६ ग्रहांचे गोचर: ४ राशींना सोसावी लागेल ऑक्टोबर ‘हीट’, ८ राशींसाठी सुपरहिट; महिनाभर लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 01:07 PM2023-09-26T13:07:14+5:302023-09-26T13:17:42+5:30

नवग्रहांपैकी सहा ग्रहांचे ऑक्टोबर महिन्यात होणारे गोचर कोणत्या राशींना सर्वोत्तम ठरू शकेल? तुमची रास कोणती? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, ऑक्टोबर महिना विशेष ठरणार आहे. कारण नवग्रहांपैकी ६ ग्रहांचे गोचर ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. याचा प्रभाव केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर पडू शकेल, असे म्हटले जात आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच ०१ ऑक्टोबर रोजी नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. याच दिवशी शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे.

नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह ०३ ऑक्टोबर रोजी तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तर नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य ग्रह १७ ऑक्टोबर रोजी तूळ राशीत विराजमान होईल. लगेचच १८ ऑक्टोबर रोजी बुध तूळ राशीत प्रवेश करेल. यामुळे तूळ राशीत बुधादित्य आणि त्रिग्रही योग जुळून येऊ शकेल.

ऑक्टोबर महिना राहु आणि केतुच्या गोचरामुळे सर्वाधिक विशेष ठरणार आहे. ३० ऑक्टोबर रोजी राहु आणि केतु अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत प्रवेश करणार आहेत. या सर्व ग्रहांचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. आगामी ऑक्टोबर महिना काही राशींना संमिश्र ठरू शकेल, तर काही राशींना लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

मेष: आरोग्यात सुधारणा दिसून येईल. तसेच तुमची सर्व कामे होतील. एवढेच नाही तर ऑक्टोबर महिन्यात धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक आघाडीवर लाभ होऊ शकतील. कौटुंबिक वातावरणही चांगले राहणार आहे.

वृषभ: ऑक्टोबर महिन्यात केलेल्या प्रयत्नांचे फळ काही काळानंतरच मिळेल. जवळच्या व्यक्तीकडून पैसे आणि भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात खर्चही खूप वाढणार आहे. त्यामुळे बजेटची अधिक काळजी घ्या.

मिथुन: अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. भावंडांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. ऑक्टोबर महिन्यात सर्व बिघडलेली कामे मार्गी लागू शकतील. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी एखाद्या गोष्टीबद्दल खूप उत्साही होऊ शकता. तापटपणा वाढू शकतो. रागावर नियंत्रण ठेवावे.

कर्क: ऑक्टोबर महिन्यात कामात काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. परंतु, कालांतराने यश मिळेल. या महिन्यात तुमचा खर्च वाढू शकतो. आजूबाजूच्या लोकांशी थोडे सावध राहा. घरगुती कामातही विलंब होऊ शकतो.

सिंह: कोणत्याही महत्त्वाच्या कामात अडथळे पार करून यश मिळेल. ऑक्टोबर महिन्यात अनेक चांगल्या बातम्या मिळू शकतात. रवि गोचराच्या प्रभावामुळे कामात खूप संघर्ष करावा लागू शकतो. आर्थिक लाभ मध्यम असणार आहेत.

कन्या: ऑक्टोबर महिना खूप चांगला जाणार आहे. या महिन्यात आर्थिक लाभ आणि प्रगती मिळण्याची चांगली शक्यता आहे. अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. केतूच्या गोचरामुळे संधींचा योग्य फायदा घेता येऊ शकेलच असे नाही. कुटुंबात शांतता राखण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील.

तूळ: काही चांगली सुखद घटना घडण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रतिष्ठित लोकांच्या संपर्कातून प्रगतीची संधी मिळेल. ऑक्टोबर महिन्यात धार्मिक कार्यात अधिक रस निर्माण होऊ शकेल.

वृश्चिक: राहु आणि केतूच्या संयोगामुळे ऑक्टोबर महिन्यात बहुतांश वेळ व्यर्थ कामांमध्ये घालवावा लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. डोळ्यांचे दुखणे वाढू शकते. कुटुंबातील आवश्यक खर्चात वाढ होईल.

धनु: कामात खूप व्यस्त असाल. पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते मिळू शकतात. कौटुंबिक आनंदात वाढ होईल. सध्या अचानक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिना जसजसा पुढे जाईल, तसे जवळच्या नातेवाईकाशी वाद होऊ शकतात.

मकर: अध्यात्मिक कार्यात रुची राहील. याशिवाय घरामध्ये धार्मिक कार्य होईल. अनेक कामे अचानक पूर्ण होतील. ते पाहून आश्चर्य वाटेल. समाजात मान-सन्मान वाढेल. व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीची शक्यता आहे.

कुंभ: ऑक्टोबर महिन्यात यश मिळवू शकाल. सरकारी अधिकाऱ्यांकडून मान-सन्मान मिळू शकेल. व्यवसाय आणि नोकरीमध्ये मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. चैनीच्या वस्तूंवर जास्त पैसे खर्च करू शकता.

मीन: ऑक्टोबर महिन्यात खर्च खूप वाढणार आहे. अपेक्षेच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी. काही मुद्द्यांवर तणाव आणि गोंधळ होईल. नवीन योजना करण्यात अधिक वेळ द्याल. नोकरी आणि अधिकारी यांच्यामुळे अनावश्यक ताण येईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.