500KM रेंज अन् 3 सेकंदात 100Kmph वेग..; देशातील पहिली EV स्पोर्ट्स कार लॉन्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 21:12 IST2025-01-20T21:06:04+5:302025-01-20T21:12:24+5:30
MG Cyberster: आघाडीची कार कंपनी MG Motors ने आपल्या Cyberster EV चे बुकिंग सुरू केले आहे.

MG Cyberster: ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी MG मोटर्सने दिल्लीत आयोजित भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये त्यांच्या कारच्या विस्तृत श्रेणीचे प्रदर्शन केले आहे. यावेळी कंपनीने देशातील पहिली इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार 'MG Cyberster' देखील प्रदर्शित केली आहे. या टू डोअर आणि टू सीटर परिवर्तनीय स्पोर्ट्स कारची ऑटो एक्स्पोमध्ये बरीच चर्चा सुरू आहे. जाणून घ्या कशी आहे नवीन MG Cyberster...
विशेष म्हणजे, JSW-MG मोटर्स इंडियाने MG Cyberster ची प्री-बुकिंग सुरू केली आहे. मार्चमध्ये या कारचे अधिकृत बुकिंग सुरू होईल, असे कंपनीने म्हटले आहे. तर, एप्रिलमध्ये त्याची डिलिव्हरी सुरू होऊ शकते, असे मानले जात आहे. MG Cyberster ची विक्री केवळ एमजी सिलेक्ट प्रीमियम शोरूमद्वारे केली जाईल.
लुक आणि डिझाइन:MG Cyberster चा लुक 1960 च्या एमजी बी रोडस्टरपासून प्रेरित आहे. ही कार रेट्रो लुकसह आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याचा कंपनीचा दावा आहे. कारचे पुढचे बोनेट स्लोपी केले आहे, जे खाली वाकलेले दिसते. 20 इंच अलॉय व्हील्स असलेल्या या इलेक्ट्रिक कारमध्ये सिझर दरवाजे वापरण्यात आले आहेत. हे दरवाजे बटण दाबताच उघडतात आणि बंद होतात.
कंपनीचे म्हणणे आहे की, हे दरवाजे उघडण्यासाठी 5 सेकंदांपेक्षा कमी वेळ लागतो. याशिवाय या दरवाजांमध्ये सेफ्टी सेन्सरही लावण्यात आले आहेत. त्यामुळे या दरवाजांच्या आजूबाजूला कुणी उभे असताना दरवाजे आपोआप बंद होतात. त्यामुळे हाताचा किंवा शरीराचा कोणताही भाग चिरडण्याचा धोका नाही.
केबिन कशी आहे: कारच्या केबिनची रचना लग्झरी स्पोर्ट्स कारसारखी केली आहे. जेव्हा तुम्ही केबिनमध्ये बसता तेव्हा तुम्हाला विमानाच्या कॉकपिटसारखे वाटते. यात मोठा थ्री-वे डिजिटल डिस्प्ले आहे. ज्याचा वापर इन्फोटेनमेंट सिस्टम आणि इन्स्ट्रुमेंट कन्सोल दोन्हीसाठी केला जाईल. त्याचा सेंटर कन्सोलही अतिशय सुशोभित करण्यात आला आहे. राइडिंग मोड नॉब व्यतिरिक्त, दरवाजे उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी वेगळी बटणे दिली आहेत.
पॉवर आणि परफॉर्मन्स: MG Cyberster मध्ये कंपनीने 77kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे, जो एका चार्जमध्ये 450 ते 500 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देतो. कंपनीचा दावा आहे की, त्याची बॅटरी फक्त 110 मिमी जाडीची आहे. यामुळे कारचे वजनच कमी झाले नाही, तर वेगही कमालीचा वाढला आहे. ही कार ताशी 0 ते 100 किमीचा वेग केवळ 3.2 सेकंदात घेण्यास सक्षम आहे.
ड्युअल मोटर सेटअपसह सुसज्ज या कारची इलेक्ट्रिक मोटर 503 HP पॉवर आणि 725 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते. मोटर्समध्ये 8-लेयर फ्लॅट वायर वाइंडिंग आणि वॉटरफॉल ऑइल कूलिंगसह अनेक प्रगत तंत्रज्ञान वापरले गेले आहेत. ही कन्व्हर्टेबल रोडस्टर इलेक्ट्रिक कार असून यात अनेक आधुनिक फीचर्स यात देण्यात आले आहेत.
किंमत काय असेल: लॉन्च होण्यापूर्वी MG Cyberster च्या किंमतीबाबत काहीही सांगणे कठीण आहे. पण असे मानले जात आहे की, कंपनी ही कार 65 ते 70 लाख रुपयांच्या किमतीत लॉन्च करू शकते. MG Motors MG Select च्या माध्यमातून लक्झरी सेगमेंटमध्ये आपली पकड प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे.