२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 14:58 IST2025-10-03T14:34:31+5:302025-10-03T14:58:11+5:30
Ashwin Shani Pradosh October 2025: शनि कृपा झाली की, गरीब व्यक्ती श्रीमंत होण्यास वेळ लागत नाही, असे म्हटले जाते. आता कोणत्या राशींची साडेसाती सुरू आहे? शनि संबंधित कोणते उपाय रामबाण ठरतात? जाणून घ्या...

Ashwin Shani Pradosh October 2025: चातुर्मासातील अश्विन महिना सुरू आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच अत्यंत शुभ पुण्य फलदायी मानले गेलेले शनि प्रदोष व्रत आहे. प्रदोष व्रत प्रामुख्याने महादेवांना समर्पित आहे. शनिवारी प्रदोष आला की, शनि प्रदोष व्रत केले जाते. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते.
शनिदेव महादेवांना आपले गुरु मानतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे शनिप्रदोष दिवशी महादेवांच्या विशेष पूजनासह शनि पूजन, नामस्मरण, उपासना करणे विशेष लाभदायी मानले गेले आहे. शनिप्रदोष व्रताचे पालन केल्याने शनिदेवाचा प्रतिकूल प्रभाव कमी होतो आणि हळूहळू सकारात्मकता येऊ शकते, असे म्हटले जाते.
शनि कर्मकारक ग्रह आहे. शनि नवग्रहांचा न्यायाधीश आहे. पुराणात शनिबाबत अनेक मान्यता, कथा प्रचलित आहेत. नवग्रहांमध्ये शनि ग्रह हा सर्वांत कमी वेगाने गोचर करणारा ग्रह आहे. शनिची साडेसाती ही सर्वाधिक प्रभावी मानली जाते. साडेसात वर्षांचा काळ अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जातो.
ज्या राशींची साडेसाती सुरू आहे आणि ज्या राशींवर शनि ढिय्या प्रभाव सुरू आहे. अशा व्यक्तींनी शनि प्रदोष व्रत करताना काही उपाय अवश्य, आवर्जून करावेत, असे म्हटले जाते. हे उपाय केल्यास शनि दोष, शनिचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यात मदत मिळू शकते, असे सांगितले जाते.
सद्य स्थितीत शनि हा गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत विराजमान आहे. शनि हा मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहेत. तूळ ही शनिची उच्च रास आहे, तर मेष ही त्याची नीच रास मानली जाते. पुष्य, अनुराधा व उत्तराभाद्रपदा या तीन नक्षत्रांचे स्वामित्व शनिकडे आहे. अंकशास्त्राप्रमाणे ८ या मूलांकाचे स्वामित्व शनिकडे आहे.
सन २०२५ मध्येच शनि मीन राशीत विराजमान झाला आहे. मीन राशीत शनि जून २०२७ पर्यंत असणार आहे. शनि मीन राशीत विराजमान असल्यामुळे कुंभ, मीन आणि मेष राशीची साडेसाती सुरू आहे. कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा, मीन राशीचा साडेसातीचा दुसरा/मधला टप्पा आणि मेष राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे.
तसेच शनि ग्रहाने मीन राशीत प्रवेश केल्यानंतर कर्क आणि वृश्चिक राशीचा ढिय्या प्रभाव समाप्त झाला आहे. तर, सिंह आणि धनु राशीवर शनिचा ढिय्या प्रभाव सुरू झाला आहे. त्यामुळे शनि प्रदोषाच्या दिवशी शनि साडेसाती आणि ढिय्या प्रभाव असलेल्या व्यक्तींनी काही उपाय करणे गरजेचे ठरते.
शुक्रवार ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ०९.२८ मिनिटांनी पंचक सुरू झाले असून, शनिवार, ०४ ऑक्टोबर २०२५ ला शनि प्रदोष व्रत आहे. आवर्जून शनि मंदिरात जावे आणि दर्शन घ्यावे. या वेळेस शनि महाराजांना काळे तीळ, तेल अर्पण करावेत. पिंपळाच्या झाडाशी जल अर्पण करून दिवा दाखवावा. शनि संबंधित वस्तू काळे वस्त्र, काळे तीळ, मोहरीचे तेल दान करावे.
शनि हा महादेवांना आपले गुरु मानतो, अशी मान्यता आहे. शंकरांनीच शनिला नवग्रहांचे न्यायाधीश पद दिले आहे, असेही म्हटले जाते. शनि साडेसाती, ढिय्या प्रभाव, महादशा काळात शक्य तेवढी महादेवांची उपासना, नामस्मरण, मंत्रांचे जप करणे अतिशय शुभ मानले जाते.
शनि मंदिरात जाऊन दिवा लावावा. शनि उपासना, शनि स्तोत्राचे २१ वेळा पठण, शनि चालिसा पठण, शनिदर्शन असे उपाय सांगितले जातात. ज्या लोकांना शनी महादशामुळे त्रास होत असेल त्यांनी या शनि धाम यात्रा करणे लाभदायक मानले गेले आहे.
पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून नियमितपणे अर्पण करावे. पिंपळ पूजन, तेथे नियमितपणे दिवा लावणे, शनीच्या आवडत्या वस्तूंचे अर्पण, दान असेही काही उपाय सांगितले जातात. स्वकष्टार्जीत धनातून गरजूंना अन्नधान्य दान करावे. शनिवारी काहीतरी दान करावे.
तसेच आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे लाभप्रद ठरते. साडेसाती सुरू असताना प्रतिकूल प्रभाव कमी करण्याची मारुती, विष्णू, महादेव या देवांची उपासना, नामस्मरण उपयुक्त ठरते, असे सांगितले जाते.
हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे, हनुमान चालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत.
नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्। छायामार्तण्ड सम्भूतं तं नमामि शनैश्चरम्॥ हा नवग्रह स्तोत्रातील शनीचा मंत्र आहे. ॥ ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः॥, हा शनीचा बीज मंत्र आहे. ॥ ॐ काकध्वजाय विद्महे खड्गहस्ताय धीमहि तन्नो मन्दः प्रचोदयात्॥, हा शनीचा गायत्री मंत्र आहे. ॐ शं शनैश्चराय नमः॥ हा शनीचा मूलमंत्र आहे. यांचा यथाशक्ती जप करावा.
कुंडलीत शनिची स्थिती कमकुवत असेल आणि प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल, तर शनिवारी विशेष व्रत करावे. शनिशी संबंधित वस्तूंचे यथाशक्ती दान करावे, असे सांगितले जाते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.