Join us  

राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ मधील प्ले ऑफमधील जागा जवळपास निश्चित केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 11:08 PM

Open in App

IPL 2024, Lucknow Super Giants vs Rajasthan Royals Marathi Live : राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ मधील प्ले ऑफमधील जागा जवळपास निश्चित केली आहे. RR ने शनिवारी लखनौ सुपर जायंट्सवर सहज विजय मिळवून खात्यातील गुणांची संख्या १६ झाली आहे. लोकेश राहुल व दीपक हुडा यांच्या अर्धशतकी खेळीला संजू सॅमसन व ध्रुव जुरेल यांनी चोख प्रत्युत्तर दिले. 

KL Rahul आणि दीपक हुडा यांच्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर LSG ने ५ बाद १९६ धावा उभ्या केल्या. ट्रेंट बोल्टने पहिल्या षटकात क्विंटन डी कॉकचा ( ८) त्रिफळा उडवला. त्यानंतर संदीप शर्माने दुसऱ्या षटकात मार्कस स्टॉयनिसचा ( ०) त्रिफळा उडवून LSG ला ११ धावांवर दुसरा धक्का दिला. पण, कर्णधार राहुल व हुडा ही जोडी मैदानावर उभी राहिली. आर अश्विनने १३व्या षटकात RR ला मोठी विकेट मिळवून दिली. दीपक हुडा ३१ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ५० धावांवर बाद झाला आणि लोकेशसह त्याची ६२ चेंडूंत ११५ धावांची भागीदारी संपुष्टात आली. लोकेशने ४८ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ७६ धावा केल्या.  आयुष बदोनी ( १८), कृणाल पांड्या ( १५) व निकोलस पूरन ( ११) यांनी योगदान दिले.

यशस्वी जैस्वाल व जॉस बटलर यांनी RR ला चांगली सुरुवात करून देताना पाच षटकांत ५० धावा फलकावर चढवल्या. यश दयालने सहाव्या षटकात LSG ला विकेट मिळवून दिली. बटलर १८ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३४ धावांवर त्रिफळाचीत झाला. पुढच्याच षटकात मार्कस स्टॉयनिसने LSG ला मोठे यश मिळवून देताना यशस्वीला ( २४) माघारी पाठवले. रियानला ( १४) अमित मिश्राने मोठा फटका मारण्यासाठी भाग पाडले आणि झेलबाद केले. ध्रुव जुरेल व संजू यांनी संयमी खेळ करताना अर्धशतकी भागीदारी पूर्ण करून RR ची गाडी रुळावर आणली.  संजूने १५व्या षटकानंतर गिअर बदलला आणि रवी बिश्नोईच्या षटकात १६ धावा कुटल्या व संघाला १६ षटकांत १६० धावांपर्यंत पोहोचवले. RR ला शेवटच्या ४ षटकांत ३७ धावा करायच्या होत्या. सॅमसनने २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि जुरेलसोबत १२१ धावांची भागीदारी केली. जुरेलने ३१ चेंडूंत त्याची फिफ्टी पूर्ण केली.  RR ने १९ षटकांत ३ बाद १९९ धावा करून ७ विकेट्सने विजय मिळवला. संजू  ३३ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७१ धावांवर नाबाद राहिला, तर ध्रुवनेही ३४ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह नाबाद ५२ धावा केल्या.  

टॅग्स :आयपीएल २०२४राजस्थान रॉयल्ससंजू सॅमसनलखनौ सुपर जायंट्सलोकेश राहुल