आयुष्यभर चालणार 'या' इलेक्ट्रिक बाईकची बॅटरी; कंपनीने आणली लाईफ टाईम वॉरंटीची ऑफर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 15:27 IST2025-05-27T15:23:39+5:302025-05-27T15:27:50+5:30

जाणून घ्या बाईकचे फिचर्स अन् किंमत!

भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. कार असो वा बाईक, अनेकजण EV घ्यावी वाटते. पण, अजूनही या गाड्यांच्या बॅटरीबाबत अनेकांच्या मनात संशय येतो. याचे कारण म्हणजे, या गाड्यांची बॅटरी खूप महाग आहे. पण, कल्पना करा की, जर तुम्हाला अशी इलेक्ट्रिक बाईक मिळाली, ज्यामध्ये तुम्हाला आयुष्यभर बॅटरी खराब होण्याची चिंता करण्याची गरज नसेल तर..?

स्टार्टअप कंपनी मॅटरने अलीकडेच भारतीय बाजारात त्यांची इलेक्ट्रिक बाईक 'मॅटर एरा' लॉन्च केली आहे. कंपनीने त्यांच्या इलेक्ट्रिक बाइकच्या बॅटरीवर आजीवन वॉरंटी जाहीर केली आहे. भारतात अशी ऑफर देणारी ही पहिलीच कंपनी आहे. याचा अर्थ तुम्ही ही बाईक हवे तितके दिवस वापरू शकता, बॅटरी खराब झाल्यावर ती कंपनीकडून मोफत बदलून मिळेल.

कोणत्याही इलेक्ट्रिक वाहनात त्याची बॅटरी सर्वात महत्वाचा घटक आहे. भारतात सध्या उपलब्ध असलेल्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांवर जास्तीत जास्त 8 वर्षांची वॉरंटी आहे. हे इलेक्ट्रिक दुचाकी आणि इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांना लागू आहे.

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बॅटरी लाइफ आणि बॅटरी बदलण्याच्या खर्चाची समस्या सोडवण्यासाठी कंपनीने आजीवन वॉरंटी ऑफर आणल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. कोणत्याही ग्राहकाला त्याच्या मॅटर एरा बाईकच्या संपूर्ण कालावधीसाठी बॅटरीवर वॉरंटी मिळेल.

मॅटर एरा बॅटरीवर आजीवन वॉरंटी देण्यामागील कारण म्हणजे, कंपनी इलेक्ट्रिक बाईकच्या घटकांपासून ते बॅटरी पॅक आणि बॅटरी व्यवस्थापन प्रणालीपर्यंत सर्व काही स्वतः विकसित करते.

बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी कंपनीने त्यात लिक्विड कूल्ड बॅटरी वापरली आहे. हे बॅटरीचे तापमान राखण्यास मदत करते. कंपनीने बाईक अशा प्रकारे डिझाइन केली आहे की, त्यात उष्णतेचे व्यवस्थापन व्यवस्थित होते.

ग्राहकांना मॅटर एरा इलेक्ट्रिक बाइकमध्ये 3 रायडिंग मोड मिळतात. हे इको, सिटी आणि स्पोर्ट मोड आहेत. या बाईकचा पिकअप जबरदस्त आहे. ही फक्त 2.8 सेकंदात 0 ते 40 किमीचा वेग गाठते. एका चार्जमध्ये 125 किमी पर्यंतची रेंज देते. याची किंमत 1.93 लाख ते 2.05 लाख रुपयांपर्यंत आहे.