Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 17:17 IST2025-07-03T17:03:00+5:302025-07-03T17:17:53+5:30
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर अनेक शुभचिन्ह आहेत, पण मस्तकावर असलेले शिवलिंग अनेकांना माहीतही नाही! मात्र पंढरपुरातल्या मूर्तीची रोज पूजा होत असताना शिवलिंगाचीही विशेष पूजा केली जाते. मात्र हे शिवलिंग पांडुरंगाच्या मस्तकी आले कुठून? आषाढी एकादशीनिमित्त(Ashadhi Ekadashi 2025) जाणून घेऊया कथा!

मैलोनमैल चालत जाणारा वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी व्याकुळ होतो, पण दर्शनाची वेळ आली की क्षणार्धात तिथून गर्दीमुळे दूर सारला जातो. त्यामुळे पांडुरंगाची मूर्ती त्याला पूर्णत: न्याहाळता येत नाही. फोटोत जी मूर्ती पाहतो त्यात ठळकपणे दिसतात ती मकरकुंडले, कौस्तुभमणी, श्रीवत्सलांछन, समचरण, तोडे इत्यादी...पण पांडुरंगाच्या मस्तकावर असलेले शिवलिंग मुकुटामुळे झाकले जाते, त्याबद्दल अनेकांना माहीत नाही.
पंढरपूरच्या पाडुरंगाच्या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग आहे आणि रोज त्याची पूजाही होते. हे शिवलिंग पांडुरंगाने मस्तकावर का धारण केले याबद्दल एक कथा सांगितली जाते.
त्या संबंधीची अशी कथा सांगितली जाते की एकदा भगवान शंकर श्री विठ्ठलाच्या भेटीला आले आणि त्याचे राजस सुकुमार रूप पाहून मोहित झाले आणि त्यांनी विठ्ठलाशी एकरूप व्हावे अशी इच्छा प्रगट केली. तेव्हा विठ्ठलांनी त्यांना मस्तकी धारण केले, जोडूनच नागराज मस्तकी आले आणि विठ्ठल शिवरूप झाले. थोडक्यात पांडुरंग रूपातही पुन्हा हरी आणि हर यांची भेट झाल्याचे दिसून येते.
पांडुर म्हणजे पांढराशुभ्र आणि अंग म्हणजे शरीर. ज्याचे अंग पांढरेशुभ्र आहे असा देव कोण आहे तर भगवान शंकर. श्री विठ्ठल हा तर कृष्ण असल्यामुळे काळा आहे आणि शंकर करपूरगौरवम म्हणजे कापराप्रमाणे गोरा आहे. पण सावळ्या विठ्ठलाने त्यास मस्तकीधारण केल्याने त्यांचे नावही धारण केले पांडुरंग.
समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे विठोने वाहिला शिरदेव राणा म्हणजे विठ्ठलाने शंकराला मस्तकावर वाहिले आहे. प्रख्यात कवी अनंतरावजी आठवले शंकराच्या स्तोत्रात म्हणतात.. विठ्ठले धरिले शिरी शिवलिंग ते मुक्कुटा करती।। म्हणजे विठ्ठलाने मुक्कुटाच्या आकाराचे शिवलिंग धारण केले आहे. शोभतो जलदापरी (ढगापरी) हरि इंदिरावर सावळा ।। कुंद सुंदर गौर हा हर भेद ना परी राहिला।। पांडुरंगच बोलती गुज भाविका कळले यदा ।। म्हणजेच विठ्ठल हा मेघाप्रमाणे सावळा आहे व शंकर हा कुंद कळ्याप्रमाणे शुभ्र आहे.
हे दोघेही एकरूप झाल्यामुळे विठ्ठलालाच लोक पांडुरंग म्हणतात. शिव आणि विष्णू यांचे ऐक्य झालेले तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूर म्हणून नावारूपाला आले. संत नरहरी सोनार हे कट्टर शिवभक्त असूनही त्यांना पांडुरंगाच्या ठायी शंकराच्या अस्तित्त्वाची प्रचिती आली आणि तेही पांडुरंग भक्त झाले.
त्यामुळेच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि सध्याचे तेलंगणा राज्यातून शिवभक्त तसेच लिंगायत पथाचे धर्मगुरू विठ्ठलाच्या दर्शनासाठी आवर्जून येथे येतात. शिवरात्रीलाही पंढरपुरात सर्व वारकरी उपवास करतात.