जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 16:17 IST2025-09-10T15:55:45+5:302025-09-10T16:17:09+5:30

तमाशातील नर्तकीच्या प्रेमात वेड्या झालेल्या एका माजी सरपंचाने तिच्या घरासमोरच कारमध्ये कोंडून घेत स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील सासुरे या गावात घडली.

तमाशातील नर्तकीच्या प्रेमात वेड्या झालेल्या एका माजी सरपंचाने तिच्या घरासमोरच कारमध्ये कोंडून घेत स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील सासुरे या गावात घडली. मृत गोविंद बर्गे हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एका गावातील माजी उपसरपंच होते. ३४ वर्षीय बर्गे हे विवाहित होते.

माजी उपसरपंच कला केंद्रातील पूजा गायकवाड या नर्तिकेच्या प्रेमात वेडे झाले होते. पूजा गायकवाड गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याशी बोलत नव्हती. त्यामुळे ते तणावात होते अशी माहिती समोर आली आहे.

गोविंद बर्गे यांनी पूजा हिला काही महागड्या भेटवस्तूही दिल्या होत्या. त्यामध्ये एका महागड्या मोबाईलचाही समावेश होता. एवढंच नाही तर तो पूजा हिला अधूनमधून दागदागिनेही भेट द्यायचा.

मात्र काही दिवसांपासून पूजा माजी उपसरपंचाशी फार बोलत नव्हती. त्यामुळे गोविंद नैराश्यात होता. गोविंद तिला वारंवार फोन करीत होते. मात्र ती त्यांना काहीच प्रत्युत्तर देत नव्हती. जिच्यासाठी जीव ओवाळून टाकला ती उत्तर देत नसल्याचं गोविंद यांच्या जिव्हारी लागलं. सोमवारी मध्यरात्री ते पूजा गायकवाड हिचं सासुरे येथील घरी आले होते.

पूजा गायकवाड ही कला केंद्रात नर्तिका असून ती २१ वर्षांची आहे. तिच्याविरोधात बर्गे यांच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, नर्तकी पूजा गायकवाड हिने विविध कारणांमुळे गोविंदकडून पैसे लुबाडले आहेत. प्रेमसंबंध ठेवून ती गोविंदकडून पैसे, सोने लुबाडत होती. तिने दिलेल्या पैशातून मावशी आणि नातेवाईकांच्या नावावर प्लॉट जमीन घेतले आहेत.

भावाच्या नावावर पाच एकर शेती करावी अशी पूजाकडून मागणी केली जात होती. याशिवाय गेवराईतील नवीन घर माझ्या नावावर कर अन्यथा तुझ्याविरोधात दुष्कर्माचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.