Tesla टक्कर देण्यास मेड इन इंडिया कार सज्ज! सिंगल चार्जमध्ये ५०० किमी रेंज; लॉंचिंग कधी? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 01:29 PM2021-09-28T13:29:02+5:302021-09-28T13:39:20+5:30

Tesla कंपनीला टक्कर देण्यासाठी एक भारतीय कंपनी सज्ज झाली असून, लवकरच दमदार इलेक्ट्रिक कार लॉंच करणार आहे.

आताच्या घडीला देशात पेट्रोल आणि डिझेलचा दर सार्वकालीक उच्चांकावर आहे. इंधनदर कमी होतील, याची सूताराम शक्यता नाही. अशातच आता अनेक ग्राहक सीएनजी किंवा इलेक्ट्रिक सेगमेंटकडे वळताना दिसत आहे.

इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात अनेकविध कंपन्या उतरल्या असून, दिग्गज, आघाडीच्या कंपन्यांनीही आपली उत्पादन इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये सादर करण्यास सुरुवात केली आहे. इलेक्ट्रिक स्कूटर, कार यांना सरकारकडूनही पाठिंबा देण्यात येत आहे.

इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटा आघाडीवर असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कंपन्या आता भारतात आपल्या कार सादर करत आहेत. यामधील एक मोठे नाव म्हणजे एलन मस्क यांची Tesla.

भारतात गेल्या काही कालावधीपासून सतत नवनवीन इलेक्ट्रिक कार लाँच होत आहेत. ऑडी, बीएमडब्लूसारख्या अनेक बड्या कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक कार भारतात लाँच केल्या आहेत. आगामी काळात जगातील दिग्गज इलेक्ट्रिक कार कंपनी Tesla भारतात एंट्री करणार आहे.

याच Tesla कंपनीला टक्कर देण्यासाठी एक भारतीय कंपनी सज्ज झाली आहे. या इलेक्ट्रिक कारची रेंज सिंगल चार्जवर ५०० किमी असेल, असे सांगितले जात आहे. बेंगळुरूमधील एका कंपनीने टेस्लाशी स्पर्धा करण्यासाठी कंबर कसली आहे.

बेंगळुरू स्थित Pravaig Dynamics भारतामध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी Pravaig Extinction MK1 ही कार लाँच करणार असून ही दमदार ड्रायव्हिंग रेंजसह येणार आहे.

कंपनीच्या दाव्यानुसार ही कार एकदा चार्ज केल्यानंतर ५०० किमीपर्यंत शानदार रेंज देण्यास सक्षम असेल. जर या कारची अन्य अन्य प्रीमियम इलेक्ट्रिक कारसोबत तुलना करायची झाल्यास फोक्सवॅगन ID.3 साधारणपणे ५०० किलोमीटरची रेंज देते, टेस्ला मॉडल-3 सिंगल चार्जमध्ये ५०७ किलोमीटरची रेंज देते.

भारतात सध्या विक्री होत असलेल्या हाय रेंज इलेक्ट्रिक कारशी तुलना करायची झाल्यास ह्युंडाई कोना ईव्ही ४५२ किलोमीटर, एमजी झेडएस ईव्ही ३४० किलोमीटर आणि मर्सिडीज EQC ची रेंज फक्त ३५० किलोमीटर इतकी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, Extinction MK1 ला ८० टक्के चार्ज करण्यासाठी फक्त ३० मिनिटांचा वेळ लागेल. या कारमध्ये 96 kHw ची बॅटरी देण्यात येईल, जी 200 hp मॅक्सिमम पॉवर जनरेट करते. याद्वारे 196kmph इतका या कारचा मॅक्सिमम स्पीड असेल, तर ० ते १०० kmph वेग पकडण्यास फक्त ५.४ सेकंदाचा वेळ लागेल.

या कारमध्ये चांगल्या एअर क्वालिटीसाठी 10x सीओ2 रिडक्शन आणि एक शक्तिशाली PM2.5 फिल्टर दिले जाईल. तसेच कारमध्ये १५ इंचाचा लॅपटॉप ठेवण्यासाठी एक डेस्क, पॉवर पोर्ट्स आणि 2 USB थंडरबोल्ट पोर्ट्स मिळतील.

सन २०२२ मध्ये ही कार लाँच होईल, पण पहिल्या टप्प्यात ही कार टॅक्सीच्या रुपात विक्रीसाठी उपलब्ध असेल तर दुसऱ्या टप्प्यात खासगी ग्राहकांसाठी उपलब्ध होईल, असे सांगितले जात आहे.