Sant Bhagwan Baba: भगवानबाबा कोण होते? गोपीनाथ मुंडेंनी सुरू केलेला दसरा मेळावा व गडाचा इतिहास जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 11:34 AM2021-10-15T11:34:49+5:302021-10-15T11:39:07+5:30

Dasara Melava on Bhagwangad: संत भगवानबाबा, भगवानगडाचा इतिहास आणि गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा याबाबत जाणून घ्या...

संपूर्ण देशभरात विजयादशमी म्हणजेच दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रावणदहन करून दसरा साजरा करण्याची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. अनेकार्थाने दसरा विशेष मानला जातो. अगदी साडेतीन मुहुर्तांपैकी एकपासून ते राजकीय पक्षांच्या मेळाव्यांपर्यंत दसऱ्याला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाल्याचे पाहायला मिळते. (shree sant bhagwan baba)

दसऱ्याच्या दिवशी होणारे महाराष्ट्रातील चार मेळावे अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा. दुसरा म्हणजे नागपूरच्या रेशीम बागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा. तिसरा नागपूरच्याच दीक्षाभूमीवरील आंबेडकरी जनतेचा धर्मांतर सोहळ्याचा मेळावा. (who was shree sant bhagwan baba)

चौथा म्हणजे भगवान गडावर होणारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भगवान गडावरील मेळाव्यावरून झालेल्या वादानंतर भगवान गड अधिक चर्चेत आल्याचे पाहायला मिळाले. भगवान बाबा कोण होते? गडाचा आणि दसरा मेळाव्याचा इतिहास जाणून घेऊया... (tradition of dasara melava on bhagwangad)

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात सावरगाव आहे. या ठिकाणी भगवानगड आहे. भगवान बाबांच्या नावाने हा गड ओळखला जातो. या ठिकाणी भगवान बाबा वास्तव्याला होते. या गडाला पूर्वी धौम्यगड किंवा धुम्यागड म्हणूनही ओळखले जायचे. मात्र, भगवानबाब या ठिकाणी वास्तव्याला आल्यानंतर त्यांनी या जीर्ण गडाची डागडूजी सुरू केली. त्यामुळे या गडाला भगवानबाबांच्या नावाने ओळखले जाऊ लागले.

भगवानगड हा ऊसतोड कामगारांचे श्रद्धापीठ आहे. तसेच वंजारी समाजाचे धार्मिकस्थळ मानले जाते. राज्यातील सुमारे ४५ मतदारसंघात भगवानगडाचे भक्त राहतात. भगवानगडावर पूर्वीपासून लोक येत होते. मात्र, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भगवानगड अधिक चर्चेत आला. गोपीनाथ मुंडे यांचा राजकारणात जसजसा उदय झाला, तसा मुंडे यांच्यामुळे भगवानगडाचा लौकीकही वाढला. (history of bhagwangad)

भगवानबाबा यांचे मूळ नाव आबाजी तुबाजी सानप. ते मूळचे सावरगाव घाट येथील रहिवासी. भगवानबाबांनी या धौम्यगडावर येऊन सातत्याने कीर्तन, प्रवचन केले. या ठिकाणीच त्यांनी दिंडी सोहळ्यांना सुरुवात केली. यानंतर धौम्यगड हा बीड जिल्ह्याच्या केंद्रस्थानी आला.

भगवानबाबा यांच्यानंतर भीमसेन महाराजांनी गडाची गादी सांभाळली. तर, सन २००३ पासून नामदेव महाराज शास्त्री हे गडाचे काम पाहत आहेत. भगवान गडावरील मेळाव्याला ५० वर्षाची परंपरा आहे. भगवानबाबांनी गड उभारल्यानंतर पहिला मेळावा गडावर घेतला.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत भगवानबाबांनी पहिला दसरा मेळावा घेतला होता. सावरगावात अडीच एकरामध्ये भगवानबाबांचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. त्यांच्या जुन्या वाड्याची डागडूजी करण्यात आली. समाधी मंदिरही तयार करण्यात आले. अहमदनगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी भगवानबाबांची २५ फुटांची मूर्ती बनवली.

पंकजा मुंडे यांनी सावरगावात दुसरा भगवान भक्तीगड निर्माण केला. गोपीनाथ मुंडे यांनी भगवानगडाचा विकास केला, तर पंकजा मुंडे यांनी भगवानबाबांच्या जन्मभूमीच्या विकासाकडे लक्ष दिले आहे. या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भव्य मंचही उभारला आहे.

पंकजा मुंडे यांनी सन २०१७ पासून या नव्या भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली. मात्र, गतवर्षी लॉकडाऊनमुळे ही परंपरा खंडित झाली. पंकजा मुंडे यांना ऑनलाइन मेळावा घ्यावा लागला होता.