५ राजयोगात संकष्ट चतुर्थी: १० राशींची इच्छा पूर्ण, मान-सन्मान; यश-कीर्ती-लाभ, शुभ-वरदान काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 09:16 IST2025-10-09T09:00:51+5:302025-10-09T09:16:20+5:30

Sankashti Chaturthi October 2025: शुक्रवारी चातुर्मासातील शेवटची अश्विन संकष्टी चतुर्थी येत असल्याने गणेशासह लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद लाभू शकतील. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या...

Sankashti Chaturthi October 2025: यंदा अश्विन महिन्यातील संकष्ट चतुर्थी शुक्रवारी येत आहे. आषाढ शुद्ध एकादशीपासून सुरू झालेला अतिशय शुभ चातुर्मास काळ कार्तिक शुद्ध एकादशीला समाप्त होतो. त्यामुळे अश्विन संकष्ट चतुर्थी ही चातुर्मासातील शेवटची संकष्ट चतुर्थी मानली जाते.

शुक्रवार, १० ऑक्टोबर २०२५ रोजी संकष्ट चतुर्थी आहे. या संकष्ट चतुर्थीला नवपंचम योग, नीच भंग योग, शुक्रादित्य योग, समसप्तक योग असे पाच विविध प्रकारचे राजयोग जुळून येत आहे. शुक्र ग्रहाचे कन्या राशीतील गोचर ०९ ऑक्टोबरला होत आहे. त्यानंतर असे राजयोग जुळून येणार आहेत.

शुक्रवारी संकष्ट चतुर्थी असल्याने गणपती पूजनासह लक्ष्मी देवीचे पूजन करणे शुभ मानले गेले आहे. शुक्रवार हा दिवस लक्ष्मी देवीला समर्पित असून, लक्ष्मी देवीशी संबंधित वस्तू अर्पण कराव्यात, दान द्यावे, असे सांगितले जात आहे. कोणत्या राशींवर कशी कृपा असू शकेल? कोणत्या राशींना काय लाभ होऊ शकतील? जाणून घ्या...

मेष: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. काही अडचणी असतील. मात्र, सगळ्या अडचणी दूर होतील. अनेक प्रकारचे लाभ होतील. एखादे अडलेले काम पूर्ण होईल. त्यासाठी बरेच परिश्रम करावे लागतील. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. लोकांना गृहीत धरून चालू नका. करारमदार करताना खबरदारी घ्या. अनुकूलता राहील.

वृषभ: सुरुवातीला कार्यक्षेत्रात दगदग होईल. एखाद्या मोठ्या कार्यक्रमाची जबाबदारी सोपविण्यात येईल. सहकारी वर्गाची चांगली साथ राहील. कामाचा ताण जाणवणार नाही. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्यावे. आर्थिक व्यवहारांची माहिती लोकांना सांगू नका. प्रवासात सतर्क राहा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. शुक्रवार, शनिवार अडचणी दूर होतील.

मिथुन: ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. सामाजिक कार्यात सहभागी होताना आपले कोण आणि परके कोण, याकडे लक्ष द्यावे. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाईल. एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचा मनस्ताप होऊ शकतो. घरी अनाहूत पाहुणे मंडळी येतील. हाती घेतलेले कार्य यशस्वीपणे पूर्ण कराल. धनलाभ होईल. शुक्रवार, शनिवार अचानक एखादी अडचण येऊ शकते. नियमानुसार कामे करा.

कर्क: मोठे धाडस करण्याच्या फंदात पडू नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. इतरांच्या भानगडीत पडू नका. परिस्थिती आटोक्यात येईल. सामाजिक कार्यात कुणी तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करील. नोकरीत नवीन संधी मिळेल. लोकांशी गोड बोलून आपली कामे करून घ्यावी. घरी पाहुणे मंडळी येतील. शुक्रवार, शनिवार अचानक धनलाभ होऊ शकतो.

