एक्झिट पोलसारखेच वातावरण राहिले तर महाराष्ट्र विधानसभेला काय होणार? ठाकरेंची चारही बोटे तुपात...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 11:51 AM2024-06-03T11:51:57+5:302024-06-03T12:00:34+5:30

Maharashtra Assembly Election: लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातील फुटलेली राजकीय परिस्थिती पाहता लोकसभेचा निकाल बऱ्याच अंशी महत्वाचा राहणार आहे.

बहुतांश सर्व एक्झिट पोलनी मोदी सरकार परत येणार असल्याचे अंदाज वर्तविले आहेत. भाजपाला ३०० पारचे बहुमत मिळताना दिसत आहे. या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रासह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातील फुटलेली राजकीय परिस्थिती पाहता लोकसभेचा निकाल बऱ्याच अंशी महत्वाचा राहणार आहे.

इंडिया टुडेच्या एक्झिटपोलवरून महाराष्ट्रातील विधानसभेला काय परिस्थिती असणार याचा अंदाज येत आहे. या राज्यांत प्रचंड विरोध असूनही एनडीए एक नंबरची पसंती आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादीत अस्तित्वावरून लढाई आहे. तसेच एनडीएला राज्यात अँटी इन्कम्बंसीचा फटका बसताना दिसत आहे.

हे चित्र जरी लोकसभेचे असले तरी विधानसभेचे मुद्दे थोडे वेगळे असतात. विधानसभेला स्थानिक मुद्द्यांवरून राजकारण केले जाते. एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात एनडीएला ३० आणि इंडी आघाडीला १८ जागा मिळताना दिसत आहेत. शिवसेना आणि एनसीपीच्या दोन गटांमुळे एनडीएला कमीतकमी ११ जागांवर फटका बसताना दिसत आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे यावरून मविआमध्ये नाराजीचे फटाके फुटण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे गटाला १० जागा मिळताना दिसत आहेत तर शरद पवार गट आणि काँग्रेसला प्रत्येकी ४-४ जागा सुटताना दिसत आहेत. म्हणजेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मते ठाकरेंना मिळत आहेत परंतु ठाकरेंची मते या दोघांकडे वळत नसल्याचे दिसत आहे.

मतदानाची टक्केवारी पाहिली असता एनडीएला ४६ टक्के आणि मविआला ४३ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. एनडीएची चार टक्के मते घटत असून मविआची ११ टक्के मते वाढत आहेत.

२०१९ मध्ये शिवसेनेला २४ टक्के मते मिळाली होती. आता शिंदे गटाला १३ टक्के आणि ठाकरे गटाला २० टक्के मतदान होताना दिसत आहे. गेल्यावेळी शिवसेनेने २३ जागांवर निवडणूक लढविली होती. आता दोन्ही गट एकूण ३६ जागांवर लढत आहेत. यामुळे दोन्ही गटांचे एकूण मतदान ३३ टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसची अल्पसंख्यांक मते मिळत आहेत. २०१९ ला शिवसेनाला ८ टक्के आणि भाजपाला २ टक्क्यांचे नुकसान झाले होते. म्हणजेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची चारो उंगलिया घी मे अशी विन विन परिस्थिती आहे.

या एक्झिट पोलवरून विधानसभेचे चित्र पाहिल्यास एनडीए आणि मविआ यांच्यात तुल्यबळ लढत होणार आहे. लोकसभा ट्रेंड्स जरी ठाकरेंना जास्तीच्या जागा देत असले तरी एनडीए किंवा महाविकास आघाडीला कोणताही फायदा होताना दिसत नाहीय. येत्या दोन महिन्यांत राजकारण पालटले, एकडच्या नेत्यांनी तिकडे उड्या मारल्या तरच काहीतरी फरक दिसणार आहे.