४ ग्रहांचे परिवर्तन, ५ राशींना अपार लाभ; ३ राशींच्या खर्चात वाढ, तुमच्यासाठी कसा असेल ऑगस्ट?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 07:07 AM2023-08-01T07:07:07+5:302023-08-01T07:07:07+5:30

४ ग्रहांचे गोचर कोणत्या राशींना फायदेशीर ठरू शकेल अन् कोणत्या राशींना संमिश्र ठरू शकेल? जाणून घ्या...

चातुर्मासातील अधिक श्रावण मास सुरू आहे. ऑगस्ट महिन्याला सुरुवात होत आहे. ऑगस्ट महिन्यात अधिक मासाची सांगता होणार असून, निज श्रावण महिना सुरू होणार आहे. या निज श्रावणात सर्व प्रकारची व्रत-वैकल्ये, सण-उत्सव साजरे केले जाणार आहेत. श्रावणात साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रतांना वेगळे महत्त्व आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार ऑगस्ट महिन्यात ४ ग्रहांचे परिवर्तन होणार आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच शुक्र ग्रह वक्री चलनाने सिंह राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तर १७ ऑगस्ट रोजी नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह रास ही सूर्याची रास आहे. सूर्याचे स्वराशीतील संक्रमण सूर्य संक्रांत म्हणून ओखळले जाते.

यानंतर नवग्रहांचा सेनापती असलेला मंगळ १८ ऑगस्ट रोजी सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तर २४ ऑगस्ट रोजी बुध सिंह राशीत वक्री होणार आहे. या ग्रहमानाचा कोणत्या राशींना शुभ लाभ होऊ शकेल, कोणत्या राशींचे खर्च वाढू शकतील? ते जाणून घेऊया...

मेष: आगामी काळ सुखद ठरू शकेल. सरकारी कामात यश मिळू शकते. करिअर आणि कामात यशाची परिस्थिती असेल. विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारचे यश मिळू शकेल. लांब किंवा परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. आदर वाढेल. जोडीदाराचे प्रत्येक क्षेत्रात पूर्ण सहकार्य मिळेल. आरोग्य चांगले राहील.

वृषभ: ऑगस्ट महिन्याचा काळ सामान्य ठरू शकेल. काही समस्या असू शकतात. करिअरच्या दृष्टीने महिना चांगला राहील. कौशल्याने कामाच्या ठिकाणी वर्चस्व गाजवू शकाल. व्यावसायिकांनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे, अन्यथा फसवणूक होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला राहील. परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या लोकांना जास्त वाट पाहावी लागेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. आर्थिक दृष्टीकोनातून महिना चांगला राहील.

मिथुन: ऑगस्ट महिना अनुकूल ठरू शकेल. नोकरी, व्यवसायात प्रगती होऊ शकते. शैक्षणिक क्षेत्रात मनापासून प्रयत्न केल्यास यश मिळेल. कौटुंबिक जीवन चांगले राहील. समाजात मान-प्रतिष्ठा वाढू शकते. प्रेमसंबंधांच्या बाबतीतही काळ चांगला राहील. आर्थिक स्थिती सामान्य राहील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी परिस्थिती चांगली राहू शकते. मित्रांकडून फसवणूक होऊ शकते. सावध राहावे. प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे.

कर्क: ऑगस्ट महिन्याचा काळ चढ-उतारांचा ठरू शकेल. मेहनतीचे कौतुक होईल. व्यवसायासाठी वेळ खूप चांगला आहे. कार्यालयात स्थिती मजबूत होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी वेळ थोडा चढ-उताराचा असेल. कौटुंबिक सुखाच्या दृष्टीनेही हा काळ चांगला जाणार आहे. या महिन्यात धीर धरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उत्पन्न वाढून पैसा येऊ शकतो.

