Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 14:31 IST2025-07-07T13:43:33+5:302025-07-07T14:31:33+5:30
Chaturmas Rangoli Design, Vastu Shastra Benefits: ६ जुलै रोजी चातुर्मास(Chaturmas 2025) सुरु झाला आहे. त्यानिमित्त अनेक जण अनेक प्रकारचे संकल्प करतात आणि चार महिने त्यात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करतात. अशातच शारीरिक, मानसिक, आर्थिक लाभ देणाऱ्या दोन बोटांच्या रांगोळीची किमया जाणून घ्या आणि सुरूवात करा.

पूर्वीच्या लोकांकडे वेळच वेळ होता, आता दिनचर्येत झालेले बदल पाहता सकाळी उठून रांगोळी काढायला वेळ नाही अशी सबब अनेक जणी देतात. ही वस्तुस्थितीदेखील आहे, परंतु थोडं वेळेचं व्यवस्थापन केलं आणि रांगोळीसाठी ५ मिनिटं काढलीत तर तुम्हाला शारीरिक, मानसिक, आर्थिक लाभ होतील हे लक्षात ठेवा. कसे ते जाणून घेऊ!
रांगोळी काढता येत नाही, रेघ ओढता येत नाही, रंग भरता येत नाही असेही अनेक जणी म्हणतील. सरावाने सगळ्या गोष्टी जमतात, पण सातत्य ठेवायला हवे. आणि रांगोळी सुचण्याबद्दल म्हणाल तर इंटरनेटवर रांगोळीचे शेकडो प्रकार बघायला मिळतात. उंबरठ्यावरील रांगोळीपासून ते संस्कार भारती रांगोळी पर्यंत, शेकडो व्हरायटी आढळून येतात. प्रश्न असतो फक्त वेळ देण्याचा! परंतु रांगोळी काढण्याचे फायदे वाचले तर तुम्ही सुद्धा उद्यापासून ५ मिनिटं रांगोळी साठी राखीव ठेवाल हे निश्चित!
आनंदाच्या प्रसंगी, सणासुदीला दाराबाहेर आवर्जून रांगोळी काढली जाते. रांगोळीला प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि ती प्राचीन लोककला आहे. रांगोळीला अल्पना असेही म्हणतात. रंगातून अभिव्यक्त होणे म्हणजे रांगोळी असा हा संस्कृत शब्द आहे. यात स्वस्तिक, गोपद्म, शंख, त्रिशूल, नवग्रह रांगोळी अशी शुभ चिन्ह वापरली जातात. ताटाभोवती, तुळशीभोवती, उंबरठ्याजवळ, मंदिराच्या प्रांगणात रांगोळी काढली जाते. त्याचे शारीरिक, आर्थिक, मानसिक फायदे जाणून घेऊ.
रांगोळी काढताना अंगठा आणि बोटं जोडली जातात त्यामुळे ज्ञान मुद्रा तयार होते. जितका वेळ रांगोळी काढतो, तेवढा वेळ ती मुद्रा जोडलेल्या स्थितीत असल्यामुळे आपोआप मन केंद्रित होतं आणि शांत व स्थिर होतं. त्यामुळे मनःशांती लाभते. चित्त स्थिर होतं आणि आकलन क्षमता वाढते. विविध नक्षी काढण्याने कलात्मकता वाढते. रंगसंगतीमुळे निर्णयक्षमता वाढते.
रांगोळी आणि रंग यांचा संबंध थेट गणित आणि विज्ञानाशी आहे. ठिपक्यांच्या रांगोळीत रेघा चुकवून चालत नाही त्यामुळे गणित डोक्यात पक्कं बसतं आणि रंग संगतीची निवड करताना विज्ञान कार्यन्वीत होऊन मेंदूचा डावा भाग अधिक सक्षम होतो. खाली बसून रांगोळी काढण्याची गुडघ्यांची लवचिकता वाढते. मन आनंदी असेल तर तनालाही प्रसन्नता जाणवते आणि त्याचे पडसाद वास्तूवर पडतात.
ज्या घरासमोर, दारासमोर, अंगणात, तुळशीजवळ रांगोळी काढलेली असते, त्या वास्तूवर देवी लक्ष्मीचा वरदहस्त कायम असतो. कारण हीच देवीची प्रवेश द्वारं आहेत. तसेच रांगोळी ही नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची भावना वाईट असेल तरी रांगोळी पाहून त्याचे विकार नष्ट होतात. थकून भागून आलेली व्यक्ती नक्षीदार रांगोळी पाहून प्रसन्न होते. अर्धा शीण दूर होतो. घरातल्या लोकांवर सकारात्मक परिणाम होतो.