सिंह: अनुकूल वातावरण राहील. नवीन शिकण्यासाठी संधी चालून येईल. वेळेचे नियोजन नीट करा. मोहापासून स्वतःला दूर ठेवा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. वाहन जपून चालवा. मुलांशी संवाद ठेवा. त्यांना योग्य मार्गदर्शन करा. एखादी चांगली बातमी कळेल. मनावरील ताण निघून जाईल. मौजमजा कराल.

कन्या: कटू-गोड अनुभव येतील. आरोग्याची काळजी घ्यावी. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. योजनांच्या बाबतीत लोकांशी चर्चा करताना थोडे सावध राहा. मोहापासून स्वतःला दूर ठेवा. व्यवसायात घाईघाईत निर्णय घेऊ नका. इतरांना सल्ला देण्यात वेळ वाया घालवू नका. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. ऐनवेळी नियोजित कार्यक्रमात बदल होऊ शकतात.

तूळ: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. कालांतराने दिलासा देणाऱ्या घटना घडतील. सुरुवातीला काही ना काही कारणाने कामात विलंब होईल. मुलांच्या अडचणी सोडविण्यासाठी वेळ द्यावा लागेल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. खाण्या-पिण्याच्या बाबतीत बेपर्वाई नको. काही लोक चुकीचा सल्ला देतील. शुक्रवार, शनिवार प्रवास शक्यतो टाळा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. चोरीपासून सावध राहा.

वृश्चिक: धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाईल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. घरात सुरुवातीला किरकोळ कारणावरून गैरसमज होऊ शकतात. मुलांची काळजी घ्यावी. कुणी फसवणार नाही ना याकडे लक्ष द्यावे. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तरुण वर्गाने मोहापासून दूर राहिले पाहिजे. नाहीतर निष्कारण अडचणीत याल.

धनु: यशदायक काळ आहे. नोकरी व्यवसायात सतत व्यस्त राहाल. कामाचा ताण व्यवस्थितपणे हाताळला पाहिजे. सुरुवातीला जवळच्या लोकांशी गैरसमज होऊ शकतात. बाजारपेठेचा अभ्यास करून निर्णय घ्यावे. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. नवीन संधी मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. शुक्रवार, शनिवार षष्ठ स्थानातील चंद्र हर्षल युतीमुळे थोडे सबुरीने वागण्याची गरज आहे. आरोग्याची काळजी घ्यावी.

मकर: चंद्राचे भ्रमण लाभदायक ठरेल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. बाजारपेठेचा अभ्यास केला पाहिजे. वडिलोपार्जित संपत्तीची कामे करताना थोडी सावधगिरी बाळगा. जवळच्या प्रवासात अनोळखी लोकांपासून सावध राहा. नोकरीत पारडे जड राहील. मुलांच्या संगतीकडे लक्ष द्यावे. सामाजिक मान-सन्मान प्राप्त होईल. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल.

कुंभ: अडचणी दूर झालेल्या दिसून येतील. उत्साह वाढेल. आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. तरुण वर्गाने मोहापासून दूर राहिले पाहिजे. वडिलोपार्जित संपत्तीची कामे ऐरणीवर येतील. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. नोकरीत अचानक मोठी संधी मिळेल. वेळापत्रक व्यस्त होऊन जाईल. घराची शोभा वाढवणाऱ्या वस्तू खरेदी कराल. घरात कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. त्यानिमित्ताने लोकांची ये-जा राहील.

मीन: विविध आघाड्यांवर यश मिळेल. घाईघाईत निर्णय घेऊ नका. नियमानुसार कामे करा. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. विवाहेच्छूकांनी स्थळांच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. अनुकूलता अनुभवायला मिळेल, धनलाभ होईल. आवडत्या भोजनाचा आस्वाद घ्याल. बाजारपेठेचा अभ्यास करून गुंतवणूक करा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.