कोणत्या मुहुर्तावर होणार रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना? ग्रहांचे अद्भूत, शुभ संयोग; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 02:06 PM2023-12-28T14:06:52+5:302023-12-28T14:19:45+5:30

रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त अनेकार्थाने शुभ मानला गेला असला, तरी श्रेय घेण्यावरून वाद होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. भाजप आणि पंतप्रधान मोदींसाठी ग्रहस्थिती कशी असेल?

गेली शेकडो वर्षे ज्या क्षणाची वाट संपूर्ण देश पाहत होता, तो क्षण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम जलदगतीने सुरू आहे. राम मंदिर परिसरात पंचायन देवतांची मंदिरेही असणार आहेत. राम मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांच्या सोयी, सुविधेसाठी अनेक गोष्टी केल्या जात आहेत. संपूर्ण देश राम मंदिर लोकार्पणाची वाट पाहत आहे.

श्रीरामलल्लाची प्राणप्रतिष्ठा नवीन राम मंदिरात केली जाणार आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२ वाजून ३० मिनिटे या मुहुर्तावर रामलल्ला विराजमान होणार आहे. राम दर्शनाची भाविकांना आस लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह हजारो मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा होणार आहे. या सोहळ्याचा मुहूर्त खास असल्याचे सांगितले जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे काही अद्भूत शुभ संयोग जुळून येत आहेत.

२२ जानेवारी २०२४ रोजी शुभ मानले गेलेले मृगशीर्ष नक्षत्र आहे. सोमवार शुभ आहे. सोमवारी मृगशीर्ष नक्षत्राचा संयोग शुभ मानला गेला आहे. कोणत्याही शुभ कार्यासाठी लग्न स्थानाला सर्वाधिक महत्त्व असते. रामलल्ला जेव्हा विराजमान होतील, तेव्हा पूर्व क्षितिजावर मेष राशीचा उदय होईल. कोणतेही काम जे दीर्घकाळ सुरळीतपणे चालू राहणे अपेक्षित आहे, त्यासाठी स्थिर राशीचे लग्न सर्वोत्तम मानले जाते. मात्र, मेष लग्न हे चर आहे.

नवमेश शुभ गुरु ग्रहाच्या स्थितीमुळे चर लग्न ग्राह्य मानले जाईल. नवांशात स्थिर वृश्चिक राशीचा चांगली मानली गेली आहे. मात्र, स्थित रास वृश्चिकेच्या नवांशापेक्षा अन्य स्थिती ग्राह्य धरली असती, तर अभिजित मुहुर्तावर नवांश लग्न स्थानापासून नवव्या स्थानी असलेल्या गुरु ग्रहाची शुभता कदाचित मिळाली नसती, असे सांगितले जात आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे लग्न स्थानाचा स्वामी मंगळ आणि भाग्य स्थानाचा स्वामी गुरु यांचा परिवर्तन योग अतिशय शुभ योग मानला जात आहे.

एकूणच हा एक सामान्य मुहूर्त आहे, जो देश-काल आणि परिस्थिती लक्षात घेऊन निवडलेला चांगला मुहूर्त आहे. असे असले तरी नवव्या स्थानी अष्टमेष मंगळाची स्थिती अखंड सावध राहावे, हेच दर्शवणारी आहे. प्रभू श्रीरामांची रास कर्क आहे आणि शुभ मुहुर्ताची रास वृषभ आहे. वृषभ ही कर्क राशीपासून अकरावी रास आहे. रामलल्लाची जन्म रास असलेल्या कर्क राशीतून उच्चस्थानी असलेला चंद्र उपचय स्थानी असणे फारच शुभ आहे. मुहूर्त कुंडलीपासून लग्न स्थानापासून केंद्र कोनात शुभ ग्रह असणे आणि सहाव्या, अकराव्या घरात अशुभ ग्रह असणे चांगले मानले गेले आहे.

मुहूर्त कुंडलीवरून ग्रहांचा राजा सूर्याचे उपचय स्थानी असणे, दिग्बली असणे, दशम भावात असणेही शुभ आहे. या ग्रहस्थितीमुळे राम मंदिरावरून राजकाण तापण्याची चिन्हे आहेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राजकारणाच्या दृष्टीकोनातून भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मुहूर्त कुंडलीनुसार वृश्चिक राशीपासून लग्न स्थान सहाव्या स्थानी येत असून, चंद्र सातव्या स्थानी येणार आहे.

लग्न आणि सहाव्या स्थानाची स्थिती वाद आणि विरोध दर्शवते. त्यामुळे श्रेयवाद निर्माण होऊ शकतो. श्रेयवादावरून विरोधाला सामोरे जावे लागू शकते. परंतु भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म राशीतून सप्तमात मुहूर्ताच्या वेळी वृषभ राशीतील उच्च चंद्राची उपस्थिती हा मोठी कीर्ती मिळवून देणारा योग आहे, असे सांगितले जात आहे.

सातवे स्थान समाजजीवनातील पुनर्वसन मानले जाते. त्यामुळे हिंदुत्वाच्या विचारसरणीचा हा पक्ष वेगळ्या पद्धतीने राम मंदिर उभारणीचा मुद्दा जनतेसमोर आणण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा निवडणुकीत होऊ शकतो, असा दावा केला जात आहे.

- सदर मान्यता आणि ज्योतिषीय दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.