Fastag New Rules : कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:48 IST2025-06-18T15:39:16+5:302025-06-18T15:48:31+5:30
Fastag New Rules : 3000 रुपयांच्या फास्टॅग पासच्या जाळ्यात अडकू नका... आधी त्याच्या नियम, अटी-शर्थी जाणून घ्या. मगच निर्णय घ्या...

फास्टॅगचा आता वार्षिक पास मिळणार आहे. यासाठी एका वर्षाच्या व्हॅलिडीटीसाठी ३००० रुपये द्यावे लागणार आहेत. या ३००० रुपयांत तुम्ही २०० वेळा टोल क्रॉस करू शकणार आहात. हिशेब घालायचा झाला तर एक टोल तुम्हाला १५ रुपयांना पडणार आहे. चला तर मग याचे फायदे जाणून घेऊया...
हा पास खासगी कार, जीप, व्हॅन यासाठी मिळणार आहे. यामुळे टोल प्लाझावर गर्दी होणार नाही आणि पेमेंट करणेही सोपे जाईल, असा युक्तीवाद सरकारने केला आहे. कारण टोलवरून लोकांची टोलवाल्यांशी जास्त भांडणे होणार नाहीत.
हा वार्षिक पास आहे, यामुळे तुम्ही २०० टोल क्रॉस करू शकणार आहात. आधीच्या नियमाप्रमाणे जर तुम्ही एकाच दिवसात रिटर्न आलात तर तुमचा निम्मा टोल कापणार का, तर नाही. जाताना १५ आणि येताना १५ रुपये तुमचे कापले जाणार आहेत. हे आधी लक्षात घ्या. नाहीतर त्यावरून पुन्हा भांडत बसाल.
हा पास कोणासाठी?
हा पास जे लोक टोलबुथवरून किंवा टोलच्या रस्त्यावरून वारंवार प्रवास करतात त्यांच्यासाठी आहे. कधीतरी ये-जा करत असाल आणि जर तुमचा टोलवरील खर्चच जर वर्षाला ३००० रुपयांपेक्षा कमी असेल तर चुकूनसुद्धा तुम्ही या पासच्या वाट्याला जाऊ नका.
कारण हे २०० चे लिमिट एक वर्षात संपेल. यामुळे पुन्हा पाससाठी किंवा टोलसाठी पैसे भरावे लागतील. आधीच २०० वापरले नाहीत तर नुकसान तुमचे आहे. कारण जर तुम्ही फास्टॅगमध्ये नेहमीसारके रिचार्ज केले तर ते कितीही वर्षे उरलेले पैसे वापरता येतात. त्याला वेळेचे लिमिट नसते.
हा पास कसा काढाल...
NHAI लवकरच एक हायवे ट्रॅव्हल अॅप Rajmarg Yatra App आणि अधिकृत वेबसाईटवर एक वेगळी लिंक लाँच करणार आहे. यावरून तुम्ही पाससाठी अर्ज करू शकणार आहात.
६० किमीचा नियम काय...
घरापासून ६० किमीच्या परिसरात टोल प्लाझा असेल तर त्यांना वारंवार टोल भरावा लागतो. त्या लोकांचा तसेच वारंवार प्रवास करणाऱ्यांचा भरमसाठ टोल भरण्याचा प्रश्न मिटणार आहे.
कोणत्या टोलवर काम करणार...
हा फास्टॅगचा पास सर्वच टोलवर काम करणार नाहीय. देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझावर हा पास चालणार आहे. राज्य महामार्ग किंवा स्थानिक टोलसाठी हा पास वैध नाही. म्हणजेच तुम्हाला पास घेऊनही जादाचे पैसे फास्टॅगमध्ये ठेवावे लागणार आहेत.
अजून एक फायदा म्हणजे तुमचा फास्टॅग लवकर ब्लॅकलिस्ट होणार नाही, तसेच वारंवार रिचार्ज करावा लागणार नाही. अनेकदा टोल नाक्याच्या अलीकडे फास्टॅग रिचार्ज करत बसावे लागते. यानंतर काही वेळाने बॅलन्स खात्यात रिफ्लेक्ट होतो. परंतू, स्टेट हायवेवर मात्र तुम्हाला फास्टॅगमध्ये बॅलन्स आठवणीने भरावा लागणार आहे.