गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 11:11 AM2024-05-10T11:11:57+5:302024-05-10T11:18:55+5:30

अक्षय्य तृतीयेला जुळून आलेल्या शुभ योगांचा शुभ प्रभाव काही राशींवर पडून लक्ष्मी देवीची अक्षय्य कृपा राहू शकते, असे सांगितले जात आहे.

१० मे रोजी अक्षय्य तृतीया आहे. हा दिवस मराठी वर्षातील अनेकविध महत्त्वाच्या सण-उत्सवांपैकी अनन्य साधारण महत्त्व असलेला दिवस आहे. या दिवशी केलेले शुभ कार्याचे अक्षय्य पुण्य लाभू शकते, अशी मान्यता आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला सोने-चांदी, वाहन, घर तसेच विविध गोष्टी आवर्जून खरेदी केल्या जातात.

ज्योतिषशास्त्रानुसार, अक्षय्य तृतीयेला सूर्य आणि शुक्र या दोन ग्रहांचा मेष राशीत शुक्रादित्य योग जुळून येत आहे. याशिवाय वृषभ राशीत चंद्र आणि गुरूच्या युतीमुळे गजकेसरी योगही तयार होत आहे. मीन राशीत मंगळ आणि बुध या ग्रहांच्या संयोगामुळे धन योग तयार होत आहे. शनिदेव मूळ त्रिकोणी कुंभ राशीत असताना शश योग निर्माण होत आहे. अक्षय्य तृतीयेला काही राशीच्या लोकांना लक्ष्मी देवीचा विशेष शुभाशीर्वाद मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.

सन २०२४ च्या अक्षय्य तृतीयेला रवियोग, धन योग, शुक्रादित्य योग, गजकेसरी योग, षष्ठ योग आणि मालव्य राजयोग तयार होत असल्याने या दिवसाचे महत्त्व खूप वाढले आहे. या शुभ योगांचा शुभ प्रभाव काही राशींवर पडू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

मेष: अक्षय्य तृतीया अतिशय शुभ ठरू शकेल. लक्ष्मी देवीची विशेष कृपा असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकेल. चांगली बातमी मिळेल. जे काम अनेक महिन्यांपासून होत नव्हते ते आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. कामात येणारे अडथळे दूर होऊ शकतील. नशिबाची साथ मिळू शकेल. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नवीन काम सुरू करण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस मिळणार नाही.

वृषभ: अक्षय्य तृतीयेला लक्ष्मी देवीची विशेष कृपा असेल. मनोकामना पूर्ण होतील. आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळू शकतील. नशिबाची साथ मिळेल. कामात येणारे अडथळे दूर होतील. नोकरदारांना पदोन्नती आणि पगारात वाढ होण्याची चिन्हे आहेत. व्यवसायात भरपूर नफा मिळू शकतो. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असतील तर फायदेशीर ठरेल. अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन: आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. मेहनतीचे फळ मिळू शकेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकेल. सोन्या-चांदीची खरेदी करू शकता. घरातील ज्येष्ठांसाठी काही भेटवस्तू खरेदी करू शकता. व्यावसायिकांना प्रगतीची संधी मिळू शकेल. जोडीदाराकडून प्रत्येक पावलावर साथ मिळू शकेल.

कन्या: लक्ष्मीच्या कृपेने धनप्राप्तीचा मार्गही मोकळा होऊ शकेल. नोकरदारांना ऑफिसमध्ये मोठी जबाबदारी मिळू शकेल. करिअरमध्ये प्रगती होईल. प्रभाव वाढेल. विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करत आहेत, त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर शुभ योग आहेत. नशिबाने चांगले यश मिळेल. अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळाल्यास व्यावसायिकांना खूप आनंद होईल. व्यवसायाची विश्वासार्हताही वाढेल. कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. वडिलांच्या मदतीने फ्लॅट किंवा जमिनीतही गुंतवणूक करू शकता.

तूळ: लक्ष्मीची कृपा राहील. सर्व कार्य यशस्वी होतील. आनंदाच्या बातम्या मिळतील. आध्यात्मिक कार्यात आवड वाढेल. बँक शिल्लक वाढेल. कल्पनांच्या आधारे नफा मिळवू शकाल. जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले राहती. एकत्र काही मालमत्ता खरेदी करू शकता.

मीन: धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. आत्मविश्वासात वाढू शकेल. शत्रूंवर प्रभुत्व मिळवाल. प्रत्येक काम विचारपूर्वक आणि यशस्वीपणे पूर्ण कराल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले निकाल मिळतील. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. नोकरदारांना एखाद्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते, ज्याचा ते विचार करू शकतात. मुलांचा विकास पाहून तुम्हाला आनंद होईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.