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा. भावंडांशी किरकोळ कारणावरून गैरसमज होऊ शकतात. व्यवसायात अंदाज चुकू शकतो.

कुंभ: पैसा मिळाला तरी तो खर्चही होईल. थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. कायद्याची बंधने पाळा. प्रवासात सतर्क राहा. काही प्रश्न आपोआप सुटतील. एखादी चांगली संधी मिळेल. अधिकारी वर्गाकडून कामाची प्रशंसा केली जाईल. मनात सकारात्मक विचार राहतील. थोरामोठ्यांच्या ओळखीचा फायदा होईल.

मीन: महत्त्वाची कामे करणे जास्त फायदेशीर ठरेल. आपण म्हणाल ती पूर्व दिशा अशी परिस्थिती राहील. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी विचार केला जाईल. कामाचा ताण वाढला तरी त्यातून फायदे पुष्कळ होतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. कामावर लक्ष केंद्रित करा. इतरांच्या भानगडीत पडू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.