शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उत्तम मानसिक आरोग्यासाठी उत्तम रबरी चेंडू बना! - गौर गोपाल दास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 4:43 PM

1 / 6
गौर गोपाल दास सांगतात, एकाच वयाची दोन मुले खेळत असतात. एकाच्या हाती काचेची महागडी वस्तू असते तर दुसऱ्याच्या हाती रबरी चेंडू. काचेच्या वस्तूशी खेळणाऱ्या मुलाकडून ती वस्तू जमिनीवर पडते आणि क्षणात फुटून नामशेष होते. याउलट रबरी चेंडू जमिनीवर दहा वेळा टप्पा पडूनही फुटत तर नाहीच, उलट वेगाने वर उसळून येतो. आपल्याला रबरी चेंडूसारखे बनायचे आहे. खाली पडण्याचे प्रसंग कितीही आले, तरी नव्या जोमाने उसळी मारून वर येता आले पाहिजे.
2 / 6
निरुत्साही वाटणे, वाईट वाटणे, दुखावले जाणे, रडू येणे या सगळ्या भावना प्रत्येकाच्या वाट्याला येतात. तसे वाटणे कमकुवत पणाचे लक्षण अजिबात नाही. उलट तसे न वाटणे हे चुकीचे ठरू शकते. दगडाला भावना नसतात. आपल्याला दगडाची कणखरता हवी आहे, दगडाचा स्वभाव नाही. त्यामुळे कधी वाईट प्रसंग आला तर खचून जाऊन आयुष्य वाईट आहे असा समज करून घेऊ नका, तर वाईट काळ आहे तो निघून जाईल याची खात्री बाळगा.
3 / 6
इतर काय बोलले यापेक्षा आपण आपल्याबद्दल काय बोललो याचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होतो, हे लक्षात ठेवा. आपण जे वाचतो, बोलतो, बघतो आणि त्यावर जे चिंतन करतो, यातून आपली मानसिकता घडत असते. त्यामुळे स्वतःला कायम प्रोत्साहन देत राहा. सकारात्मक सूचना देत राहा. तसे केल्यामुळे इतरांच्या बोलण्याचा आपल्यावर प्रभाव न पडता आपल्या बोलण्याने आपल्यात अधिक चांगले बदल घडतील.
4 / 6
सोशल मीडिया आल्यापासून आपला बराचसा काळ दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावण्यात आणि त्यांच्याशी तुलना करण्यात वाया जातो. याउलट माझ्याकडे काय आहे आणि मी कुठे कमी पडतोय, त्यावर मी कशी मात करू शकेन याचा विचार केला आणि त्या अनुशंगाने कृती केली, तर तुमची स्पर्धा कायम स्वतःशी राहील. दुसऱ्यांशी तुलना करत राहिलात तर कधीच आनंदी होऊ शकणार नाही. स्वतःचा आनंद स्वतःमध्ये शोधा.
5 / 6
आपण महालात राहून दुःखी आणि झोपडीत राहूनही सुखी होऊ शकतो. त्याला जबाबदार असते ती म्हणजे संगत-सोबत. लोकांमध्ये ऊर्जा असते. त्या ऊर्जेचे आदान प्रदान होऊन वातावरण निर्मिती होते. त्यामुळे तुम्ही ज्यांच्याबरोबर वेळ घालवणार आहात ते तुमच्या मानसिक आरोग्यासाठी योग्य आहेत की अयोग्य याचा जरूर विचार करा. अपरिहार्य कारणाने संगत बदलणे शक्य नसेल तर दिवसातले काही तास सकारात्मक लोकांच्या, ग्रंथांच्या, पुस्तकांच्या सान्निध्यात घालवा, जे तुमचे मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यास मदत करतील.
6 / 6
सरतेशेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या मनाचे आरोग्य चांगले ठेवणे हे पूर्णपणे आपल्या हातात आहे, ज्या दिवशी तुम्ही तुमचा आनंद दुसऱ्यांमध्ये शोधू लागाल, त्यादिवसापासून तुम्ही दुसऱ्यांनी दिलेल्या सुख दुःखाच्या तालावर नाचत राहाल. यासाठी आपल्या भावनांचा आदर करा, मनाला आनंदी ठेवा. जोवर तुम्ही आनंदी राहू शकणार नाही, तोवर तुम्ही दुसऱ्यांना आनंद देऊ शकणार नाही.
टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य