४ ग्रहांचे गोचर: ‘या’ ५ राशी होणार मालामाल, नोकरी-व्यवसायात अपार यश; एप्रिलभर अच्छे दिन!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 07:18 AM2023-03-28T07:18:03+5:302023-03-28T07:31:17+5:30

एप्रिल महिन्यातील लकी राशी कोणत्या? कोणत्या राशीच्या व्यक्तींसाठी ग्रहस्थिती शुभ लाभदायी ठरू शकेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिल महिना अतिशय महत्त्वाचा ठरणारा आहे. या महिन्यात ३ बड्या ग्रहांचे राशीपरिवर्तन होत असून, एक ग्रह वक्री होणार आहे. सूर्य, गुरु आणि शुक्र राशीपरिवर्तन करणार आहेत. तर बुध ग्रह वक्री होणार आहे. मार्च महिन्याच्या शेवटी बुध ग्रह मेष राशीत प्रवेश करत असून, एप्रिल महिन्याच्या मध्यावर याच राशीत बुध ग्रह वक्री होणार आहे. सुमारे जून महिन्यापर्यंत बुध वक्री स्थितीत असेल.

एप्रिल महिन्यांमध्ये नवग्रहांचा गुरु बृहस्पति ग्रह स्वराशीतून म्हणजेच मीन राशीतून मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत प्रवेश करत आहे. मेष राशीत विराजमान असलेल्या राहुशी गुरुची युती होऊन गुरु चांडाळ योग जुळून येईल. या योगाचा अनेक राशींवर प्रभाव दिसून येऊ शकेल.

याशिवाय नवग्रहांचा राजा सूर्य गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीतून मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत प्रवेश करेल. गुरुच्या मेष प्रवेशानंतर सूर्य, गुरु आणि राहुचा त्रिग्रही योग जुळून येऊ शकेल. तसेच एप्रिल महिन्यात शुक्र मेष राशीतून स्वतःचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करेल. शुक्राचा वृषभ राशीतील प्रवेश विशेष मानला जात आहे.

एप्रिल महिन्यातील एकूण ग्रहस्थितीचा काही राशींना लाभ होणार असून, काही राशींना आगामी काळ संमिश्र ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. एप्रिल महिन्यात कोणत्या राशी लकी ठरणार? कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ आणि फायदा मिळू शकेल? ते जाणून घेऊया...

वृषभ राशीच्या व्यक्तींना ४ ग्रहांचे गोचर अनुकूल ठरू शकेल. चांगली बातमी मिळेल. या महिन्यात सर्व कामे पूर्ण होतील. कोणतेही काम गुंतागुंतीचे असेल तर ते घरच्यांच्या मदतीने पूर्ण होईल. हा महिना पैशाच्या बाबतीत खूप चांगला असणार आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. यासोबतच प्रतिष्ठा वाढेल. मात्र, कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका असा सल्ला दिला जात आहे.

मिथुन राशीच्या व्यक्तींना ४ ग्रहांचे गोचर लाभदायक ठरू शकेल. बुध-राहु एकत्र आल्याने प्रभाव आणि आत्मसन्मान वाढेल. या महिन्यात धैर्य व संयम वाढताना दिसून येऊ शकेल. व्यापारी वर्गातील लोकांना या महिन्यात त्यांचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी मित्र आणि नातेवाईकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

कर्क राशीच्या व्यक्तींना ४ ग्रहांचे गोचर शुभ ठरू शकेल. या महिन्यात मित्राच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होतील. कौटुंबिक जीवन या महिन्यात चांगले असू शकेल. आनंददायी घटना घडू शकतील. कामांमध्येही वाढ होणार आहे. या महिन्यात नवीन लोकांशी संवाद वाढेल.

कुंभ राशीच्या व्यक्तींना ४ ग्रहांचे गोचर चांगले ठरू शकेल. या महिन्यात ग्रहांच्या राशी बदलामुळे रखडलेल्या कामांमध्ये यश मिळेल. मित्रांच्या मदतीने कठीण कामे पूर्ण होऊ शकतील. कौटुंबिक मतभेद उद्भवू शकतात. इतर लोक मालमत्तेच्या बाबतीत हस्तक्षेप करू शकतात. मात्र, परिस्थिती अनुकूल होऊ शकते.

मीन राशीच्या व्यक्तींना ४ ग्रहांचे गोचर पैशाच्या बाबतीत चांगले ठरू शकेल.या महिन्यात असे काही यश मिळू शकते ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. काही चांगली बातमी मिळू शकते. ज्यामुळे मन खूप प्रसन्न होईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.