Traffic Rules: पिवळा सिग्नल आणि 'पॉईंट ऑफ नो रिटर्न' माहितीये का? ट्रॅफिक पोलीस कधीच पावती फाडू शकणार नाहीत...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 04:33 PM2022-12-05T16:33:21+5:302022-12-05T16:37:31+5:30

Traffic Rules on Signal: लाल सिग्नल संपायला ५-६ सेकंद राहिले की लोक सुस्साट सुटतात. ते सेकंद पिवळ्या सिग्नलचे असतात. परंतू, त्या लोकांसाठी नाहीत, तर ज्यांचा हिरवा सिग्नल संपत आला आहे, त्या लोकांचे.

वाहतुकीचे नियम एवढे आहेत, की ते वाहतूक पोलिसांना तरी १०० टक्के लक्षात असतील की नाही असा प्रश्न पडावा. सिग्नल तर लय खतरनाक गोष्ट असते. सिग्नलमुळे वाहतुकीचे नियमन होते. परंतू, तुम्ही कुठेही बघा... लाल सिग्नल संपायला ५-६ सेकंद राहिले की लोक सुस्साट सुटतात. ते सेकंद पिवळ्या सिग्नलचे असतात. परंतू, त्या लोकांसाठी नाहीत, तर ज्यांचा हिरवा सिग्नल संपत आला आहे, त्या लोकांचे.

साधारणता सिग्नल तोडला की घरी चलन येते किंवा पुढील पोलीस पावती फाडतात. तुमच्या हातात पिवळा सिग्नल असतो, जो तुमची पावती फाडायची की नाही याचा सिग्नल पोलिसांना देतो. लाल सिग्नल तोडला तर पावती फाडावीच लागते. परंतू पिवळा सिग्नल तुम्हाला दोन पर्याय देतो. यामुळे पिवळ्या सिग्नलबाबत लोक आजही कन्फ्यूज आहेत.

हिरवा सिग्नल संपून पिवळा लागला तर तुम्ही काय करावे? तो तोडून पुढे जावे? वेग कमी करावा की की थांबावे? जरा तुम्ही विचार करा... तुम्ही अशा या शेवटच्या सेकंदात काय करता? साधारणत: अनेकजण पिवळ्या सिग्नलला त्यापेक्षा जोरात वेगाने पुढे गाडी दामटतात. जे काही अंतर मागे आहेत ते थांबतात. मग जे मागचे त्या पिवळ्या सिग्नलसाठी घाईत आहेत ते काहीवेळा मागून येऊन धडकतात. या घटना कधी ना कधी तुमच्या देखत घडल्याच असतील.

सर्वात महत्वाचा मुद्दा असा की, जेव्हा पिवळी लाईट पेटते तेव्हा तुम्हाला एका गोष्टीकडे लक्ष द्यायचे आहे. लाईट पिवळी झाली की तो गाडी रोखण्याचा सिग्नल असतो. हे तुम्हालाही माहिती असेल. लाल सिग्नल सुरु होण्याचे तुम्हाला सांगण्यासाठी ही पिवळी लाईट सुरु होते. परंतू वाहन थांबविण्यासाठी तुम्हाला काही अंतर लांब असणे गरजेचे आहे. नाहीतर सिग्नलखाली आल्यावर जर पिवळी लाईट लागली आणि तुम्ही गाडीला करकचून ब्रेक मारलात तर मागुन धक्का पक्का.

आता जर सिग्नलपासून कमी अंतरावर असाल तर तिथे 'पॉईंट्स ऑफ नो रिटर्न' चा नियम लागू होतो. तो काय असतो बुवा? चला जाणून घेऊयात.

हा एक सामान्य नियम आहे, तुम्ही समजून घ्या. हा नियम सांगतो की जर तुम्ही 'पॉईंट्स ऑफ नो रिटर्न'वर पोहोचलात तर तुम्हाला करकचून ब्रेक मारायचा नाहीय. म्हणजेच जर तुम्ही सिग्नलपासून १०० फुटांपेक्षा कमी अंतरावर आला असाल तर तुम्हाला सिग्नलआधी थांबायचे नाहीय. मग काय करायचे?

१०० फुटांपेक्षा कमी अंतरात असाल तर तुम्हाला सुरक्षितपणे थोडा वेग कमी करून समोरून, आजु-बाजुने येण्याऱ्या गाड्या पाहून तुम्हाला तुमची गाडी पुढे न्यायची आहे. म्हणजे लाल सिग्नल लागेपर्यंत आणि दुसऱ्या बाजुसाठी हिरवा सिग्नल लागेपर्यंतच्या वेळात तुम्हाला कार पुढे नेता आली पाहिजे. यासाठी कायदेशीर वेग जो त्या रस्त्याला दिलेला आहे, त्या वेगाने गाडी चालवावी.

म्हणजेच जेव्हा तुम्ही नेहमीच्या रस्त्याने जात असता तेव्हा त्या रस्त्याची स्पीड लिमिट लक्षात ठेवून गाडी चालवावी. जर वाटेत पिवळा सिग्नल लागला आणि जर तुम्ही १०० फुटांपेक्षा मागे असाल तर सिग्नलपर्यंत गाडी रोखावी. परंतू, जर तुम्ही पॉइंट ऑफ नो रिटर्नमध्ये असाल तर तुम्हाला सावधतेने सिग्नला क्रॉस करावा लागेल. असे केल्यास तुमचे चलन कधीच कापले जाणार नाही.