भन्नाट! ‘या’ भारतीय कंपनीचा जबरदस्त रेकॉर्ड; १ दिवसात विकल्या १ लाख टू-व्हीलर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 05:06 PM2021-08-17T17:06:16+5:302021-08-17T17:10:12+5:30

भारतातील दिग्गज टू-व्हीलर कंपनी Hero MotoCorp एक मोठा विक्रम स्वतःच्या नावे केला आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना अर्थचक्रही सावरताना दिसत आहे. देशातील अनेक कंपन्या आपल्या बाइक, कार यांचे नवीन व्हर्जन्स भारतात लॉंच करताना दिसत आहेत. इलेक्ट्रिक कारला भारतीय बाजारपेठेत मागणी वाढत असल्यामुळे कंपन्यांचा कल आता इलेक्ट्रिक वाहन उत्पादनात असल्याचे दिसत आहे.

आताच्या घडीला कारपेक्षा टू-व्हीलर्स, बाइक घेण्याकडे ग्राहकांचा ओढा असल्यामुळे या क्षेत्रातील कंपन्या अनेकविध उत्पादने आणि आकर्षक योजना आणताना पाहायला मिळत आहे.

यातच आता भारतातील दिग्गज टू-व्हीलर कंपनी हीरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) एक मोठा विक्रम स्वतःच्या नावे केला आहे. एका दिवसात १ लाखापेक्षा जास्त बाइक आणि स्कूटर विकण्याचा नवीन रेकॉर्ड कंपनीने केला आहे.

या विक्रीमध्ये डोमेस्टिक मार्केट आणि ग्लोबल मार्केटमध्ये झालेली विक्री दोन्ही आकडेवारीचा समावेश आहे. कंपनीने ९ ऑगस्ट रोजी विक्री झालेल्या टू-व्हीलर्सची माहिती दिली, या एका दिवसात १ लाखापेक्षा जास्त टू-व्हीलर्स विकल्या असे कंपनीकडून सांगण्यात आले.

एंट्री, डीलक्स आणि प्रीमियम तिन्ही टू-व्हीलर सेगमेंटमध्ये वाहनांची मागणी वाढल्याच् कंपनीने सांगितले. एका दिवसात १ लाखापेक्षा जास्त विक्री होण्यामागे बाइक सेगमेंटमधील अलिकडेच लाँच झालेल्या टू-व्हीलर्सना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

यामध्ये Glamour XTEC, Splendor Matte Gold आणि Xtreme 160R तर स्कूटर सेगमेंटमधील नवीन लाँच Maestro Edge 125, Destini आणि Pleasure 110 यांना शानदार प्रतिसाद मिळाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

यावर्षी हिरो मोटोकॉर्प होंडा मोटारसायकलपासून विभक्त झाल्यानंतर १० वा वर्धापन दिन साजरा करत आहे. आगामी सणांमुळे लोक नवीन वाहने खरेदी करण्यासाठी अधिक उत्साही असल्याचे कंपनीचे मत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच कंपनीने एकाच ठिकाणी १८२४ Hero Splendor Plus बाइक्स एकत्र उभ्या करून 'हीरो'चा सर्वात मोठा 'लोगो' (लार्जेस्ट मोटरसायकल लोगो) बनवला. यासाठी कंपनीचं नाव 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंदवले गेले आहे. 'हीरो मोटोकॉर्प'ने २९ जुलैलाच हा अनोखा विक्रम आपल्या नावे केला.

Hero आपली Electric Scooter लवकरच भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. गेल्या आठवड्यात कंपनीच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त लाइव्ह स्ट्रीमिंगदरम्यान हीरो मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजाल (Pawan Munjal) यांनी आपल्या आगामी इलेक्ट्रिक स्कूटरची झलक दाखवली.

Electric Scooter च्या स्पेसिफिकेशन्सबाबत त्यंनी कोणतीही माहिती दिली नाही, पण लवकरच इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.