भन्नाटच! Tata नॅनोपेक्षा लहान अन् Alto पेक्षाही स्वस्त EV येतेय; सिंगल चार्जमध्ये ३०५ किमीची रेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 01:52 PM2021-10-02T13:52:46+5:302021-10-02T13:57:39+5:30

Tata Nano पेक्षा आकाराने लहान Maruti Alto पेक्षाही स्वस्तात मस्त EV लवकरच लॉंच होणार आहे. पाहा, डिटेल्स...

गेल्या अनेक दिवसांपासून सततच्या वाढत्या इंधनदरामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे देशवासीयांचा ओढा वाढताना दिसत आहे. या सेगमेंटमध्ये Tata आघाडीवर असून, अनेकविध कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक कार सादर करत आहे.

जगभरातही इलेक्ट्रिक वाहनांची मागणी कमालीची वाढतेय. चिनी कार निर्माता वुलिंग होंगगुआंगने नवीन इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. यापूर्वी, कंपनीने बाजारात मिनी इलेक्ट्रिक कार लाँच केली होती आणि २०२० मध्ये त्या कारच्या ११९,२५५ युनिट्सची विक्री केली होती.

सदर इलेक्ट्रिक कार दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी EV होती. आता कंपनीने आपली नवीन कार 'नॅनो' नावाने सादर केली आहे. Wuling Nano EV ही केवळ सर्वात लहान इलेक्ट्रिक कार नव्हे, तर जगातील सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कारही ठरण्याची शक्यता आहे. मारुतीच्या सर्वांत स्वस्त अल्टो कारपेक्षाही या इलेक्ट्रिक कारची किंमत कमी असणार आहे.

Wuling Nano EV ची इलेक्ट्रिक मोटर ३३ बीएचपी पॉवर जनरेट करू शकते. कंपनीचा दावा आहे की, ही कार १०० किमी प्रतितास वेग गाठू शकते. कंपनीने नॅनो EV च्या सीटखाली २८ kWh IP67- प्रमाणित लिथियम-आयन बॅटरी दिली आहे.

Nano EV ही छोटी इलेक्ट्रिक कार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ३०५ किमी पर्यंत प्रवास करू शकते. वूलिंग नॅनो EV ची लांबी २,४९७ मिमी, रुंदी १,५२६ मिमी आणि उंची १,६१६ मिमी आहे, ज्यामुळे ती Tata नॅनोपेक्षा आकाराने लहान आहे.

वूलिंगच्या मते, नियमित २२०-व्होल्ट चार्जिंग सॉकेटचा वापर करून या कारची बॅटरी पूर्णपणे चार्ज करण्यासाठी १३.५ तास लागतात, तर ६.६ किलोवॅट एसी चार्जरसह ४.५ तासात बॅटरी चार्ज करता येते.

जगातील सर्वात मोठ्या EV बाजारातील कार उत्पादकांच्या मोठ्या SAIC-GM-Wuling गटाचा भाग असलेल्या Wuling Hong Guang ने 2021 Tianjin International Auto Show मध्ये नवीन इलेक्ट्रिक कार Wuling Nano EV चे अनावरण केले आहे.

विशेष गोष्ट म्हणजे ती शहरी वापरासाठी तयार करण्यात आली आहे आणि या इलेक्ट्रिक कारमध्ये फक्त दोन सीट आहेत आणि कारचा टर्निंग रेडियस ४ मीटरपेक्षाही कमी आहे, यावरून आकार किती कॉम्पॅक्ट असेल याचा अंदाज येतो.

एका रिपोर्टनुसार, चीनमधील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कार Wuling Hongguang Mini EV पेक्षा Wuling Nano EV स्वस्त असेल. Wuling Nano EV ला चीनी बाजारात २०,००० युआन या किंमतीत लाँच केले जाईल.

भारतीय चलनानुसार, सुमारे २.३० लाख रुपये या कारची किंमत असेल. याचाच अर्थ Wuling Nano EV ची किंमत भारतीय बाजारात विकल्या जाणाऱ्या मारुती सुझुकीच्या सर्वात स्वस्त अल्टोपेक्षाही कमी असेल.