सिंह: ऑगस्ट महिना काहीसा संमिश्र ठरू शकेल. कामाच्या दृष्टीने हा महिना विशेष उत्साहवर्धक असेल. नोकरदारांसाठी काळ चांगला राहील. हा काळ विद्यार्थ्यांना यश देणारा आहे. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. धनाच्या आगमनाचे नवे मार्ग खुले होतील. उत्पन्न वाढेल, परंतु पैशांच्या उधळपट्टीवर नियंत्रण ठेवावे लागेल. आरोग्याबाबत सावध राहण्याची गरज आहे.

कन्या: सावधगिरी बाळगून कामे करावे लागतील. आळसामुळे काम बिघडू शकते. या महिन्यात धावपळ करावी लागेल. नोकरीत काही अडचण येऊ शकते. विद्यार्थ्यांसाठीही हा महिना फारसा उत्साहवर्धक नाही. शिक्षणात अडथळे येऊ शकतात. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून मतभेदही होऊ शकतात. आर्थिक स्थिती चढ-उतारांनी भरलेली असू शकते. आरोग्याबाबत काळजी घेण्याची गरज आहे.

तूळ: सकारात्मक परिणाम देणारा महिना ठरू शकेल. करिअरच्या दृष्टिकोनातून महिना फलदायी ठरेल. अति आत्मविश्वास टाळावा. अन्यथा नुकसान होऊ शकते. शिक्षणाच्या दृष्टीनेही हा काळ चांगला आहे. उच्च शिक्षणात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. आई-वडिलांच्या तब्येतीबाबत काही चिंता असू शकते. वैवाहिक जीवनासाठी हा काळ चांगला आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल.

वृश्चिक: ऑगस्ट महिना शानदार ठरू शकेल. करिअरच्या दृष्टीने हा महिना खूप चांगला जाणार आहे. नोकरीत प्रगती होऊ शकते. शिक्षणाच्या दृष्टिकोनातून हा महिना सामान्य राहणार आहे. कौटुंबिक जीवन खूप चांगले राहील. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. मन प्रफुल्लित राहील. आर्थिक स्थितीच्या दृष्टीने हा महिना खूप चांगला जाणार आहे. नोकरी आणि व्यवसायासाठी हा महिना चांगला आहे. आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

धनु: सामान्य फलदायी काळ ठरू शकेल. करिअरच्या दृष्टीने या महिन्यात तुम्हाला काही अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. शिक्षणाच्या दृष्टीनेही हा महिना संमिश्र फलदायी राहील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन समाधानकारक राहणार नाही. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा महिना चांगला राहील. या महिन्यात धनहानी होण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला तब्येत बिघडू शकते.

मकर: ऑगस्ट महिना संमिश्र ठरू शकेल. काही वेळेस परिस्थिती चांगली असेल, तर काही समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. करिअरच्या दृष्टीने नोकरदार लोकांसाठी आनंददायी काळ नसला तरी व्यावसायिकांसाठी खूप चांगला राहील. शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना थोडा निराश करणारा ठरू शकतो. कौटुंबिक जीवन देखील चढ-उतारांनी भरलेले असेल. बंधू-भगिनींचे सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधांसाठी हा महिना चांगला जाण्याची शक्यता आहे.

कुंभ: संमिश्र परिणाम होतील. कामात अडथळे येऊ शकतात. काम करणारी व्यक्ती जेवढी मेहनत करेल, त्याचे फळही त्यानुसार मिळेल. व्यवसायात प्रचंड नफा मिळण्याची शक्यता आहे. शिक्षणाच्या दृष्टिकोनातून हा महिना खूप चांगला जाण्याची अपेक्षा आहे. कामामुळे कुटुंबापासून दूर राहावे लागू शकते. तणाव वाढू शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहील. पैशांची उधळपट्टी टाळा.

मीन: चांगले फळ मिळेल. शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना खूप चांगला जाणार आहे. अभ्यासात रुची राहील. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. धीर धरा. वैवाहिक जीवन चढ-उतारांनी भरलेले असेल. या महिन्यात आर्थिक स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे. व्यवसायात भागीदारी खूप फायदेशीर ठरू शकते. या महिन्यात आरोग्य थोडे गडबड होऊ शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.